Get it on Google Play
Download on the App Store

न्याय जिवंत झाला 2

“जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!”

“माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!”

“बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!” असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.

शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानस शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जीवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने अपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले. इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.