प्रकरण १
नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. पाच मिनिटे उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिस मधून निघून गेला असता.. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्याने फोन उचलला.
“अभेद्य सेफ कॉर्पोरेशन” तो यांत्रिकपणे म्हणाला.
“मी हितेंद्र कपूर” फोन मधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज यायचा. ९०% प्रकरणात उसका अंदाज बरोबर ठरला होता..
पैशाचा आणि सत्तेचा माज असलेले लोक ज्या आवाजात बोलतात तसा हा आवाज होता.
“तू किंवा तुझा माणूस किती लवकर इथे येऊ शकता? मला माझ्या तिजोरी मध्ये एक प्रॉब्लेम आलाय.” पलीकडचा आवाज म्हणाला.
लागली वाट. वज्रला, सूज्ञाला, म्हणजे त्याच्या मैत्रिणीला घेऊन आज रात्री भारीतल्या रेस्टॉरंटला जायचं होतं. आज जर तो गेला नसता तर तिसऱ्यांदा तिला फसवण्याचे पातक त्याच्या हातून घडलं असतं. या फोनमुळे पार वाट लागली होती.
“आपण कुठे आहात सर?” आवाजात शक्य तेवढा नम्रपणा आणि मृदूपणा आणत वज्रने विचारलं कारण फोन रेकॉर्ड होतोय हे त्याला माहिती होतं. आणि कस्टमर वर गुरकल्यामुळे यापूर्वी एक दोनदा तो चांगलाच अडचणीत सापडला होता.
“एलिट पार्क व्ह्यू.स्वावलंबी नगर. मला तुझा माणूस ताबडतोब इथे हवा आहे.” पलीकडून पुन्हा आज्ञा झाली.
वज्रने जर त्याला सांगितलं असतं की आता रात्री अकरा वाजलेत आणि ऑफिस आता बंद झालंय तर मालकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता..
“तिजोरी मध्ये नेमका काय प्रॉब्लेम झालाय मला सांगाल का?” त्याने पुन्हा विनम्र आवाजात विचारलं.
“माझी किल्ली हरवल्ये. ताबडतोब माणूस पाठव ना इथे !” पलीकडून आवाज आला आणि फोन बंद झाला. एलिट पार्क व्ह्यू.स्वावलंबी नगर हा नागपूर मधील उच्चभ्रू लोकांच्या वसाहतीचा भाग. हा भाग इथून बऱ्यापैकी लांब होता. आता त्याचा हॉटेलिंग चा कार्यक्रम वगैरे सगळं बोंबलत होतं त्याने मुकाट तिजोरी उघडण्याची हत्यार ठेवलंली बॅग घेतली आणि बाहेर पडला. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. बाहेर ट्रॅफिक खूप जाम झालं होतं आणि ऑफिसातून तिला फोन करण्याची सोय नव्हती कारण तो खाजगी कॉल रेकॉर्ड झाला असता. त्याने बाहेर पडून एका दुकानातून तिला फोन लावला.
“तुला शेवटच सांगते, तू आजही येणार नसशील तर जो वेळा पाळतो अशा कुणाला तरी मी शोधेन.” एवढेच निर्वाणीचं बोलून तिने फोन खाली ठेवला. त्याने पुन्हा पुन्हा तिला फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचलला नाही. आपल्या नोकरीला, स्वत:च्या दुर्दैवाला आणि बाहेर पडणाऱ्या पावसाला शिवीगाळ करत त्याने गाडी एलिट पार्क व्ह्यू.स्वावलंबी नगर ला नेली.. तिथल्या वॉचमनला पत्ता विचारला. कपूरचं घर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे त्यांने सांगितलं. वर जाऊन कपूरच्या दारावरची बेल वाजवली. दार उघडलं गेलं. हितेंद्र कपूर हा एक उंच जाडजूड आणि आवाजावरून अंदाज वाटला तसाच एक उद्धट माणूस होता. वज्र दारातून टूलकिट असलेली बॅग घेऊन आत जायला लागला तेव्हा त्याने वज्रकडे अशा काही नजरेने बघितलं की त्याने तिथे यायला कितीतरी उशीर केला आहे. त्याला तो त्याच्या बरोबर त्याच्या आतल्या खोलीत घेऊन गेला. भिंतीवर एका अर्धनग्न युवतीचं पेंटिंग होतं. ते त्याने एक खटका दाबून बाजूला केलं आत मध्ये कंपनीने तयार केलंली एक तिजोरी होती. बॅग मधून त्याने हत्यार बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा सोफ्यावर लोळत असलेल्या एका स्त्रीची जाणीव त्याला झाली. एका महागड्या गाऊन मध्ये एक मासिक चालत ती आडवी पडली होती
तिला बघितल्यावर वज्रला सूज्ञा ची आठवण आली अर्थात त्याची मैत्रीण खूप साधी होती आणि ही सोप्यावर पडलेली बाई एकदम खानदानी वाटत होती.
“किती वेळ लागेल तुला उघडायला? मला खूप घाई आहे.” कपूर म्हणाला.
“फार वेळ नाही लागणार, तुम्ही मला तुमचा कोड नंबर सांगितला तर.” वज्र म्हणाला.
एका कागदावर त्याने कोड नंबर खरडला आणि कागद वज्रकडे भिरकावला.
“लवकर काम आटप तुझं, या थेरड्याने मला मोत्याचा नेकलेस द्यायचं कबूल केलंय. त्याचं मत बदलायच्या आत तिजोरी उघड.” ती बाई थेट वज्रकडे बघत म्हणाली
‘सूज्ञाला जेव्हा काही हवं असायचं तेव्हा ती असंच माझ्याकडे थेट नजर देऊन मागायची’ वज्रच्या मनात आलं.
“काळजी करू नका तीन मिनिटात मी उघडतो.” वज्र म्हणाला.
पुढच्या अडीच मिनिटात त्याने ती सेफ उघडली होती
“अरे! किती सोपी होती उघडायला! एखाद्या मुलाने सुद्धा उघडली असती.” ती म्हणाली.
तिजोरी उघडल्यावर आतल्या बाजूला वज्रची नजर गेली. आतल्या खणात १०० आणि ५०० रुपयाच्या नोटांची थप्पीच्या थप्पी होती. वीस पंचवीस लाख रुपये तर सहज असावेत. ती तरुणी सोफ्यावरून उठली आणि वज्रच्या शेजारी तिजोरी जवळ येऊन बसली. इतकी खेटून बसली की तिच्या अंगाला लावलेल्या परफ्युमचा सुगंध त्याला आला. तिचा दंड त्याच्या दंडाला चिकटला होता.
“अलीबाबाची गुहा” ती एकदम ओरडली . “काय करूया आपण या पैशाचं?” ती म्हणाली.
तिजोरी उघडेपर्यंत कपूर दुसऱ्या खोलीत फोन करण्यासाठी गेला होता. त्याने फोन खाली ठेवल्याचा आवाज वज्रला ऐकू आला. तिलाही तो ऐकू आला असावा ती पटकन उठली आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली. वज्रने तिजोरी बंद केली तेवढ्यात कपूर आत आला
“अजून उघडता आली नाही का तुला?” तो डाफरला
तो नसताना आधीच तिजोरी उघडली आहे आणि आतल्या नोटांकडे वज्रचं लक्ष गेलं आहे हे त्याच्या लक्षात येणं बरोबर नव्हतं म्हणून तो म्हणाला,
“आता एकच सेकंद सर.” आणि असं म्हणून त्याने तिजोरी चा हँडल फिरवलं
“हं उघडली आता.” तो म्हणाला. कपूर तिजोरी जवळ आला त्याने दार किलकिल करून आत नजर टाकली आणि परत गुरगुरला
“याची एक डुप्लिकेट किल्ली मला करून दे.” कपूर म्हणाला.
वज्र हो म्हणाला. आणि हत्यार घेऊन निघाला. जाताना सोफ्यावर बसलेल्या त्या तरुणीला गुड नाईट केलं तिने त्याच्याकडे बघून नुसतीच मान ठेवली कपूरने पैसे चुकले केलं.
“पुढच्या वेळेला परत जर कधी गरज लागली तर आत्ता आलास त्याच्यापेक्षा लवकर ये आणि डुप्लिकेट किल्ली आणायला विसरू नकोस.” कपूर ओरडला.
वज्र तिथून निघाला आणि पुन्हा ऑफिसला आला. इतकी पैशांची रास ! त्याने यापूर्वी आयुष्यात कधी एवढे पैसे बघितले नव्हतं. त्याला सतत डोळ्यासमोर तिजोरीतल्या पैशांची थप्पी दिसत होती या नोकरीतून तर एवढे पैसे कधीच मिळवता आले नसतं. समजा एवढे पैसे असते तर त्याने काय केलं असतं? त्या कपूरच्या फ्लॅटमध्ये जाऊन ती तिजोरी उघडणं कितपत सहज साध्य होईल? असा एक विचार त्याच्या मनात आला. पण त्याने मनाला बजावलं. ड्युटी संपवून त्याला मोकळं करायला ऑफिसचा दुसरा कर्मचारी अथांग आहुजा आला. तोपर्यंत त्याच्या मनात तिजोरीतल्या पैशांचा विचार येतच होता. अथांग आणि तो मित्र होतं. शाळेतही ते एकत्र होतं. त्याच्या वडिलांनी अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मध्ये त्याला ज्या दिवशी नोकरीला लावलं त्या दिवशी वज्रला ही तिथे नोकरीला लावायचा विचार त्याच्या वडिलांच्या मनात आला. अथांग आणि वज्रची देहयष्टी खूपशी सारखी होती. वज्र सारखाच तो उंच दिपाड किंचित काळसर वर्णाचा होता. ओठावर एक पेन्सिलची रेघ काढल्यासारखी पातळ मिशी त्याने ठेवली होती. वज्र सारखीच त्यालाही पैशाची खाज होती. फरक एवढाच होता की त्याच्या आयुष्यात स्त्रीला फारसं महत्त्व नव्हतं १९ व्या वर्षीच त्याचं लग्न झालं होतं. पण ते यशस्वी झालं नाही एक वर्षातच त्याची बायको त्याला सोडून गेली होती. त्यामुळे त्यांचा बायकांवर राग होता. घोड्यावर पैसे लावायची त्याला सवय होती. त्यामुळे कायम तो तंगीत असायचा. आणि वज्र कडून उधार पैसे घ्यायचा.वज्रने त्याला कपूरच्या तिजोरीत असलेल्या पैशांबद्दल सांगितलं. कपूरच्या घरी असलेल्या त्या तरुणीबद्दलही सांगितलं.
“कल्पना कर, एवढ्या पैशाचे मालक असण्याची कल्पना कर” वज्र त्याला म्हणाला
“एवढे पैसे होतं?” तो आश्चर्याने म्हणाला.
“तिजोरीतले तीन कप्पे खचाखच भरून पाचशेच्या नोटा होत्या.” वज्र म्हणाला.
“जरा खाली बस, सविस्तर बोलू” अथांग म्हणाला
प्रत्यक्ष दोघांनी बोलायला सुरुवात न करताच दोघानाही कळून चुकलं होतं की तिजोरीतल्या त्या पैशाचा मोह दोघांनाही पडला होता. गरज दोघांनाही होती . त्यानंतर जवळजवळ तासभर खूप सविस्तर बोलून ते पैसे कसं हडप करायचे ते ठरवत बसले. जेवढं बोलले तेवढं ते सोप असल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं.
“हा कपूर नावाचा पंची आपल्या घरातून बाहेर कधी जातो हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे” अथांग म्हणाला. “ ते कळलं की आपण घरात शिरू. ती तिजोरी उघडू आणि पैसे घेऊन पोबारा करू. त्यांनी तुला डुप्लिकेट किल्ली करून आणायला सांगितलीच आहे ना? तू डुप्लिकेट किल्ली तयार करून त्याच्या घरी जा आणि वॉचमनशी बोल. कपूर कधी बाहेर गेलाय हे तो सांगेल. त्याला जरा बोलण्यात गुंतव. जेव्हा तो बाहेर जाईल आपण दोघे आत जाऊ आणि ते पैसे ताब्यात घेऊ." अथांग म्हणाला.
हे सगळं इतकं सोप्प होतं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वज्र ऑफिसचा युनिफॉर्म घालून कपूरच्या इमारतीतकडे रात्री साडेदहा नंतर गेला. त्याला अथांगने सांगितलं होतं की त्याची ड्युटी संपल्यानंतर तो टेम्पो घेऊन तिथे येईल आणि त्याला भेटेल.
वज्रच्या अपेक्षा नुसार वॉचमन त्याच्या छोट्या रूममध्ये बसलेला होता. वज्र कालच आल्यामुळे त्यांनी त्याला ओळखलं हसून मान डोलावली.
“अरे परत आलास तू? कपूर साहेबांना भेटायचं असंल तर सॉरी, ते बाहेर गेलेत” वॉचमन म्हणाला.
“कधी येतील ते परत?” वज्रने विचारलं .
अजून अर्धा तास तरी लागेल
“मी थांबतो त्यांना एक महत्त्वाची वस्तू द्यायची आहे .” -वज्र
“थांबायची गरज नाही. माझ्याकडे तू दिलीस तरी चालेल मी त्यांना देईन.” वॉचमन म्हणाला. वज्रने मान हलवली
“तिजोरीची किल्ली आहे ती. अशी तुझ्याकडे देता येणार नाही, मला ती वैयक्तिक कपूर साहेबांना देऊन त्यांच्याकडून पोच पावती ध्यावी लागेल.”
नाईलाज झाल्यासारखे वॉचमनने खांदे उडवले वज्रने त्याला त्याच्याकडील सिगरेट पाजली.
“अर्ध्या तासात येतील ना नक्की साहेब?”
“नक्की येतील. वेळेच्या बाबतीत ते कधी चुकत नाहीत. रोज आठ वाजता ते इथून बाहेर जातात आणि अकरा वाजता परत येतात.” वॉचमन म्हणाला.
“काही माणसं असतात तशी. त्यांच्या येण्या-जाण्यावर आपण घड्याळ लावू शकतो”
“हो. साहेब तसंच आहेत. त्यांच्या मालकीची तीन बार रेस्टॉरंट आहेत. रोज तिथे जाऊन ते सगळं व्यवस्थित आहे ना बघून येतात.. अगदी रविवारी सुद्धा. अकरा वाजता इथे येतात, जेवतात पुन्हा बाहेर जातात. रात्री एकच्या सुमाराला. आणि तिन्ही बार व्यवस्थित बंद झालं आहेत किंवा नाही ते बघतात.” वॉचमन ने माहिती पुरवली.
“तू रात्रभर ड्युटीवर असतोस की काय?” वज्रने विचारलं.
“रात्री एक नंतर मी सुट्टी घेतो. इथलं सगळं बंद करतो .इथे राहणाऱ्या सगळ्यांकडे किल्ली आहे, तरी पण मला कित्येक वेळेला रात्री उठावं लागतं. कारण इथे येणारे आपली किल्ली आणायला विसरतात.”
“कपूर साहेबांनी तर काल त्यांच्या तिजोरीची किल्ली हरवली त्यामुळे मला इथे येऊन ते काम करावे लागलं” वज्र म्हणाला.
“किल्ली हरवण्यात आमचे साहेब पटाईत आहेत.” वॉचमन म्हणाला. “मागच्याच आठवड्यात दाराची किल्ली त्यांनी हरवली पहाटे पाच वाजता त्यांनी मला उठवलं.”
“पहाटे पाच वाजता? म्हणजे तेव्हा ते परत येतात?” वज्रने आश्चर्याने विचारलं. म्हणजे आश्चर्य दाखवून विचारलं. खरं म्हणजे त्याला आनंदच होत होता.
“हो पाच वाजता येतात. आणि मग दिवसभर झोपून राहतात.”
वज्रला हवी ती सगळी माहिती मिळाली होती.त्याने हळूच विषय बदलला आणि हवा पाण्याबद्दल बोलत राहिला.
बरोबर अकराला एक मिनिट असताना कपूर आला
वज्र उठून त्याला सामोरा गेला.
“सर मी तुमची डुप्लिकेट किल्ली घेऊन आलो आहे.”
पटकन त्याच्या लक्षात आलं नाही, मग तो म्हणाला, “हो ! आण ती इकडे. मला एकदा लावून बघू दे ती व्यवस्थित झाली आहे ना.” तो म्हणाला. “चल वर.”
दोघे लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर आले त्याने त्याचं जवळच्या किल्ल्याने बाहेरचे दार उघडलं दोघे आत गेले.
“दाखव लावून” तो म्हणाला
तिजोरीला किल्ली लावत असतानाच तो शेजारी उभा होता आणि वज्रच्या डोक्यात एक वादळी कल्पना आली. समजा आत्ताच तिजोरी उघडल्या उघडल्या त्याला त्याच्या डोक्यात काहीतरी मारून खाली पाडलं आणि पैसे घेऊन पसार झाल तर? पण हा केवळ एक विचारच त्याच्या मनात आला प्रत्यक्षात त्याने तसं काहीच केलं नाही. त्याला किल्लीने तिजोरी उघडून दाखवली आणि त्याच्याकडे किल्ली सुपूर्द केली.
“व्यवस्थित उघडते आहे.” वज्र म्हणाला.
“ छान” तो म्हणाला आणि दिलेली किल्ली त्याने खिशात टाकली. वज्रला वाटलं होतं की तो आणखी पैसे काढून देईल पण त्याने वज्रला तिथून कटवलं.त्या क्षणीच वज्रची द्विधा मनस्थिती संपली आणि त्याने निश्चय केला की याला लुटायचाच.
वज्र बाहेर पडला. बाहेर अथांग उभा होता त्याची वाट बघत.
“ तो जाड्या, इथून थोड्या वेळापूर्वी गेला तोच कपूर होता का?” अथांग ने विचारलं.
“ तोच तो.”
अथांग च्या शेजारी गाडीत बसल्यावर वज्र म्हणाला, “ फार कठीण नाहीये त्यात.आपण येत्या रविवारीच निपटून टाकू.”
रविवार कधी आला कळल नाही.थोडा पाऊस पडत होता. अथांग वज्रकडे गाडी घेऊन आला. दोघे बाहेर पडले. एलिट पार्क व्ह्यू.स्वावलंबी नगरला ते पोचले तेव्हा रात्रीच्या एक वाजत आला होता. दोघेही गाडीत बसून राहिले.ते काही सरावलेले दरोडेखोर नव्हतं.पैशांची गरज आणि सहज मिळालेली संधी याचा फायदा घ्यायचा त्यांनी ठरवल होतं. दडपण आल्यामुळे दोघांच्या छातीचे ठोके वाढले होतं. बरोब्बर एक वाजला आणि कपूर आपल्या इमारतीच्या बाहेर पडतांना दिसला.त्यांच्या गाडी पासून पंचवीस तीस फुटावर त्याची जॅग्वार होती,त्यात तो बसला. आणि अंधारात आपली गाडी काढून दिसेनासा झाला.
“ एक अडथळा कमी झाला.” अथांग म्हणाला.
थोड्या वेळाने वॉचमनने गेट बंद केलं.लॉबीतून चालत पुढे चालत पायऱ्या उतरून बेसमेंट मधे अदृश्य झाला.
“ चल.” स्वत: गाडीतून खाली उतरत अथांग म्हणाला.पाठोपाठ वज्र उतरला. कोणी काय करायचं ठरवलं होतं.वज्र ने दरवाजा उघडायचं काम करायचं होतं तर अथांग नजर ठेवणार होता. कपूरच्या इमारतीतून रस्त्यावरच दिसत नव्हतं. म्हणजे अनपेक्षित पणे कोणी समोर आला तरच ते दोघे दृष्टीस पडले असते. अन्यथा नाही. त्या दृष्टीने ते दोघेही सुरक्षित होतं.
सगळ्यात आधी वज्र समोर बाहेरच काचेचं दार उघडायचं आव्हान होतं. इतर वेळी त्याने दोन मिनिटातच ते उघडलं असतं पण अत्ता या वातावरणात त्याने तब्बल पाच मिनिटं घेतली. दोघे आत आले.आता वर जायचं होतं.लिफ्ट वापरायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला कारण त्या आवाजाने वॉचमन सतर्क झाला असता.सावकाश जिन्याने चालत ते वर आले.कपूरच्या हॉलचं दार समोर होतं.वज्रला ते उघडायला वेळ लागला नाही.आपल्या जवळच्या मास्टर की च्या बंच मधून त्याने काढलेल्या पहिल्याच किल्लीने किमया केली.दार ढकलून दोघेही आत आले.मिट्ट अंधारात फक्त घड्याळाचा आवाज येत होता पण तोच भयाण पणा वाढवत होता. एवढ्यात एकदम किंण असा आवाज झाला.दोघेही दचकले. किचन मधल्या फ्रीज चा आवाज होता तो.
“ चल, आवर पटकन.कशाची वाट बघतोयस?” अथांगने त्याला ढोसले. वज्र त्याला घेऊन आता तिजोरी असलेल्या खोलीत आला.
“ इथे कुठाय तिजोरी?” अथांगने विचारलं. वज्र ने भिंतीवरच्या नग्न युवतीच्या पेंटिंग कडे इशारा केला पुढे होवून ते चित्र बाजूला केलं. आतल्या तिजोरीशी त्याची मैत्री झाली होती. त्याला कोड नंबर माहित होता आणि त्याची किल्ली पण होती. कपूर साठी डुप्लिकेट किल्ली बनवताना त्याने आजच्या या कामासाठी आणखी एक किल्ली बनवली होती.तिजोरी उघडल्यावर आतल्या नोटा पाहून अथांग चे डोळे फिरले.
“ आयुष्यभर आपण ऐयाशित राहू. ” तो उद्गारला.
त्याच क्षणी तो आवाज दोघांनी ऐकला आणि ते थिजले. बाहेरून दाराला किल्ली लावून ते उघडलं जात होतं.
दार उघडलं जाताच बाहेरच्या उजेडाची तिरीप आत आली, ती थेट त्या दोघांवर पडली.त्या प्रकाशात दोघांना दिसलं की एक उंचपुरी स्त्री ची आकृती दारात उभी होती.तिची आणि वज्रची क्षणाकरता नजरा-नजर झाली आणि ती मोठ्याने किंचाळली.
दोघांच्या डोक्याला विजेचा धक्का बसावा तशा मुंग्या आल्या.
“ चोर! चोर sss” ती ओरडली. “ कोणीतरी आहे तिथं.... .”
कपूरची अवज्रड आकृती तिच्या मागोमाग दारात आली.तिला बाजूला ढकलून देऊन तो खोलीत आला.सताड उघड्या तिजोरी समोर दोघेही आ वाचून उभे होतं.एखाद्या रेल्वेची शिट्टी वाजवी तशी किंचाळत ती स्त्री पायऱ्या उतरून खाली गेली. अथांग ची आकृती वज्रला भिंतीला खेटून उभी रहात असलेली दिसली.कपूरला तो दिसत नसणार.आत येततानाच कपूर वज्रच्या दिशेने झेपावला. त्याचे हात वज्र ची मान दाबायला आसुसले होतं.तेवढ्यात अथांग हातात एक दंडुका घेऊन त्याच्या मागे आला आणि त्याच्या डोक्यावर एक जबरदस्त फटका त्याने मारला.एखाद झाड उन्मळून पडावं तसा तो खाली कोसळला.
“ चल लगेच बाहेर पडू.” अथांग म्हणाला.
दोघंही दाराकडे धावले.वज्र जिन्याचा दिशेने पळत सुटला. मागून अथांग ने आवाज दिला,
“ खाली नाही, वर.”
पण तो पर्यंत वज्रने जिना उतरायला सुरुवात केली होती.इथून बाहेर पडणे हा एकमेव विचार त्याच्या डोक्यात होता.तो दुसऱ्या मजल्यावर आला आणि समोरच्या फ़्लॅट चे दार अचानक उघडलं गेलं.ते उघडणाऱ्या माणसाची आणि त्याची नजरा नजर झाली आणि घाबरून त्याने दार बंद केलं.पुढच्या पायरीवर त्याचा पाय घसरला आणि तो लॉबीत पडला.ती स्त्री समोरच वॉचमन च्या रूम जवळ उभी असलेली वज्रला दिसली.वाज्रला बघून ती पुन्हा किंचाळली आणि बेसमेंट मधून वॉचमन ने धावत येऊन वज्रच्या अंगावर झेप घेतली.दोघेही एकमेकांवरून गडगडत, धडपडतलांब फेकले गेले.वॉचमन ने च्या पकडीतून कशीबशी वज्र ने आपली सुटला करून घेतली.ती स्त्री अजून किंचाळतच होती. वॉचमन
ने अब खिशातून शिट्टी काढून वाजवायला सुरुवात केली.ते दोन्ही आवाज एकमेकात मिसळून एकच कल्लोळ निर्माण झाला.
त्याचे हृदय धडधडत होतं आणि चेहऱ्यावरून घाम येत होता, वज्र कसाबसा रस्त्यावर आला आणि दमून खाली कोसळला.त्याला मागे ओरडणाऱ्या एका माणसाचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं तर एका माणसाची सावलीत आकृती दिसली, जो त्याच्या मागे रस्त्यावरून येत होता.
त्याही स्थितीत पुन्हा उठून वज्र पळत राहिला, मग बंदुकीचा आवाज ऐकू आला आणि त्याच्या तोंडावरून काहीतरी मधमाशी सारखं फटकारून गेल्याचा भास झाला.पुन्हा त्याने पळायचा प्रयत्न केला, पण त्याच्या मानेवर एक अवाढव्य हाताची पकड बसली आणि तो रस्त्यावर कोसळला.पाठीतून एक जीवघेणी कळ आली. जागेपणाची त्याला झालंली शेवटची जाणीव म्हणजे दमदार पावलांचे आवाज त्याच्या दिशेने येत होतं.