Get it on Google Play
Download on the App Store

विश्वाला नाचवणारा शेतकरी 2

“आई, तूप का जाळतात? आपल्याला का देत नाहीत? आपण घरी नेऊ!” एका मुलाने विचारले.

“देवाला द्यायचे. अग्निदेवाला. काहीतरी विचारू नकोस. लोक हसतील!” आई म्हणाली.

“मी कोरडी भाकर खायची नि या देवाला किती तूप! आई, मला न देता तुला खाववेल का गं?”

“बोलू नको.”

“सांग न!”

“अरे, तुला आधी देईन, मग उरले तर मी खाईन!”

“मग देव असा कसा हावरा? आम्हा मुलांना उपाशी ठेवून आपण तुपाशी जेवतो आहे. ते बघ तूप ओतताहेत, बघ!”

“बोलू नको रे, बाळ.”

काही दिवस गेले यज्ञ चालला होता; परंतु एके दिवशी चमत्कार झाला. सर्वांना आपण फिरत आहोत असे वाटू लागले. हळूहळू सारे नाचू लागले. ते अग्निकुंड नाचू लागले. तूप ओतणारे, मंत्र म्हणणारे नाचू लागले. तुपाची भांडी नाचू लागली. देव, दानव, मानव सारे नाचू लागले. अप्सरा नाचू लागल्या. नंदनवन नाचू लागले. ऐरावत नाचू लागला. कल्पवृक्ष नाचू लागला. दूरवर सारे नाचता नाचता बघू लागले. सारे ब्रह्मांड नाचत आहे असे त्यांना दिसले. समुद्र, नद्या, नाले नाच करिताहेत. हिमालयादी पर्वत नाचत आहेत. कोणाला काही कळेना. प्रथम मौज वाटली; परंतु मागून सारे घाबरले. विश्वकंप होणार की काय? सारे ब्रह्मांड, सारे त्रिभुवन का कोसळणार? कोट्यावधी तारे का एकमेकांवर आपटणार? काय आहे हे सारे?”