Get it on Google Play
Download on the App Store

गीताई अध्याय सहावा

श्री भगवान् म्हणाले

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥ २ ॥

योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले । योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥ ३ ॥

कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे । संकल्प सुटले तेंव्हा तो योगारूढ बोलिला ॥ ४ ॥

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥ ५ ॥

जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला । सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥ ६ ॥

जितात्मा शांत जो झाला देखे ब्रम्ह चि एकले । मानापमानी शीतोष्णी सुख-दुःखी समावले ॥ ७ ॥

तोषला ज्ञान-विज्ञाने स्थिर जिंकूनि इंद्रिये । तो योगी सम जो देखे सोने पाषाण मृत्तिका ॥ ८ ॥

शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा । असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ॥ ९ ॥

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी । आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ॥ १० ॥

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन । दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ॥ ११ ॥

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी । आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे ॥ १२ ॥

शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ । दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे ॥ १३ ॥

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ॥ १४ ॥

असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने । मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ॥ १५ ॥

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी । न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ १६ ॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि । मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ १७ ॥

संपूर्ण नेमिले चित्त आत्म-रूपी चि रंगला । निमाली वासना तेंव्हा योगी तो युक्त बोलिला ॥ १८ ॥

निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा । तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती ॥ १९ ॥

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला । जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये ॥ २० ॥

भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख । न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ॥ २१ ॥

जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो । न चळे जेथ राहूनि दुःख-भारे हि दाटला ॥ २२ ॥

तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोग चि । जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ॥ २३ ॥

संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी । इंद्रिये ही मनाने चि ओढुनि विषयातुनी ॥ २४ ॥

धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू । आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वये ॥ २५ ॥

फुटेल जेथजेथूनि मन चंचळ अस्थिर । तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्म-चिंतनी ॥ २६ ॥

विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ । झाला ब्रम्ह चि तो योगी पावला सुख उत्तम ॥ २७ ॥

आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी । सुखे चि भोगितो योगी ब्रम्हानंद अपार तो ॥ २८ ॥

भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली । योगाने जोडिला देखे हे चि सर्वत्र दर्शन ॥ २९ ॥

मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्व हि । त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय ॥ ३० ॥

स्थिर होऊनि एकत्वी सर्व-भूती भजे मज । राहो कसा हि तो योगी माझ्यामध्ये चि राहतो ॥ ३१ ॥

जो आत्मौपम्य-बुद्धीने सर्वत्र सम पाहतो । जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला ॥ ३२ ॥

[२०]

अर्जुन म्हणाला

तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना । न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ॥ ३३ ॥

मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे । धावे वार्‍यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर ॥ ३४ ॥

श्री भगवान् म्हणाले

अवश्य मन दुःसाध्य म्हणतोस तसे चि ते । परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे ॥ ३५ ॥

संयमाविण हा योग न साधे मानितो चि मी । परी संयमवंतास उपाये साध्य होतसे ॥ ३६ ॥

अर्जुन म्हणाला

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो । मुकला योग-सिद्धीस जाय कोण्या गतीस तो ॥ ३७ ॥

काय तो उभय-भ्रष्ट ब्रम्ह-मार्गी भुलूनिया । नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ॥ ३८ ॥

माझा संशय हा कृष्णा तू चि फेडी मुळातुनी । फेडीलसा दुजा कोणी न दिसे चि तुझ्याविण ॥ ३९ ॥

श्री भगवान् म्हणाले

न ह्या लोकी न त्या लोकी नाश तो पावतो कधी । शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ॥ ४० ॥

पुण्य-लोकांत राहूनि तो योग-भ्रष्ट संतत । शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ॥ ४१ ॥

अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळी चि मग जन्मतो । अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ ॥ ४२ ॥

तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी । मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ॥ ४३ ॥

पूर्वाभ्यास-बळाने तो खेचला पर-तंत्र चि । जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ॥ ४४ ॥

योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित । अनेक जन्मी संपूर्ण होउनी मोक्ष पावतो ॥ ४५ ॥

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा । मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ॥ ४६ ॥

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी । श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ॥ ४७ ॥

अध्याय सहावा संपूर्ण