Get it on Google Play
Download on the App Store

त्यागातील वैभव 9

शृंगारलेल्या ऐरावतावर सोन्याच्या अंबारीत बसून इंद्राणी चालली होती. बरोबर सर्व देवांगनांना होत्या. त्या निरनिराळ्या वाहनांवर बसून चालल्या होत्या. रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, मेनका वगैरे सौंदर्यलतिका सर्व अप्सरांसह निघालेल्या होत्या. नाना परीची वस्त्रे, नाना अलंकार. त्यांच्या लक्षावधी छटा चमकत होत्या. अप्सरा वाटेत गाणी गात होत्या. त्यामुळे अधिकच रंग चढला होता.

सत्यलोकाहून आपल्या मैत्रिणींसह सावित्री निघाली. ब्रह्मदेव वेदाध्ययनात मग्न होते.

“म्हंटल मी वैकुंठास जाते. अंगाखांद्यावर काय घालू?” सावित्रीने विचारले. ब्रह्मदेवाचे लक्ष नव्हते, तो पुराणपुरुष, तो वेदमूर्ती ज्ञानोपासनेत तल्लीन होता. पुन्हा सृष्टी उत्पन्न करायची झाली तर काय फेरफार करावेत, याचे चिंतन करीत होता. ‘धाता यथापूर्वमकल्पयत्’ या वचनाची त्याला चीड आली होती. आता विधाता नवीन कल्पनेने नवीन विश्व सृजील, असे तो मनात म्हणत होता.

सावित्री चिडली.

“एवढं मेलं माणसानं विचारावं तरी बोलायला वेळ नाही. लग्न तरी केलत कशाला? ऐकलंत का? मी वैकुंठास जाते आहे.” ती त्यांच्या कानात ओरडून म्हणाली.

ब्रह्मदेवाने समाधी सोडली. स्त्रियांसमोर समाधी कशी टिकणार!

“काय म्हणतेस? वैकुंठास जातेस?”

“हो.”

“बरे. पित्याला माझा कृतानेक साष्टांग नमस्कार सांग.”

“प्रणाम सांगेन; परंतु कोणते वस्त्र नेसू, कोणते अलंकार घालू?”

“मला काय ठाऊक, तुझ्याजवळ कोणती वस्त्रे आहेत व कोणते अलंकार आहेत? जे आवडेल ते वस्त्र नेस. आवडतील ते अलंकार घाल.”

“लग्न झाल्यापासून एक दागिना केला असेल तर शपथ!”

“लक्ष्मीआईने दिले होते ना थोडेसे!”

“तेही त्यांच्या माहेरचे. आणि त्यांनी दिलेलेच दागिने घालून त्यांच्याकडे जाऊ वाटतं?”

“मग नको घालूस.”

“मग का अशीच जाऊ?”