Bookstruck

प्रकरण ३

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दुपारी सव्वाचार वाजता वज्र थकून भागून एका टेकडीच्या उतारावर झाडाखाली पहुडला होता.बघता बघता त्याने बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. अंगाला मिरपूड लावण्याची कल्पना त्याला पॅपिलॉन कादंबरी वरून सुचली होती आणि ती फळाला आली होती. कुत्रे मागावर आले नव्हते.बंदिष्टी ला मारल्यानंतर सगळे पहारेकरी परत गेले होते. कदाचित एकच कैदी पाळला असं वाटल्यामुळे असेल किंवा वज्र न सापडल्यामुळे त्यांनी नाद सोडला असेल.पुन्हा गिनती केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की दोन जण पळाले, एक मेला पण एक निसटला.एव्हाना सगळीकडे बातमी पोचवून जवळच्या पोलीस स्टेशन्स ना सावध केलं गेलं असेल. अत्ता वज्र जिथे विसावला होता तिथून रेल्वे स्टेशन पाच किमी होतं.पण अंधार पडे पर्यंत तो तिथून हलणार नव्हता.त्याची नजर खाली पसरलेल्या विस्तीर्ण शेताकडे वळली.त्या शेतात एक दोन घरं दिसत होती.एवढ्यात त्याला त्यातल्या एका घरातून एक मुलगी आपल्या डोक्यावर फळांची टोपली घेऊन बाहेर पडताना दिसली.शेताच्या पलीकडून मोठा रस्ता जात होता. घरा पासून हायवेवर जायला एक कच्चा रस्ता होता.त्यावरून एक ट्रक आला आणि घराजवळ थांबला.वज्रला रस्त्यातून पोलीसांच्या गस्त घालणाऱ्या गाड्या मधूनच दिसत होत्या.असेच काही तास गेले.संधीप्रकाश पडला आणि वज्रने निर्णय घेतला की त्या शेत घराजवळ जाऊन खायची सोय होईल का बघावं,कारण सकाळ पासून तो उपाशी होता.कप भर चहा सुद्धा पोटात गेला नव्हता.तो चालत चालत त्या घर जवळ आला. घरा बाहेर एका खोपटी होती.त्यात मोसंबी मांडून ठेवली होती.त्याच्याने राहवले नाही, तो त्या खोपटीत शिरला. त्यातल्या दोन तीन मोसंब्यावर त्याने ताव मारला.आता सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता आणि अंधारून आलं होतं.घरातून रेडीओ किंवा टीव्ही वर गाण्याचे आवाज येत होतं.जेल मधे कित्येक दिवसात गाणं ऐकायलाही मिळालं नव्हतं. गाणे ऐकताना त्याच्या नकळत डोळे मिटले गेले.रात्री उशिरा इथून हलू आणि रेल्वे पकडू असा विचार त्याने केला.खोपटीच्या खिडकीतून लाल भडक सूर्याचा गोळा त्याला दिसला आणि त्याचं काळीज थरारलं. अरेच्या! अत्ता सूर्यास्त झाला होता ना? आणि लगेच पुन्हा सूर्य कसा उगवला? तो धडपडून उठला आणि त्याच्या लक्षात आलं की हा दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयच आहे.म्हणेज वज्र चक्क आठ दहा तास झोपला होता ! सकाळी पुन्हा रस्ता वाहू लागला, नव्या दिवसाची सुरुवात झाली होती.काल दिसलेली मुलगी दोन माणसांबरोबर घराच्या बाहेर आली. ती दोन माणसं ट्रक मधे बसली आणि निघून गेली.त्या नंतर ती मुलगी पुन्हा आत गेली.वज्रने त्या खोपटातच पडून राहायचा निर्णय घेतला.एकतर अंगावर कैद्याचे कपडे असतांना दिवसा ढवळ्या बाहेर पडणे धोक्याचं होतं.आणि विश्रांतीही गरजेची होती.तासभर तो डोळे मिटून पडून राहिला.काहीतरी खुडबुड ऐकू आली म्हणून वज्रला जाग आली. ती मुलगी खोपटात ye ja करत होती, तशी लहानच होती,सतरा-अठरा वयाची.फळांची ने आण करत होती पण वज्रकडे तिची पाठ असल्याने तिला तो दिसला नव्हता.त्याच्या मनात आलं की तिला सांगावं की मी इथे आहे पण तिने काय प्रतिसाद दिला असता? पुढच्या काही मिनिटात तिच्या हालचाली अशा होत होत्या की ती घाबरली असावी, आत कोणीतरी आहे याची तिला जाणीव होत असावी, पण घरी मोठं कोणी नसल्याने काय करावं याचा निर्णय होतं नसावा. हिने बाहेर जाऊन खोपटाला कडी घातली तर? तर मग आपण पूर्णच अडकलो असं वज्रच्या मनात आलं. त्या आधीच हालचाल करायला हवी होती.वज्र उठून उभा राहिला आणि म्हणाला,

“ घाबरू नको.”

ती पाठमोरी होती.वज्रचा आवाज ऐकून ती गरकन वळली. वज्रचा अवतार भयानक झाला होता.उंचपुरा , सावळा, दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढलेले.ती प्रचंड घाबरली.भीतीने किंकाळी सुद्धा बाहेर आली नाही. ती सरकत सरकत मागे भिंती पर्यंत गेली.

“ जवळ नका येऊ ” ती एवढंच बोलू शकली.

“ नाही येत.काळजी करू नको. माझ्या पासून तुला धोका नाहीये.”वज्र म्हणाला.

“ तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात? कुठून आलात?” तिने विचारलं.

वज्रने तिला तुरुंगातून सुटल्या पासून इथे खोपटा येई पर्यंत काय घडलं ते स्पष्ट सांगितलं.आणि पुढे रेल्वेने पळून जाणार असल्या बाबतही सांगितलं.फक्त आपलं नाव सांगितलं नाही.

“ पण ते रेल्वेची तपासणी करताहेत.तुम्ही रेल्वेनेच पळणार हीच त्यांची अपेक्षा आहे.” ती म्हणाली आणि वज्रला जाणीव झाली की ती आपल्या बाजूने आहे.

“ तू तसं म्हणत असशील तर मला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल.पण मला मदत करशील तू? त्याशिवाय मला पळून जाणे शक्य नाही.”

तिने बराच वेळ वज्र कडे निरखून पाहिलं. नंतर म्हणाली.

“मी त्या तुरुंगा बद्दल ऐकून आहे.शत्रूने सुद्धा तिथे जाऊ नये असं म्हणतात. मी करीन तुम्हाला मदत. खाणार काही?”

वज्रच्या मनातलंच तिने विचारलं.

“तुझ्या घरातून मगाशीच आम्लेटचा वास आला.” वज्र म्हणाला. तिला एकदम हसू आलं. “ आणते ” म्हणून ती घरात गेली.बराच वेळ ती आली नाही.वज्रला काळजी वाटायला लागली.हिने आत जाऊन पोलिसांना फोन केला तर?संपलच सगळ.पण त्याचं नशीब जोरावर होतं.ती एका हातात आम्लेट आणि चहा घेऊन आली.

“ आधी खा आणि घरात जाऊन अंघोळ करून घ्या. मी बाहेर थांबते बाथरुम च्या दारात रेझर, गरम पाणी,टॉवेल आणि बाबांचे काही कपडे ठेवलेत.. ”

वज्र आधी लांडग्यासारखा अन्नावर तुटून पडला. नंतर सगळ आवरून घेतलं.

“ मी असं ऐकलं होतं की तुम्ही ज्या तुरुंगातून सुटलात, तो तुरुंग म्हणजे नरक आहे आणि तिथून अत्ता पर्यंत कोणीही पळून जाऊ शकलेला नाही.मुळात तुम्ही असं काय केलं की तुम्हाला जेल मधे टाकलं? आणि ते सुद्धा या नरका समान जेल मधे? ”

तिने वज्रला मदत केली होती.मनात आणल असतं तर आत गेल्यावर ती सहज पोलिसांना फोन करू शकली असती.पण तिने ते केलं नाही त्या अर्थी तिला आपल्याला मदत करायची इच्छा आहे असा विचार वज्रच्या मनात आला.ती आपल्याला माहिती विचारते आहे ते सहानुभूती पोटी. आपल्याला अडकवण्यासाठी नाही, नाहीतर तिने आपलं नाव आधी विचारलं असत. हे वज्रने ओळखलं आणि त्याने तिला एवढंच सांगितलं की “एका न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला भोगावी लागली होती पण मी निसटण्यात यशस्वी झालो.” तिच्या सारख्या निरागस मुलीशी आपण धादांत खोटं बोललो याच वज्रला वाईट वाटलं.

“ तुम्ही रेल्वेने जाऊ नका.पकडले जाल. खापरी ला जाऊन चालणार असेल तर तिथे तुम्हाला सोडायची व्यवस्था मी करू शकते.”

तिने सुचवल्या नुसार खोपटात ठेवलंली फळ खापरी च्या बाजारात घेऊन जाण्यासाठी रोज ट्रक येत असे.तो घेऊन येणारा माणूस इथेच जेवायचा.जेवण होई पर्यंत वज्रने ट्रक च्या मागे लपून बसायचं.बाजारात ट्रक पोचला की एका ठिकाणी तो चहा ला थांबेल तेव्हा वज्रने खाली उतरायचं आणि गर्दीत मिसळून जायचं.

वज्रने सगळं अगदी तसंच जमवलं.ट्रकमधे मागच्या भागात लपलेला असताना ड्रायव्हरच्या नकळत तिने पटकन नोटांचे एक बंडल त्याच्या दिशेने फेकलं आणि हात हलवून त्याला निरोप दिला. त्या बंडलावरच्या पहिल्याच नोटेवर तिने ‘कृतज्ञता’ असे शब्द लिहून एक फोन नंबर खरडला होता. तो प्रसंग वज्रच्या मनात घर करून राहिला.ती नोट वज्र आजन्म सांभाळून ठेवणार होता.

खापरी ला उतरल्यावर तिथून दूर कुठेतरी जाणे आवश्यक होतं. त्या मुलीने दिलेले पैसे खूप जपून वापरणं गरजेचं होतं.त्यामुळे बसने जाणे शक्य नव्हतं. रेल्वे हाच पर्याय होता.. पण स्टेशन वर तपासणी चालू असेल तर धोका होता.त्याने मालगाडी तून जायचं ठरवलं. बाजारात त्याने चार वडा पाव पार्सल घेतले .तो स्टेशनच्या बाहेरच्या रेल्वे ट्रॅकवर गेला.तिथून एखादी मालगाडी बाहेर पडायची वाट बघत बसला.साधारण मालगाड्या खूप हळूहळू वेग पकडतात त्यामुळे वज्रला चालत्या गाडीत चढणं शक्य झालं. त्याच्या नशिबाने सगळ्या बोग्या बंदिस्त नव्हत्या.एका मोकळ्या बोगीत ती आत शिरला.पुढचे वीस तास तो मालगाडीत बसून राहिला कारण आडवं झालं तर हादरे बसल्यामुळे पाठ सोलून निघत होती. जवळ जवळ वीस तासानंतर मालगाडी थांबली. आणि वज्र खाली उतरला.कदाचित आधी सुद्धा थांबली असेल पण आपल्याला झोप लागली असावी असं त्याला वाटलं.आता जरा अंधार पडला होता.खरगपूर स्टेशन होतं. प्लॅटफॉर्म वरून मालगाडी पास होतांना त्याला पाटी दिसली होती. तो स्टेशन बाहेरच्या एका टपरी वजा हॉटेलात आला.तिथे चहा आणि सँडविच घेतलं. प्रत्येक वेळी पैसे देताना त्याला त्या मुलीची आठवण येत होती.तिने किती समय सूचकता दाखवून पैसे दिले होतं! नाहीतर आपण काय केलं असतं? भीक मागत बसावं लागलं असतं आणि त्या पैशातून खावं लागलं असतं. आपण त्या मुलीला नाव सुद्धा विचारलं नाही.बंडलातल्या एका नोटेवर तिने कृतज्ञता असं का लिहिलं असेल? तिचं ते नाव असेल? की मदत या अर्थाने ते शब्द असतील? आणि घाईघाईत खरडलेला आकडा म्हणजे तिचा फोन नंबरच असेल का? ती नोट जपून ठेवायला हवी. कुणालाच त्या तुरुंगात जायला लागलेलं मला आवडणार नाही असं काहीतरी ती का बोलली असेल? विचार येत होते पण त्या आधी आपण कुठे आणि किती लांब आलोय याचा अंदाज घ्यायला हवा होता.त्याने पैसे देता देता या बद्दल चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण खापरी पासून साधारण नऊशे ते हजार किमी दूर आहोत.आता आणखी दूर जायचं की काय करायचं हे ठरवणं आवश्यक होतं.इथे काय आहे? हे शहर केवढ मोठ आहे याची त्याने चौकशी केली तेव्हा त्या टपरी वाल्याने सांगितलं की हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्ह्यातील एक औद्योगिक शहर आहे.आय आय टी प्रसिद्ध आहे शिवाय जगातील सर्वात जास्त लांबीचे प्लॅटफॉर्म या स्टेशन वर आहेत.इथे मोठा रेल्वे वर्क शॉप आहे. कलकत्ता इथून साधारण १२० किमी आहे. वज्रचा एकंदरित अवतार बघून टपरीवाल्या मालकाला त्याच्या अज्ञानाची कीव आली. “तुम्हाला हे काहीच माहित नाही?” त्याने बंगाली मिश्रित हिंदीत विचारलं.

“ मी इथला नाही. खूप दुरून आलोय.चेन्नई वरून.” मुद्दामच नागपूरचा उल्लेख न करता वज्र म्हणाला.

नाहीतरी वज्रच्या अवतारावरून तो मद्रासीच वाटत होता.

“ एवढ लांबून का?” टपरी मालक भोचक नव्हता पण बोलघेवडा होता.त्याला मोडकं तोडकं हिंदी येत होतं म्हणून संवाद होतं होते.

“नोकरीसाठी.”

“ इथे खरगपूरमधे?”

“ असंच काही नाही.” वज्र म्हणाला.मालक आणखी काही विचारण्यापूर्वी वज्र म्हणाला,

“ काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. म्हणून भांडून बाहेर पडलोय. ”

“ ओह!”

“ कलकत्ता किती लांब आहे इथून?”

“ ११८ किमी.पण अत्ता तुला ट्रेन नाही.एकदम उद्या दुपारी.” मालक म्हणाला.

“ अरे बापरे!” वज्र उद्गारला एखादा ट्रक वगैरे मिळू शकतो का हायवे वर?”

“ इथून तुला कुठलाच ट्रक कलकत्या पर्यंत नेणार नाही.कारण जाणारे सगळे लोडेड असतात. त्याला पर्याय म्हणजे कोलाघाट च्या शेवटच्या पंपावर जायचं. तिथे सर्व ट्रक, कार थांबतातच. तिथून कलकत्त्याला जायला लिफ्ट घ्यायची.”

“ शेवटचा पंप म्हणजे?” वज्रने विचारलं.

“म्हणेज खरगपूर ते कलकत्ता तीन तासांचा प्रवास आहे. या मार्गावर बरोब्बर निम्म्या अंतरावर कोलाघाट नावच छोटं गाव आहे.तिथे पलाश घोष चा एक पेट्रोल पंप आहे. सर्व्हिस स्टेशन आहे,आणि रेस्टॉरंट आहे. आणि मोठे भंगाराचे गोडाऊन आहे. मोठ्या जाग्यावर हे सगळ उभारलं आहे. तिथून पुढे कलकत्त्या पर्यंत पंप नाही.हॉटेल नाही त्यामुळे सगळे इथे थांबतातच. पलाश घोषने एक मोठ्ठी पाटी लावल्ये पंपावर ‘जरा विसावा अशी.” मालक म्हणाला.

“ पण कोलाघाट पर्यंत कसं जायचं?”

आज तुला जरा नशिबाची साथ आहे. ” मालक म्हणाला आणि त्याने वज्र पुढे एक कॉफीचा कप ठेवला.वज्रचा हात नकळत खिशाकडे गेला.

“ पैसे नकोत याचे. ” मालक म्हणाला.

“ नशिबाची साथ का आहे म्हणालात तुम्ही?” वज्र ने विचारलं

“ कारण पलाश घोष आठवड्यातून एकदा त्याचा ट्रक घेऊन इथे येतो, रेल्वे वर्क शॉप मधला भंगार गोळा करतो, माझ्याकडे चहा घेतो, खातो काहीतरी mercy आणि ट्रक घेऊन परत जातो.फार जॉली माणूस आहे. तुझं नशीब आहे की आज त्याचा इथे यायचा दिवस आहे. तो तुम्हाला त्याच्या पंपापर्यंत नेऊ शकेल.”

त्या दोघांचं बोलणं चालू असतांना एक जाडगेला माणूस आला.

“ देवेश, मला पटकन एक गरमा गरम कॉफी दे.लवकर निघायचंय ” तो मालकाला म्हणाला. बोलायच्या पद्धतीवरून तो एकदम घरगुती वाटला. त्याची नजर वज्र कडे गेली.दोघेही हसले.

“ पलाश, यांना कलकत्याला जायचंय.मी त्यांना तुझ्या पंपाबद्दल सांगत होतो अत्ताच. त्यांना जातांना नेशील का?” मालक देवेश म्हणाला.

“ काहीच प्रॉब्लेम नाही.मी एकटाच जातोय.मला कंपनी मिळेल. पण ट्रकमधे बसायची सवय आहे का? नाहीतर त्रास होईल.” पलाश म्हणाला.

नागपूर मधल्या तुरुंगापेक्षा केव्हाही उत्तम.वज्रच्या मनात आलं.

त्याने कॉफी संपवली. देवेशला पैसे दिले. “चल निघूया.” तो वज्रशी शेक हँड करून म्हणाला.

“ मी पलाश घोष” त्याने स्वत:ची ओळख करून दिली.

“ मी शीर्ष सहानी” आयत्या वेळेला सुचलं ते नाव वज्रने ठोकून दिलं. मालक देवेश ला पण ते नाव वज्रने सांगितलं नव्हतं, म्हणेज तशी वेळ आली नव्हती.

“ वेगळंच नाव आहे तुझं. छान आहे.” चल आम्ही निघतो.” पुढच वाक्य पलाश देवेशला उद्देशून म्हणाला.वज्रने देवेशचे हात हातात घेऊन मनापासून आभार मानले.

दोघेही पलाशच्या ट्रक जवळ आले.लोखंडी भंगार मालाने ट्रक भरला होता.तो ड्रायव्हिंग सीट वर बसला.भरगच्च भरलेला ट्रक त्याने सराईतपणे रस्त्यावर काढला.थोडा वेळ शांततेत गेला, कोणीच कुणाशी बोललं नाही. नंतर पलाशने विचारलं.

“ या भागात पहिल्यांदाच?”

“ हो.”

“ कुठून आलास तू?”-पलाश

“ महाराष्ट्रातून.”

“ मी कधीच नाही गेलो तिथे.”

देवेश च्या मानाने पलाश खूप चांगलं हिंदी बोलत होता.

“ तुम्ही बंगली असून हिंदी चांगल बोलताय.”

“ मी खूप फिरलोय. अगदी लहानपणी दिल्लीत होतो.” पलाश म्हणाला.

“ तू महाराष्ट्रात काय नोकरी करायचास की धंदा?”

“ वडलांच्या धंद्यात होतो. कुलुपे तयार करायच्या आणि दुरुस्तीच्या धंद्यात.” वज्र म्हणाला.

“ मग एवढं दूर कसा काय आलास?”

“ माझा एक मित्र आहे कलकत्त्यात. महाराष्ट्रातून पूर्वी गेलेला.तो बरेच दिवस बोलावतो आहे. तो भाग बघणार, जमलं तर तो तिथे मला धंदा किंवा नोकरी बघेल.”

“ मेटल बद्दल कितपत ज्ञान आहे?”

“ कुलूप तयार करायला मेटल लागत. तेवढ्या पुरतंच.” वज्र म्हणाला.

पुन्हा बराच वेळ शांततेत गेला.

“ कारच्या इंजिन बद्दल माहिती नसेल ना? ” अचानक पलाशने विचारलं.

“ इंजिन खाली उतरवू शकतो.” वज्र म्हणाला.

“ ते जमत असेल तर खूपच येतंय तुला.”

वज्रला आता प्रश्नांच्या सरबत्तीचा कंटाळा आला.तो बाहेर बघत बसला.

“ कलकत्यात तू नेमकं कशासाठी जातो आहेस? म्हणेज मला म्हणायचं आहे की नोकरी पक्की झाली असेल तर चांगलंच आहे,पण शोधायला जात असशील तर तिकडे जायच्या ऐवाजी माझ्याच कडे का नाही करत?” पलाश ने विचारलं.

“ काय असणार आहे काम?” वज्रने विचारलं.

“ हे बघ, माझा पेट्रोल पंप आहे, वाहनांसाठी सर्विस स्टेशन आहे, भंगाराचा डेपो आहे आणि रेस्टॉरंट आहे. मी आणि माझी बायको दोघे मिळून हे सर्व बघतो.बायको, सांझी, रेस्टॉरंट बघते, मी बाकीचं सगळं बघतो.पण आता माझं वय वाढत चाललंय.आणि धंदा वाढत चाललाय.आम्हा दोघांना हे पेलत नाही आता.कुठेही बाहेर जाता येत नाही मौज मजा करायला. मी दर वेळी बायकोला सांगत राहतो की आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ पण जमत नाही मला तुझ्या सारख्या तरुणाची, गरज आहे. जो शिकून घेईल, मला मदत करेल, माझा भार हलका करेल.अर्थात माझी बायको बाहेरचा माणूस ठेवायला तयार नाहीये.तिचा तुला विरोध असेल.हे आधीच सांगतो तुला, पण माझी गरज आहे ती. तुला तिथे राहायला स्वतंत्र जागा मिळेल, रोजचा जेवण खाण खर्च माझ्याच रेस्टॉरंट मधून होईल.शोवाय पगारही देईन. ”

वज्र ने विचार केला, काही दिवस लपून राहण्यासाठी ही नामी संधी होती.शिवाय खर्चाची चिंता नव्हती.

“ हरकत नाही माझी.प्रयत्न करून बघतो.सुरवात तर करू.” तो म्हणाला.

पलाश अत्यंत आनंदला. आपला डावा हात वज्रच्या खांद्यावर प्रेमाने टाकून तो म्हणाला,

“ माय सन ! थँक यू.”

« PreviousChapter ListNext »