प्रकरण १०
ते दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिले.
अथांग पहिला सावरला. त्याच्या चेहऱ्यावर उडलेला रंग पुन्हा चढला, त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी, उपहासात्मक हास्यरेषा उमटली, जी वज्रला चांगलीच परिचित होती. तो धावत वज्रच्या दिशेने येऊ लागला.
"वज्र! खरंच तू आहेस का? तुला पाहून किती आनंद झालाय!"
याच क्षणी वज्रला पूर्णपणे जाणवलं की तो त्याला किती मिस करत होता.कित्येक महिने त्याच्या सोबतीशिवाय किती एकटं आणि असुरक्षित वाटलं होतं.अथांगने त्याला घट्ट मिठी मारली.
"तू इथपर्यंत कसा पोहोचलास आणि हा अवतार काय?" अथांगने त्याच्याकडे पाहत विचारलं.
वज्रने त्याला थोडक्यात घडलेली हकीगत सांगितली- नागपूरच्या तुरुंगातून पळणे, तो घाट रस्ता, पलाश घोष आणि सांजचा तो धोकादायक खेळ. अथांग लक्षपूर्वक ऐकत होता.
"तुला माहिती आहे वज्र, नागपूर पोलीस तुझ्या मागावर आहेत आणि त्यांनी तुझे वर्णन पूर्ण पश्चिम बंगालमध्ये पाठवले आहे" अथांगने गंभीरपणे सांगितले.
"मला माहित आहे अथांग पण सध्या मला ती तिजोरी उघडायची आहे ज्यासाठी मला अडकवण्यात आले होते" वज्र म्हणाला.
अथांग एका मोठ्या कंपनीत सेक्युरिटी एक्सपर्ट म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे अनेक गुप्त माहिती होती. त्याने वज्रला कलकत्त्याच्या एका जुन्या वाड्यात नेलं जिथे त्या तिजोरीचे गुपित दडलेलं होतं.
"हे बघ वज्र, ती तिजोरी इथे आहे आणि ही उघडणं सोपं नाहीये पण मला वाटतं तुझ्याशिवाय हे कोणीच करू शकणार नाही" अथांगने एका मोठ्या लोखंडी दरवाजाकडे बोट दाखवून सांगितलं.
वज्रच्या डोळ्यात चमक आली. त्याला आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची संधी मिळाली होती. त्याने आपली अवजारे बाहेर काढली आणि तिजोरी उघडण्याच्या कामात मग्न झाला. बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येत होते पण वज्रला आता कशाचीच भीती नव्हती. कलकत्त्याच्या त्या रात्रीत एक मोठं सत्य उघड होणार होतं.