Get it on Google Play
Download on the App Store

आकाश 2

क्षितिजाचे काव्य
आकाश जवळ उंच दिसले तरी तिकडे ते आपल्या भूमातेला भेटायला आले आहे असे वाटते. मैल अर्धा मैल चालले म्हणजे आकाशाला भेटू, हात लावी असे वाटते. लहानपणी मी असा अनेकदा चालत गेलो आहे. दूरचे निळेनिळे डोंगर तर आकाशाच्या कुशीत डोके घुसवीत आहेत असे वाटे. परंतु जावे तर आकाश आणखीच दूर. उंच डोंगरावर जावे तर ते पुन्हा आणखी उंच जावे. मैदानातून दूर चालत जावे तर क्षितीज दूर पळावे. कोठे आहे याचा अंत?  कोठे आहे शेवट? ते अनंत आहे. जेवढे मिळेल तेवढे घ्या, या ध्येयाप्रमाणे, ते आहे. ज्याप्रमाणे ध्येय उत्तरोत्तर पुढेच जात असते त्याप्रमाणे या आकाशाचे असते.

ते आहे की नाही?

आकाश म्हणजे शेवटी काय? हे जे वर निळे निळे दिसते ते काय? कवींनी अनेक कल्पना केल्या. ईश्वराच्या मंदिराचे का हे छत आहे? त्या छताला सूर्य-चंद्र टांगलेले आहेत. भव्य दीप लावलेले आहेत. आणि ते अगणित तारे! ते तेथे लावलेले आहेत. प्रभूचे अपार वैभव. परंतु खरोखरच हे आकाश म्हणजे काय? वरवर जाल तर आणखी वर वर आहेच. परंतु जेथे त्याला हात लावता येईल असे काही कोठे आहे का? नाही. आकाश म्हणजे अनंत पोकळी. कोट्यवधी ता-यांचा जो अपरंपार प्रकाश परावर्तित होत असतो, त्याचे आपणास निळेनिळे असे रुप दिसते. आकाश म्हणून वस्तू नाहीच. जे निळे नुळे दिसते त्याला आपण आकाश म्हणतो. कोट्यवधी तारे कोट्यवधी मैल दूर आहेत. आणि त्या सर्वांच्या प्रकाशाचा अत्यंत दुरून दिसणारा पुंजीभूत परिणाम म्हणजे हे आकाश! हे निळे निळे अपरंपार दूर आहे, आणि तेथे जाऊ तर काही दिसणारही कदाचित नाही.

विश्वाचे पांघरूण
सर्वांच्या पलीकडचे ते आहे. जणू या विश्र्वाला घातलेले पांघरूण आहे. म्हणून संस्कृतमध्ये त्याला अंबर म्हणजे वस्त्र असा शब्द आहे. प्रभूने आपल्या कृपेचे वस्त्र जणू पांघरवले आहे. सुंदर कल्पना. सर्वांना ते जवळ घेते. सर्वांना पोटात घेते. आकाशाच्या पलीकडे काही नाही. त्याच्या पोटात जणू विश्व.

निर्मळता, अलिप्तता
आकाशात अनेक वस्तू येतात, जातात. परंतु ते निर्लेप असते. प्रचंड वादळे उठतात. धुळीचे लोट वर उडतात. आकाश गढूळ झाल्यासारखे, धूसर झाल्यासारखे वाटते. पृथ्वीवरील कचरा, पाचोळा पंख फुटून वर उडू लागतो. निळ्या आकाशात जणु वर जाऊ बघतो, तुम्ही आम्हाला तुच्छ मानता? धुळीचा कण, केरकचरा म्हणता? आम्ही वर चढू शकतो. उंच उडू शकतो. वा-यावर स्वार होऊन आम्ही आकाशाला भेटू. चंद्रसूर्यांना भेटू. त्या चमचम करणा-या चिमुकल्या ता-यांना भेटू. असे जणू जगाला जाहीर करीत या वस्तू वर उडतात. आकाश झाकाळते. परंतु थोड्या वेळाने काय दिसते? ना धुळीचे लोट, ना पालापाचोळा. पुन्हा ते अनंत आकाश निळेनिळे वर शोभत राहते!