Bookstruck

प्रकरण २

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असे आवाज यायला लागले होतं. शब्द कळत नव्हतं.एखाद्या मैलभर लांबीच्या बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होतं.आपल्या अवती भोवती काही माणसं जमल्येत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघताहेत अशी जाणीव वज्रला झाली. बहुदा उपचार करणारे डॉक्टर असावेत.

“ अगदी थोडक्यात वाचला हा.” एक आवाज.

“ याला फार लागलं नसेल तर घेऊ का याला उभा आडवा?” दुसरा आवाज.

“ घाई नको करू.अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता तरी मेला असता हा.” पहिला आवाज.

“ त्याला मी ताब्यात घेतला की मेलो असतो तर बर झालं असतं असं वाटेल त्याला.” दुसरा आवाज.

हे डॉक्टर नाहीत, पोलीस आहेत ! वज्रला त्याही स्थितीत जाणीव झाली.

अथांगचं काय झालं असावं? वज्रच्या मनात विचार आला.तो पळाला असेल? त्या इमारतीतून बाहेर जातांना तो दिसला नसेल तर तो सुरक्षित असेल.पकडला गेला तो वज्र होता. उघड्या तिजोरी समोर कपूरला वज्र दिसला होता, अथांग नाही. वॉचमन शी बोलला तो वज्र होता, अथांग नाही.बाहेर पडताना अथांग त्याला म्हणाला होता की खाली उतरू नको, वर चल. वज्र आधीच खाली उतरला होता आणि फसला होता.

त्या मागोमाग वज्रच्या मनात कपूरचा विचार आला. त्याच काय झालं असेल? मेला असेल तो? अथांग ने त्याच्या डोक्यात मोठा फटका मारला होता.

एका पोलिसाने वज्रच्या गालावर चापटया मारल्या.

“ उठ. दोन दिवस वाट बघतोय मी तुझी. आता फार झालं.उठ.”

ते प्रश्नांची सरबत्ती करत होतं त्याच्यावर आणि जाणून घेत होतं की त्याचा कोणी साथीदार होता का. वज्र ने शेवट पर्यंत अथांगचं नाव घेतलं नाही.

अथांग.....त्याचा लहान पणापासूनचा मित्र., शाळेतही आणि कंपनीतही. त्याच्या मनात आपणच चोरीची कल्पना भरवली. आधी त्यांनी वज्रला घाबरवलं की कपूर मरायला टेकलाय. तो मेला तर वज्रवर खुनाचा आळ येऊ शकतो. पण नंतर त्यांनी आपली खेळी बदलली.कपूर बरा होतोय, तो जगाला तर वज्रच्या साथीदाराचे नावं सांगेलच त्यापेक्षा वज्रने आधीच सांगावे, आम्ही शिक्षा कमी करायचा प्रयत्न करू असं सांगितलं.पण वज्र शेवट पर्यंत बधला नाही.

थोडा बरा झाल्यावर शेवटी त्याला कोर्टात हजर केलं गेलं. वकील करायला त्याच्याकडे पैसे नव्हतं. न्यायाधीश त्याला म्हणाले की कोर्टाबाहेर च्या परिसरात उभ्या असलेल्या अनेक वकीलांपैकी त्याने कुणाला तरी वकील म्हणून नेमावे.कोर्ट अर्धातास कामकाज थांबवेळ,त्यासाठी.

एक पोलीस वज्रला घेऊन बाहेर गेला. वज्र बऱ्याच वकिलांना भेटला पण त्याला हवा तो वकील मिळाला नाही, म्हणजे त्याच्या बजेट मधे काम करणारा मिळाला नाही.पुन्हा कोर्ट सुरु झालं, न्यायाधीशांनी त्याला विचारलं की तुला वकील मिळाला का?

“ मी बराच प्रयत्न केला पण मला नाही मिळाला. ज्या ज्या वकिलांकडे मी चौकशी केली ते म्हणाले की स्वस्तात काम करणारे साधारण दर्जाचे वकील पूर्वी इथे होतं, पण ते सगळे जज्ज झालं, त्यामुळे तुला हवा तसा वकील आता इथे मिळणार नाही.”

त्याच्या या उत्तराने कोर्टात हशा पिकला. न्यायाधीशांना हे उत्तरं आवडलं नाही. त्यांनी हातोडा आपटून लोकांना शांत केलं पण त्याचं वज्रविषयी मत दूषित झालं. नियमानुसार अपराधी माणसाला वकील द्यावाच लागतो त्यानुसार कोर्टानेच एक वकील वज्रसाठी नेमला. कोर्ट सरू झालं. वज्रने खिन्नपणे इकडे तिकडे बघितलं.कोर्टात त्याला सूज्ञा दिसली.वज्रने अजिबातच अपेक्षा केली नव्हती की येईल.त्याही परिस्थितीत त्याला बरं वाटलं. दुसरी धक्कादायक बातमी होती की साक्षीदार म्हणून अभेद्य सेफ कॉर्पोरेशन च्या मालकाने,फारुखने चक्क वज्र च्या बाजूने साक्ष दिली.वज्रच्या प्रामाणिकपण विषयी त्याने ठाम भूमिका घेतली.या चांगल्या माणसाकडे आपण नोकरी केली पण आपण घातलेल्या दरोड्यामुळे त्याचं नाव खराब झालं याचं वज्रला मनापासून वाईट वाटलं.

फारुखच्या साक्षीचा परिणाम पुसून टाकणारी साक्ष त्या तरुणीची झाली, तिने सांगितलं की कपूरच्या क्लबात ती गायला येत असते.त्या रात्री ती गाण्या बद्दल चर्चा करायला कपूरच्या घरी आली होती.पण रात्री एक वाजता ही चर्चा करायची वेळ होती का हा प्रश्न तिला वज्रच्या वकिलाने उलट तपासणीत विचारला नाही.

कपूर ने साक्ष दिली.तो म्हणाला की तो खोलीत आला तेव्हा वज्रला त्याने खोलीत पहिले.तिजोरी उघडून तो उभा होता आणि कपूर जवळ आल्यावर त्यानेच लोखंडी दांडा त्याच्या डोक्यात मारला.

वज्रसाठी जो वकील नेमला होता तो केवळ टाईम पास करायलाच आला होता.केवळ कोर्टाने नेमल म्हणून तो तिथे काम केल्याचं दाखवत होता.कोर्टाने शेवटी वज्रला दोषी ठरवलं. न्यायाधीशांनी आपल्या ऑर्डर मधे उल्लेख केला की वज्र ने कपूरवर हल्ला केला नसता तर पहिलाच गुन्हा आणि सराईत गुन्हेगार नाही, केवळ पैशांच्या मोहापाई केलंलं गुन्हेगारी कृत्य या आधारे वज्रला दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे या आरोपाखाली कमी शिक्षा देता आली असती. पण त्याने कपूरला ठार करायचा प्रयत्न केला.हा गंभीर गुन्हा आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.त्या क्षणी वज्रला मोह झाला की स्वत:ला वाचवायचं असेल तर अथांग चं नाव घ्यावं.अचानक वज्र आणि अथांग ची दृष्टादृष्ट झाली. अथांगच्या चेहेऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती.वज्र आणि अथांग ने आपले बालपण एकत्र घालवले होतं.अथांग बरोबर एकत्र घालवलेले क्षण , वज्रला आठवले आणि त्याला धोका द्यायचा नाही असा निश्चय त्याने केला, आपले तोंड बंद ठेवलं. आणि त्याची रवानगी नागपूरच्या केंद्रीय कारागृहात करण्यात आली.

तुरुंग बघायची वेळ कशाला येते सामान्य माणसावर? वज्रवर सुद्धा ती प्रथमच आली होती.कल्पनाही करता येणार नाही अशी अस्वाच्छ्तता, शेजारीच नाग नदी असल्याने त्यात निर्माण होणारे डास. बेशिस्त, जुन्या आणि निर्लज्ज कैद्यांची दादागिरी, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा, या सर्वांचा नरक म्हणजे हा तुरुंग होता. दिवसा हत्यारबंद पहारेकरी गस्त घालत तर रात्रीच्या वेळी गेट जवळ हिंस्र कुत्रे मोकळे सोडले जात. त्या कुत्र्यांवर डोगरा नावाच्या एका धिप्पाड माणसाचे नियंत्रण असायचे. दहा हिंस्र कुत्रांना मोकळे सोडले जाई आणि ते पहारा देण्याचे काम करत.जसजसे दिवस जात होतं तसतसं तिथून पळून जायची प्रबळ इच्छा वज्र ला होतं होती. अवघड कुलूप उघडणे हा वज्रच्या डाव्या हाताचा मळ होता कारण आपल्या नोकरीत त्याने तेच काम कित्येक वर्षं केलं होतं.पण दिवसा हत्यारी रखवालदारांचा पहारा बाहेर असायचा त्यामुळे दिवसा पळून जाणे शक्य नव्हतं.रात्री पाळायचं तर त्या कुत्र्याचं काय करायचं? साखळदंड मुक्त करून निसटल तरी हे दहा कुत्रे पन्नास पावलं सुद्धा पळून जाऊन देणार नाहीत.

वज्रला आता एक महिना झाला होता, अजून मार्ग सापडत नव्हता.दर पंधरा दिवसांनी कैद्यांची कामे बदलली जात, कधी झाडलोट, कधी स्वच्छतागृहांची स्वच्छता कधी स्वयंपाक, त्यातून आता वज्रच्या वाट्याला कैद्यांसाठी जेवण करायची ड्युटी आली आणि इथेच कुत्र्यांपासून मुक्तता मिळवण्याचा मार्ग त्याला सापडला.

मिरपूड.

रोज थोडी थोडी मिरपूड हडप करून वज्र आपल्या पायजाम्यात गुंडाळून आपल्या झोपायच्या ठिकाणी नेऊन लपवून ठेवायला लागला. आपल्या अंगाला मिरपूड लावली तर अंगाच्या वासा वरून कुत्री आपला मग काढणार नाहीत हे त्याला माहित होत. पण कुत्र्यांची नजर चुकवून नदी पलीकडे कसं जायचं? पुढचे पाच सहा दिवस वज्रने केवळ डोगरा च्या रात्रीच्या हालचालींचा अभ्यास करण्यात घालवला.संध्याकाळी सात वाजता सगळ्या कैद्यांना आपापल्या सेल मधे आणून त्यांना झोपायच्या पलंगाला साखळीने जखडून टाकले जाई.डोगरा समोरच हे केलं जात असे.त्या नंतर बाहेर च्या बाजूने खोल्यांना कुलपे घालण्यात येत.दिवसा पहारा देणारे पहारेकऱ्यांची ड्युटी मग संपत असे डोगरा कुत्र्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत असे आणि त्यांना मोकळे सोडून त्याला देण्यात आलेल्या खोपटीत बसत असे.कित्येकदा झोपतही असे.पहाटे पावणेचार ला तो किचन मधे जात असे आणि कैद्यांना देण्यात आलेल्या जेवणातील उरलेले पदार्थ, विशेषत: मांसाहारी पदार्थ तो कुत्र्यांना खाया देत असे. हे पदार्थ देतांना तो कुत्र्यांच्या घरातच खायला घालत असे. खाऊन झाल्यावर तो त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून पुन्हा बंदिस्त करत असे. त्या नंतर तो मोठ्याने शिट्टी फुंकत असे.कैद्यांनी उठावे, दिवसाच्या पहारेकऱ्यानी आपल्या ड्युटीला हजर व्हावे या साठी ही शिट्टी असे. डोगराची स्वत:ची ड्युटी संपल्याचे ते द्योतक असे.वज्रची झोपायची जागा खिडकी जवळ आल्यामुळे त्याला हे सर्व दिसत असे,डोगरा च्या या रुटीन मधे काहीही बदल नसे.

या सर्व रुटीन मधे पळून जाण्यायोग्य वेळ म्हणजे जेव्हा डोगरा कुत्र्यांना खायला घालत असे तेव्हा होती हे वज्रच्या लक्षात आलं होतं. तुरुंगापासून नदी पर्यंतच अंतर कापायला सहा मिनिटांचा अवधी पुरला असता. वज्र ने अंदाज बांधला.तो शारीरिक दृष्ट्या सक्षम होता.कुत्र्यांनी माग काढू नये म्हणून सर्वांगाला मिरपूड फासायची आणि होईल तेवढ दूर जाऊन जरा कुठरी लपून बसायचं. ते शोधायला येतीलच पण कुत्र्यांना वास न आल्यामुळे आपण सहज सापडणार नाही असा विचार वज्रने केला.तिथून वीस कि.मी. अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. एकदा तिथ पर्यंत पोचलं की पुढे कुठेही जाता येणार होतं. आम्हाला ज्या पलंगाला साखळीने जखडून टाकलं जायचं, ती उघडायला वज्रला अर्धा मिनिट बास होतं.स्वयंपाक घरातील भांडी घासायची स्टील ची घासणी फाडून त्याची एक तार वज्रने तयार केली होती.पण बाहेरचे सेल चे कुलूप कसं उघडणार? कोणीतरी ते करत असतांना अलार्म वाजवला तर?

कैद्यांसाठी झोपायला बंक बेड होतं.म्हणेज वर एक कैदी आणि खाली एक.त्याच्या बंक बेड वर खाली यक्ष बंदिष्टी नावाचा कैदी झोपत असे.पाच फुट तीन इंच वगैरे उंची असेल पण खांदे सामान्य माणसापेक्षा रुंद, चेहेऱ्यावर असंख्य व्रण,असा त्याचा अवतार होता.थोडक्यात देह याष्टीने तो वज्रसारखाच दणकट पण फक्त उंचीने कमी होता. याला विश्वासात घेतलं तर दोघांना एकत्र पाहून इतर कुठल्याच कैद्यांनी अलार्म वाजवायचं धैर्य दाखवलं नसतं. पण या यक्ष बंदिष्टी वर विश्वास ठेवता येईल?वज्र आणि त्याची मैत्री अशी झाली नव्हती फक्त दोघे एकाच बंक बेड वर झोपत आणि ते सुद्धा साखळीने जखडलेल्या अवस्थेत एवढाच दोघातलं सामान दुवा.तो कुणाशी मिसळत नसे.कोणी त्याच्या फार जवळ यायला लागलं तर त्याच्या हाताचा ठोसा जवळ येणाऱ्याच्या तोंडावर बसत असे.तो फक्त कैद्यांनाच न आवडणारा होता असं नाही तर पहारेकऱ्यांनाही आवडत नसे.त्याला माझ्या बाजूने कसं ओढायचं याचा विचार करण्यात वज्रने चार दिवस घालवले. त्याला विश्वासात घेतल्याशिवाय वज्रला बाहेर पडता येणार नव्हतं.शेवटी त्याने धोका स्वीकारायचं ठरवलं.एका रात्री दोन-सव्वादोन च्या सुमाराला यक्ष बंदिष्टी घोरत होता तेव्हा वज्रने दबक्या आवाजात त्याला उठवलं.

“ बंदिष्टी, ऐक, मी पळून जातोय. तू माझ्या बरोबर येणार आहेस? तयार असशील तर दोघांनी पळण्याचा प्लान माझ्या कडे आहे.” तो जागा झाल्याचे लक्षात येताच वज्र त्याच्या कानापाशी कुजबुजला.

“ अक्कल आहे का तुला, काय बोलतोयस कळतंय का?” बंदिष्टीम्हणाला.

“ माझी पूर्ण तयारी झाल्ये. पहाटे जेव्हा डोगरा सगळ्या कुत्र्यांना खायला घालायला राहुटीत नेतो तेव्हा आपण डाव साधायचाय.फुल प्रुफ प्लांनिंग तयार आहे,पण अत्ता सांगायला वेळ नाहीये.माझ्यावर विश्वास असेल तर हो म्हण.मी जाणारच आहे.” वज्र म्हणाला.

“ इथून जाणार कसं मूर्खा? आपले पाय जखडून ठेवलंत साखळदंडाला, शिवाय खोलीला लॅच आहे.” तो म्हणाला.

“ आयुष्यभर दुसऱ्यांच्या तिजोऱ्या उघडण्याची नोकरी केल्ये मी. कुठलेही कुलूप मी तारेने सुद्धा उघडू शकतो.मी आधीच माझ्या पायाची साखळी मोकळी केल्ये.तुझी पण लगेच करतो.बाहेरचे कुलूप उघडायला जरा मोठी आणि जाड तार लागेल, मी आपल्या बंक बेड ची स्प्रिंग हुकातून काढून ठेवल्ये.त्याने मी मेन गेट चे लॅच उघडीन.”

वज्रच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून बंदिष्टी एकदम सावध झाला,

“ बाहेर पडल्यावर कुठे जायचं?” त्याने विचारलं.

“ जेल बाहेर एक-दीड किलोमीटर अंतरावर नाग नदी आहे.त्याच्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे. तू शंका विचारतो आहेस म्हणजे येणार आहे असं समजू का?” वज्र ने विचारलं.

“ माझे पाय मोकळे कर.” बंदिष्टी म्हणाला.वज्रने आपल्या जवळच्या एका तारेने त्याच्या पायाची साखळी उघडली. ती उघडताच तो अवाढव्य बंदिष्टी आपल्या अंथरुणातून उठला.वज्रचा गळा दाबून तो म्हणाला,

“ तुझ्या स्वार्थासाठी माझा बळी देणार असशील तर तुला सोडणार नाही.” वज्रने कशीबशी आपली मान त्याच्या पकडीतून सोडवली.

“ विश्वास नसेल तर येऊ नकोस माझ्या बरोबर.आधीच तुला बोललो होतो.” वज्र म्हणाला.

हे सगळं बोलणं अगदी हळू आवाजात चालू होतं तरीही बाजूचा एक कैदी काहीतरी झोपेत बोलला आणि आपली कूस बदलून पुन्हा झोपला.

“ येतो मी.” बंदिष्टी म्हणाला.

“ आपण इथून बाहेर पळालो की नदीच्या दिशेने जायचं.तिथे पोचलो की तू आणि मी वेगळे होवू.कारण आपण एकत्र राहिलो तर त्यांना आपल्याला शोधणे सोपे जाईल.आपल्या मागे ते कुत्रे सोडतील.पण एकदा आपण नदी ओलांडली की कुत्र्यांना चकवा देऊ शकतो. तुला पोहता येत?” वज्रने विचारलं.

“ मला काय येतं आणि काय नाही याची चिंता करू नको. तू फक्त दार उघडायचं बघ.पुढचं माझं मी बघेन. ”

वज्र आणि बंदिष्टीचं एकमत झालं आणि दोघेही पहाटेची वाट बघत पडून राहिले.पहाटे केव्हातरी दोन कुत्रे एकमेकांवर गुरगुरले.त्या आवाजाने दोघांना जाग आली.

“ साली ही कुत्री आहेत की वाघ!” एवढा धिप्पाड बंदिष्टी सुद्धा टरकला होता.

“ त्यांना खायला दिलं की शांत होतील.” वज्र म्हणाला.

आणखी अर्धा तासाने गुरगुरणारी कुत्री वाढली.दोन ऐवजी तीन चार असं भुंकण्याचे आवाज वाढले आणि वज्रच्या लक्षात आलं डोगरात्यांना आता त्यांच्या राहुटीत नेऊन खायला द्यायला निघालाय.वज्रचं हृदय धडधडायला लागलं. आपल्या लेंग्याच्या नाडी ओवलेल्या शिवणीत मिरपूडची पुडी खोचल्याची खात्री त्याने केली.ही युक्ती तो फक्त स्वत:पुरती वापरणार होता.

“ तू नक्की फसवणार नाहीस ना मला?” बंदिष्टी ने पुन्हा खात्री करून घेतली.भुंकण्याच्या आवाजाने कैदी चुळबुळ करायला लागले होतं.त्यातल्या एखाद्याने उठून धोक्याची घंटा वाजवली तर अनर्थ झाला असता.आयुष्यभर इथेच राहायला लागलं असतं.

“ मी दाराचं लॅच उघडतोय, तू इतरांकडे लक्ष ठेव.” वज्र म्हणाला आणि हातात बंकबेड ची उपटलेली स्प्रिंग घेऊन दाराच्या दिशेने वळला.

“ ए! काय करताय तुम्ही लोक?” एक कैदी उठून उभा रहात म्हणाला.

बंदिष्टी त्या कैद्याच्या दिशेने झेपावला.आपल्या डाव्या हाताची सणसणीत चपराक त्या कैद्याच्या कानाखाली ठेवली आणि म्हणाला,

“ कळलं? काय करतोय ते? ”

पण तो कैदी उत्तरं देण्याच्या अवस्थेत नव्हता.

“ आणखी कुणाला काही विचारायचंय? ” बंदिष्टी आव्हान देत म्हणाला.सगळे चडीचूप झालं.वज्रच्या अपेक्षे पेक्षा दाराचे कुलूप पटकन निघालं.

“ चल.” त्रोटकपणे वज्र बंदिष्टीला म्हणाला.पण त्याच्या पाठीच्या कण्यातून एक सूक्ष्म लहर शिरशिरत गेली. उजव्या बाजूला त्याने पाहिलं,तर डोगरा कुत्र्यांना खायला घालत होता.त्याची पाठ वज्रकडे होती.क्षणाही विलंब न लावता वज्र धावत सुटला.एकदाच त्याने मागे वळून आपल्या मागे बंदिष्टी येतोय का हे पहिले.तो येत होता,पण तो वेगाने कमी पडत होता.

अचानक वज्रने बंदुकीचा आवाज ऐकला.कुत्र्याच्या घरातून डोगरा बाहेर पडत होता आणि त्याच्या हातात बंदूक होती.त्या पाठोपाठ कुत्रे बाहेर सोडले गेले.ते आपल्या सावजावर हल्ला करायला टपले होतं. वज्र आता नदीच्या काठावर घातलेल्या कुंपणापासून फक्त शंभर फुटावर होता आणि त्याच्या मागे आणखी शंभर फुटावर बंदिष्टी. जोरजोरात शिट्ट्या फुंकण्याचे आवाज यायला लागले आणि वज्रने ओळखलं की आता इतर पहारेकरी सुद्धा आपल्या मागे येणार, अगदी काही मिनिटातच.त्याने आपला वेग वाढवला.आणि समोर कुंपण दिसताच त्याने मागचा पुढचा विचार न करता कुंपणातून आरपार झेप टाकली. पलीकडे बरीच झुडपं होती. घनदाट.त्यातल्या एका झुडपात वज्र घुसला आणि स्थिरावला. त्याच्या पाठोपाठ बंदिष्टी सुद्धा एका झुडपात घुसल्याचं वज्रला दिसलं.पण त्याने वज्रला बघितलं नव्हतं.

“ ए! कुठे आहेस तू?” त्याने वज्रला आवाज दिला.वज्रने त्याला उत्तर दिलं नाही.त्याला तो आपल्या बरोबर नकोच होता.त्याने आधी सुद्धा त्याला कल्पना दिली होती तशी.

थोडा वेळ वाट बघून त्याने नदीत उडी मारली आणि पलीकडच्या काठाच्या जोरजोरात पोहायला सुरवात केली.तो पट्टीचा पोहणारा वाटत होता. तो दिसेनासा झाल्यावर वज्रने आपल्या लेंग्याच्या नाडीच्या पट्टीत ठेवलंली मिरपुडीची पुरचुंडी बाहेर काढली आणि आपल्या सर्वांगाला फासली.

बंदिष्टी दिसत नाहीसा झाल्यावर वज्र नदीच्या काठा काठाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळत राहिला.शिट्ट्यांचे आवाज जवळ यायला लागले.वज्र पुन्हा एका झुडपाच्या आश्रयाला दडून बसला.अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.नदीच्या दिशेने गोळी झाडली गेली होती.काही पहारेकरी नदीत उतरले.त्यांच्या हातात बंदुका होत्या.आणखी दोन तीन गोळ्या झाडल्या गेल्या.बंदिष्टी बराचसा पाण्याखालूनच पोहत होता त्यामुळे पहारेकरी त्याला बघू शकत नव्हतं. बंदिष्टी मधेच श्वास घ्यायला वर आला आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन अचानक पलीकडच्या काठच्या दिशेने जायचा विचार बदलून वज्रच्या दिशेने पोहू लागला. ते एका पहारेकऱ्याला दिसलं.त्याने ओरडून इतरांना सावध केलं आणि पाण्यात उडी मारली.पाण्यात त्याची आणि बंदिष्टी ची झटापट झाली.आडदांड बंदिष्टी पुढे त्याचं काही चाललं नाही.थोड्या वेळासाठी बंदिष्टी वर आला, पहारेकऱ्याचं डोकं त्याने आपल्या मजबूत हातांनी खाली दाबून धरलं.तो पहारेकरी पुन्हा पाण्यातून बाहेर आला तो प्राण सोडल्यावर तरंगत. पण ही झटापट होतं असताना दुसऱ्या पहारेकऱ्याने अचुक नेम बंदिष्टी च्या डोक्यावर धरून गोळी झाडली.पाण्यावर लालिमा पसरला.वज्र उभा होता त्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन सोळा कि.मी. होतं.आता नदी ओलांडून पलीकडे जायची वेळ आली होती.त्याने आपला लेंगा काढून डोक्याला घट्ट बांधला आणि पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर आला.

« PreviousChapter ListNext »