Get it on Google Play
Download on the App Store

कोंढाण्याची चढाई

बंदिग्रह रक्षणाची जबाबदारी आज विष्णूवर होती. तोरणा किल्याचे बंदीगृह फारच जुने होते. अनेक वर्षे कदाचित वापरात नसल्यामुळे पोलादाला जंग चढला होता आणि एक कुबट वास हवेत पसरला होता. एकूण दोनच छोट्या खोल्या बंदिगृहाला होत्या. जुनाट पद्धती प्रमाणे दरवाजे लाकडी होते आणि पोलादी कड्यांनी त्यांना जखडून ठेवले होते. खाली एक छोटी खिडकी होती ज्यातून पाणी आणि जेवण पुरवले जावू शकत असे. नैसर्गिक विधीसाठी आतंच सोय होती. एका खोलीत एक वेडी स्त्री आणि दुसर्या खोलींत एक कुणी तरी डाकू होता. आतून काहीही हालचाल नव्हती आणि आज दिवसभर इथेच बसुन राहायचे ह्या विचाराने विष्णू कंटाळला होता. संताजी, गणेश इत्यादी सगळे जण शिकारी साठी गेले होते.

विष्णू भीतीला पाठ लावून बसला होता इतक्यांत कुणाची तरी हालचाल ऐकू येवून तो उठून बसला. येणारी आकृती आणखी कुणाची नसून साक्षांत आई साहेबांची होती. आई साहेब आणि बरोबर एक दासी होती. "आई साहेब आपण इथे ?" विष्णूने प्रणाम करून राजमातेला विचारले.

"ती संन्यासिनी कुठल्या खोलींत आहे ? " मला भेटायचे आहे तिला. विष्णूला ती स्त्री कुठल्या खोलीत होती हे ठावूक नसल्याने तो शरमिंदा झाला पण आई साहेबांनी ते ओळखले. "अरे ठावूक नसेल तर दार वाजवून विचार." आई साहेबांनी हुकुम सोडला. विष्णू पहिले दार वाजविण्यासाठी पुढे सरसावला मात्र पण आतून आधीच आवाज आला. "इथे टाकलेय तुझ्या पराक्रमी कार्ट्याने मला".

आई साहेबांच्या इशाऱ्यावरून विष्णूने दरवाज्याची कडी काढली. दर काढता काढता एक हाथ तलवारीवर ठेवायला तो विसरला नाही. आई साहेब आज अंगरक्षक न घेताच आल्या होत्या. काही अघटीत घटले तर आपली खैर नाही हे तो जाणून होता. दरवाजा उघडला तर आंत एक स्त्री कोन्यांत पद्मासन घालून पूर्ण विवस्त्र अवस्थेंत बसली होती. तिचे लांब जटा रुपी केस संपूर्ण शरीरभर सर्पां प्रमाणे पसरले होते. काल पासून ठेवेलेले पाणी आणि अन्न दारापुढे तसेच पडून होते. तिचे वस्त्र आणि झोळी दूर कोपर्यांत पडून होती. ते एकूणच दृश्य पाहून विष्णूच्या अंगावर कांटा आला. आई साहेबांनी हलकेच हाताचा इशारा करून विष्णूला बाजूला केले आणि स्वतः आंत गेल्या बरोबरच्या दासींनी दार आतून बंद केले आणि विष्णू मात्र बाहेर थिजून राहिला. अश्या प्रकारे राजमातेने एका धोकादायक कैद्या बरोबर राहणे त्याला बरोबर वाटत नव्हते पण काही बोलण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती.

कोठडीत एक विलक्षण शांतता पसरली होती. अग्निशिखाने ढुंकूनही आई साहेबां कडे पहिले नव्हते. ती चेहऱ्यावर एका लांग्याप्रमाणे अविर्भाव ठेवून कोपर्यात नजर लावून बसली होती. आई साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धां काहीच भाव नव्हते. त्या शांतातेंत आईसाहेबांची दासी मात्र थोडी विचलित होत होती.

आई साहेबांची शांतता मोडली "संन्यासी आणि ब्राम्हणांना त्रास देवू नये हेच संस्कार मी माझ्या मुलाला दिले आहेत, आपणाला ह्या कोठडीत त्याने टाकाले म्हणून त्याच्या वतीने मी आपली क्षमा मांगते. पण न्याय देणे हे सुद्धा त्याचे कर्तव्य आहे त्यामुळे जो पर्यंत आपण सत्य सांगणार नाहीत तो पर्यंत आपली इथून सुटका होणे शक्य नाही. "

अग्निशिखाने आपली मान हळुवार हलवत आई साहेबां कडे पाहिले. एखाद्या माजराने उंदराची शिकार करुन त्याचाकडे पाहावे तसे ती पाहत होती. "तू ठेवणार मला कोठडीत ? महावराहाची इच्छा झाली म्हणून मी इथे आले. महावराहा ची इच्छा झाली तरच तरच जाईन. "महावराहा ची भक्त ? " अहिसाहेबानी किंचित आश्चर्याने विचारले. "महावराह संप्रदायाचा म्लेंच्छानी १०० वर्ष पूर्वीच वंशछेद केला होता असे आम्ही ऐकून होतो.”

"म्लेंच्छ लोकांचे ह्या भूमीवर आगमन होण्यापूर्वी आणि ज्या काळांत दैत्य आणि दानव ह्या भूमीवर विहार करत होते तेंव्हा पासून महावराहाचे वंशज भारतवर्षभर फिरत होते. म्लेंच्छ लोकांनी आम्हाला नाही मारले, काळाच्या उदरात आम्ही गडप होणे महावराहाचीच इच्छा. काही जण वाचले हि सुद्धा त्याचीच इच्छा. काळ आपली कूस बदलत आहे, संकटाचे काळे ढग सर्व भारतवर्षभर पसरत आहेत. तुझा पुत्र कदाचित त्यात सूर्या प्रमाणे तेज दाखवील किंवा काजव्याप्रमाणे मरून जाईल. संकटची सूचना द्यायला मला महावराहाने पाठवले आहे, जास्त वेळ नाही आमच्या जवळ. पुढील संकटे तुम्हालाच झेलायची आहेत." अग्निशिखा बोलली. आई साहेबांना तिच्या आवाजांत थोडीशी भावुकता जाणवली. पहिल्यांदाच तिला ती माणसा सारखी वाटली.

"तुझी शक्ती तुझ्या भक्तीत आहे. महावराहावरची श्रद्धा संकटातून तुझी सुटका करते. संन्यासी माणसाला काळ कोठडी काय किंवा जल महाल काय, जे काही होईल ते त्याची इच्छा म्हणून तो स्तिथप्रद्न्य राहू शकतो, पण माझा मुलगा राजा आहे. त्याची शक्ती त्याची न्यायबुद्धी, निरपेक्षकर्तव्य दक्षता आणि सेवकांची स्वामी भक्ती ह्यांत आहे. त्याला मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य उभारायचे आहे. हे सर्व श्री ची इच्छा म्हणून भलेही तो ते करेल पण ते ओझे त्याच्या मानवी खांद्यानाच उचलायचे आहे. जादूटोना , बाष्कळ भविष्य कथन वगैरे गोष्टींवर दुर्बळ लोक अवलंबून राहतात आणि माझा मुलगा दुर्बल नाही. तुला जी काही माहिती गोविंद आणि एकोजी बद्दल असेल ती खरे खरे संग आणि मी तुला सन्माना सकट अभय देईन. महवराहाची संतांन आमच्या राज्यांत पुन्हा एकदा वसेल. " आई साहेबांनी तिच्या काळजाला हात घालण्याचा पर्यंत केला.

अग्निशिखा च्या चेहऱ्यावर भाव नव्हते, आई साहेबांच्या शब्दाचा प्रभाव तिच्यावर पडला नव्हता. "मी आणि गुरुदेव भटकत आहोंत, हिमालयाच्या कड्या कपार्यां पासून ते महासागरातील गलबतां वर आम्ही सगळी कडे फिरत आहोत, निरुद्येश, महावराहाने आम्हाला का जिवंत ठेवलंय हेच आम्हाला ठावूक नव्हते. मी ६ वर्षांची होते तेंव्हा आमच्या काफिल्यावर बाबर म्लेंच्छ सैनिकांनी हल्ला केला. माझ्या वडिलांचे शीर भाल्यावर खुपसुन माझ्यावर आणि आई वर अनन्वित अत्याचार केले गेले. महावराह आमची परीक्षा पाहतोय असेच आई शेवट पर्यंत ओरडत होती. वेदनांनी आक्रंदत तिने हसणाऱ्या मुघल सैनिकांच्या पुढे जीव तोडला. मी वाचले? मला वाटते मी अनेकदा मेले. इतक्या वेळा मेले कि कदाचित मृत्यूच ओशाळला असेल पुन्हा यायला."

आईसाहेबा आपले ओंठ बंद ठेवले होते. चेहरा रागाने किंवा व्यथेने म्लान पडला होता. पण अग्निशिखाने आई साहेबा कडे पहिले "सांत्वना वाटते मला तुझ्या मुला बद्दल. " तिच्या चेहर्यांत सांत्वना होती. "सांत्वना माझ्या बद्दल ? का ? " आई साहेबांनी प्रश्नात्मक चेहरा केला. "इतिहासही पाने वेळ आली तेंव्हांच उघडतात." तिने उत्तर दिले.

"डोळे पुन्हा उघडले तेंव्हा गुरुदेव शेजारी होते, ७ दिवस मी बेशुद्ध होते. गुरुदेव मला घेवून भटकत होते. कधी मेवाड तर कधी काश्मीर तर कधी काशी तर कधी तिरूमल. आम्ही का वाचलो हा डोक्यांत होता. शेवटी आम्हाला उत्तर मिळाले. महावराहाच्या एकूण १०८ मूर्ती ह्या भूमीवर होत्या काळाच्या ओघांत सर्व मूर्ती नष्ट झाल्या. उलट नष्ट होणे हेच त्यांचे विधिलिखित होते. शेवटची मूर्ती मराठी देशांत होती. तिला विसर्जित करणे हेच आमचे ध्येय होते. पण हि मूर्ती सहजा सहजी नष्ट होत नाही. पृथ्वी ला वाचविण्यासाठी महावराहाने अवतार घेतला व १०८ आपल्या प्रतिकृती मागे ठेवल्या. प्रत्येक मूर्ती काही तरी वाईट शक्ती बांधून ठेवते. काळ ज्या प्रमाणे जातो त्या प्रमाणे मूर्तीची शक्ती क्षीण आणि वाईट शक्ती प्रभावशाली बनत जाते. शेकडो वर्षां पासून आम्ही महावराहाचे भक्त ह्या वाईट शक्तींचा नाश करत आलो आहोत. पण ह्या वेळी आम्हाला ते मुश्किल आहे. भविष्यवाणी आहे कि एक कर्तृत्ववान योद्धा अग्नीतून जन्म घेईल, भूमीला दुभंगून तीन सर्पांच्या रथावर बसून, देवीच्या हृदयांत आपली तलवार खुपसेल आणि त्या दैवी रक्ताने महावराहाच्या मूर्तीला अभिषेक करेल. गुरुदेवांनी अश्या योद्ध्याला शोधायचा प्रयत्न सुरु केला आणि आम्ही तुझ्या पुत्रा पर्यंत पोचलो. त्याच्या अंगांत राजाचे रक्त वाहत आहे, त्याला सूर्याचे तेज आहे आणि इंद्राची शक्ती पण अजून तो लहान आहे त्याला समज नाही" अग्नीशिखाने शेवटी आपल्या आगमनाचे प्रयोजन सांगितले.

"माझ्या मुलाने माझ्या उदरातून जन्म घेतलाय. त्याच्याकडे सर्पाचा वगैरे रथ नाही आहे, आणि उगांच मूर्ती वगैरे शोधण्याचा पर्यंत करण्यात तो आपला समय व्यर्थ घालविणार नाही. गोविंद आणि एकोजी बद्दल तुला काय ठावूक आहे ? "

"तू अजून समजत नाही आहेस स्त्रिये, प्रश्न त्याला काय करायचे आहे ह्याचा नाही, समोर संकट काय आहे ह्याचा आहे. रत्नागिरीच्या त्या जंगलांत भाल्या खविस चा पाठलाग करणाऱ्या त्या तुझ्या हेराना, अंधाराने मारले आहे. त्या जंगलात अंधार जन्म घेत आहे. वेळीच त्या संकटाला आवळ घालणे आवश्यक आहे नाहीतर ते संकट तुज्या सर्व साम्राज्याला जाळून राख करेल."

आई साहेबांच्या संयम संपत आला होता. अग्निशिखाच्या कथा त्यांना पचनी पडत नव्हत्या. पण अग्निशिखा आपल्याच तंद्रीत गेली होती.

"आदिलशाह चालून येत आहे, निळ्या रंगाच्या घोड्यावर, अग्निचा फास घेवून, मुघल चालून येत आहेत सर्पाचे विष घेवून. तुझा पुत्र वाघा प्रमाणे लढेल पण जिंकणे मुश्किल आहे. ठेव मला इथेच महावराहाचे खेळ आहेत तुझ्या मुलाला दक्षिणे कडे जायची बुद्धी तोच देईल." असे म्हणून अग्निशिखाने डोळे बंद केले आणि पुन्हा ध्यानस्त झाली.

आईसाहेबानी काही न बोलता कोठडीतून प्रगमन केले. आई साहेबाना सुरक्षित बघून विष्णूच्या जीवांत जीव आला. दासीने त्याच्या मनाची घालमेल समजून त्याला स्मित हास्य दिले, विष्णू ला नक्की काय करावे हे समजले नाही पण त्याने घाई घाई ने कोठडीचा दरवाजा बंद केला.

….

आई साहेब आपल्या गृहांत परत आल्या. महाराज आणि हेर प्रमुख खंडोजी, भट्ट आणि अमात्य उपस्थित होते. दासी जावून खंडोजी जवळ उभी राहिली, तिला खास प्रशिक्षण खान्डोजीनी स्वतः दिले होते. तिने आई साहेब आणि संयासिनीचे संपूर्ण संभाषण ऐकले होते व ती आता सर्वाना आपले निरीक्षण सांगणार होती.

"संन्यासिनी वेडी वाटते, लहानपणी म्लेंच्छानि तिच्यावर अत्याचार केले होते. कदाचित त्यामुळेच तिच्या मनाची स्थिती बिघडली असेल. पण तिचा कोणी तरी गुरुदेव आहे. मुघल, आदिलशाह, रत्नागिरीतील आमचे हेर, भाल्या खविस इत्यादी अनेक गोष्टी सुद्धा तिला ठावूक आहेत. मनस्तिथि बिघडली असेल तरी सुद्धा काही तरी हेतू तिच्या मनांत नक्कीच आहे. कदाचित तिच्या दुर्बल मनाचा फायदा तिचा हा गुरुदेव घेत असावा किंवा आणखी कुणी तरी त्यांना खेळवत असावा. महावराहाच्या मूर्ती बद्दल ती काही तरी बोलत होती, पण असली काही कथा मी तरी ऐकून नाही. ती १०० वर्ष पेक्षां म्हातारी आहे असे तिचे म्हणणे आहे पण ते खरे वाटणे शक्य नाही. तिचा गुरुदेव शोधून काढला तर कदाचित जास्त माहिती भेटू शकेल."

दासी निपुणिका ने आपले मत प्रदर्शित केले. आई साहेबांनी संमतीने मान हलवली. "आणि गोविंद एकोजिचि मुंडकी तिच्या कडे कशी आली ? " अमात्यांनी प्रश्न केला.
"अंधाराने तिला मारले ह्या शिवाय काहीही माहिती तिने दिली नाही. मला वाटते तिला मुंडकी कुणी तरी दिली असावी किंवा तिला कुठे तरी मिळाली असावी." निपुनिका बोलली.

"मुघल आणि आदिल शाह दोघे चालून येत आहेत असे सुद्धा तिने सांगितले" निपुनिकाने पुढे माहिती दिली.

"युसुफ पोष बिजापूर मध्ये आलाय, दिलावर खानाला कुणी तरी घातपाताने मारलेय अशी अफवा शहरांत आहे. पण मुघल चालून येत आहेत अशी माहिती हेरांनी आणली नाही. ". खंडोजी ने साशंक स्वरांत सांगितले.

"वराहाची कथा मी ऐकली आहे. " भट्ट बोलले. सर्वानीच चमकून त्यांच्या कडे पहिले. "महावराह म्हणजे विष्णूंचा त्रितीय अवतार. त्याकाळातील फक्त एक जमात हल्लीच्या काळा पर्यंत वाचली होती. देशभर भटकत राहणारे असे हे लोक होते. बरोबर नेहमी एक वजनदार ७ फुट उंच वराहाची मूर्ती त्यांच्या बरोबर असायची असे आम्ही ऐकून होतो पण बाबर ने जेंव्हा सिधू नदी पार केली तेंव्हा त्याला वाटेंत हे लोक सापडले. म्लेंच्छ लोकांना वराहाचा भयंकर तिटकारा म्हणून त्यांनी सर्व जमातीला पूर्णपणे नामशेष केले. लहान मुलें, स्त्रिया कुणालाही म्हणे सोडले नाही. वराहाची मूर्ती मात्र बाबर फोडू शकला नाही. सांगितले जाते कि कुणी तरी चोरून नेली नेली तर काही जण म्हणतात कि बाबरने ती मूर्ती वापस आपल्या देशांत पाठवली. खरे काही ठावूक नाही. जर कोणी वाचला असेल तर ते आपली वडिलोपार्जित मूर्ती मिळविण्यासाठी धडपड करतील हे स्वाभाविक आहे."

"हे लोक वाममार्गी आहेत का भट्ट ? " अमात्यांनी विचारले.

"नाही, त्यांची राहणी तांत्रिक लोकां प्रमाणे असली तरी हे लोक वाम मार्गीनाहीत. वाचनाचे पक्के, स्त्रीदाक्षिण्य दाखविणारे आणि कधीही भिक्षा न मांगणारे म्हणून त्यांची ख्याती होती" भट्टानी सांगितले. मनात आपण उगाच तिला तांत्रिक समजलो म्हणून त्यांना वाईट वाटत होते.

महाराजांनी सर्वाना जायला सांगितले. आई साहेब आणि महाराज दोघेच राहिले. "काय विचार आहे बेटा ?" आई साहेबांनी विचारले.

"युसुफखान नवाजलेला सेनाप्रमुख आहे, आदिलशहाने त्याला सेनापती बनवले असेल तर आमच्या साठी ती चांगली गोष्ट नाही. रोहीडा किल्ला आणि राजगड काबीज करणे मुश्किल आहे पण ते हातांत आल्यावर आमच्या रयतेला कमी धोका आहे. युसुफचे घोडदळ फारच शक्तिशाली आहे त्याला आम्ही उघड मैदानात ललकारू शकत नाही आणि घोडदळा पूर्वी राजगड किंवा कोंढाणा किल्ल्यावर आमचे पायदळ पोचू शकणार नाही. तो पर्यंत तोरण्या वर हल्ला करायची पूर्ण तयारी युसुफ करत असेल. " महाराज बोलले.

तो अजून लहान आहे पण जबाबदारीचे पूर्ण भान आहे हे आई साहेब ओळखून होत्या. तोरणावर हल्ला करून बंडखोरीचा झेंडा उभा केला कि हे सर्व होणे भाग होते. मराठी राज्याची सेना फार थोडी होती त्यामुळे शक्ती पेक्षां युक्ती ची जास्त गरज होती. पण नक्की काय करावे हा प्रश्न होता. राजगड आणि कोंढाणा किल्याच्या दोन्ही किल्लेदारानी बंडखोरीस पूर्ण नकार दिला होता. राज्य चालविण्यासाठी कर रुपी पैश्यांची गरज होती आणि त्या साठी हे दोन्ही किल्ले जे सुपीक प्रदेशांत आहेत तेच मिळविणे भाग होते.

"तू काय विचार केला आहेस ?" आई साहेबांनी विचारले.

"मी सैन्याची जमवा जमव सुरु केली आहे. लहान तुकड्यांत आम्ही राजगड वर हल्ला करू असा बेत आहे पण शेवटच्या क्षणी आम्ही कोन्ढाण्यावर चाल करू. जेव्हडा वेळ जाईल तेव्हडा वेळ युसुफला ह्या किल्ल्या वर मदत पाठवायला मिळेल त्यामुळे उद्या रात्रीच कूच करण्याचा बेत आहे." महाराजांनी आपला बेत कथन केला.

"हं" आई साहेब काहीच बोलल्या नाहीत. त्यांना महाराजां वर विश्वास होता पण मनात शंकेची पाल सुद्धा कूचकुचत होती. संध्याकाळ होई पर्यंत त्या आपल्या कास्खाबाहेर गेल्या नाहीत.

आई साहेब उठल्या त्यांनी आपल्या कक्षांत ठेवलेली एक छोटी लाकडी पेटी काढली, कमरेच्या चावीने उघडून त्यातील मखमली कपड्यांत लिपटलेली एक वस्तू बरोबर घेतली आणि काळोखांत त्या हळूच बाहेर निघल्या.

पुन्हा आई साहेबांना पाहून विष्णू गांगरला. "उघड दर" त्यांनी त्याला हुकुम दिला. विष्णूने दरवाजा उघडला. आईसाहेब आंत गेल्या व त्यांनी दरवाजा बंद केला. अग्निशिखा आई साहेबाना पुन्हा बघून अचंभित झाली. आईसाहेबांनी कपड्यातील कट्यार बाहेर काढली. अग्निशिखा कुतूहलाने बघत होती.

"तुला माझ्या मुलाची मदत पाहिजे आहे ना ? जा मग तू आधी माझी मदत कर. " तिने अग्निशिखाला सांगितले.

"शब्द आहे ?" अग्निशिखा.

"शब्द आहे ! " आई साहेब बोलल्या.

"जा तत्काळ कोन्धाण्यावर जा, किल्ल्याचा सुभेदार चान्द्रोबा कासकर आहे. त्याला किल्ला आमच्या हवाली करायला सांग. नाही मानला तरी त्याला देहदंड दे. त्याच्या मृत्युनंतर सिद्धी अंबर किल्लेदार बनेल. त्याला एक मुलगा आहे, सध्या तो वेळी नदीच्या किनारी जो कोळी समाजाचा गांव आहे तेथे आपल्या प्रेयसी बरोबर आहे. त्याला ताब्यांत घे आणि कासारवाडीच्या शिवमंदिरात मला ७ दिवसांनी भेट. " आई साहेबांनी सांगितले.

अग्निशिखा साशंक नजरेने आई साहेबां कडे पाहत होती. "आणि तुझ्या मुलाला हे मान्य आहे ? एका घातपाताने मारणे ? दुसर्याच्या मुलाला बळजबरीने अपहृत करणे ?"

"त्याला जाणून घ्यायची गरज नाही. मी दिलेले वचन पूर्ण करेन. " आई साहेबांनी सांगितले.

"ठीक आहे." अग्निशिखा उठली. तिने आपली वस्त्रे पुंन्हा परिधान केली .

"मी तुला ताबेल्यातून एक घोडा काढून देते. " आई साहेबांनी सांगितले.

"गरज नाही. महावराहाच्या सेविकेला घोड्याची गरज नाही." तिने सांगितले.

आई साहेबांनी आपला शेला तिच्या वर टाकला. "माझ्या सेविकेचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर हे पत्र दे. तुला दासी समजून सोडतील ते".

आई साहेब अग्निशिखाबरोबर आल्या पाहून विष्णूने आपले तलवार म्यानातून बाहेर काढली.

"गरज नाही त्याची" आई साहेबांनी दरडावले.

"हि माझ्या आज्ञे वरून गुप्त कामगिरीवर जात आहे. कुणालाही ह्याचा पत्ता लागता कामा नये. ती आतंच आहे असे लोकांना वाटले पाहिजे. " आई साहेबांनी गांगरलेल्या विष्णूला दरडावून सांगितले.

"जसा हुकुम आईसहेब" विष्णूने आज्ञा मानली.

आई साहेब दक्षिण बुरुजावरून मुख्य प्रवेशद्वारावर नजर ठेवून होत्या. कुणीही त्यांना दिसत नव्हते पण काही मिनिटांनी दरवाजा उघडला आणि एक आक्रुती बाहेर जात होती. "अग्नीतून जन्म घेतलेला, भूमी दुभंगणारा, तीन सर्पांच्या रथावर बसून येणारा" अग्नीशिखाच्या शब्द तिच्या कानांत अजून घुमत होते आणि पश्चिमेकडून येणारा वारा सर्व किल्ल्यांत पिशाच्चा प्रमाणे हिंदळत होता.