Get it on Google Play
Download on the App Store

एका नटाची आत्महत्या

'' .... ओढ ! जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ओढ ! - हं चालूं दे ! दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें ! चालूं दे ! - आलों, आलों ! थांबा, भिऊं नका ! - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस ? हं ! नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस ! माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस ? काय माझें समाधान केलेंस रे तूं ? निव्वळ आरडाओरडा ! ' वाहवा, वाहवा ! भले शाबास ! खूप बहार केलीस ! ' - बेशरम ! हंसतोस काय ? - अरेरे ! तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों ! - हाय ! जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली ! नको ! नको !! मला ओढूं नकोस !!! - काय वार्‍याचा सोसाटा हा ! जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे ! - अबब ! केवढा प्रचंड सर्प हा ! घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल ! अरे जारे ! कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे ! खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा ! चालूं दे ! - दंत खुपस ! नाहीं ! मी परत फिरणार नाही जा ! - ओरडा ! मोठमोठ्यानें आरोळ्या मारा ! टाळ्या वाजवा ! नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे ! अरे जगायचें तर चांगलें जगा ! नाही तर - चला दूर व्हा ! अरे नका ! माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका ! कोण ? कोण तुम्ही ? मला फाडायचें आहे ? तें कां ? मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे ? सलफ्यूरिक ऍसिड ! - अहाहा ! काय गार - गार - वारा सुटला आहे हा ! जिकडे तिकडे बर्फच - बर्फ ! अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप ! - हः हः ! वेडया जगा ! माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस ? अरेरे ! बिचारा रडकुंडीस आला आहे ! काय काय ? माझें आतां गूढ उकलणार ? अहाहा ! - उलथलें ! जग उलथून पडलें ! ओहो ! .... ''

७ नोव्हेंबर १९१२

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?