Get it on Google Play
Download on the App Store

पत्र सहावे 3

वसंता, आपल्या पूर्वजांची अशी द्वेषी दृष्टि नव्हती. मुसलमान शेजारी आहेत. त्यांना उपाशीं ठेवायचें? हे मुसलमान कधीं कधीं फार गरीब असत. कारण मुळांत गरीब व उपेक्षित असें हिंदुधर्मांतीलच ते होते ! त्यांना नसे शेतीभाती, नसे धंदा. आपण कांही धंदे मुद्दाम दिले. ते जगावेत हा हेतु. आपल्याकडे लग्नमुंज वगैरे समारंभ असला तर चौघडयाबरोबर मुसलमानांचा ताशाहि आपण बोलावित असूं. परंतु आज मुसलमांनावर बहिष्कार घालण्यांत येतो. केवळ मुसलमान म्हणून हा बहिष्कार असतो! आपण आपल्या ओळखीच्या, आपल्या जातीच्या दुकानदाराकडे सहजपणेंच जातों. त्यांत दोष नाहीं. पण जेव्हां जाणूबुजून द्वेषाच्या पायावर आपण या गोष्टी उभारूं लागतों, तेव्हां ते वाईट असतें. आपल्या बायकांच्या हातांत कांहीं मुसलमानाहि बांगडया भरण्याचा धंदा करतात. हिंदु स्त्रियांच्या हातांत लांडयांनीं काय म्हणून बांगडया भराव्या?  जणुं एखादा हिंदु तरुण नव्यानं हिंदु स्त्रियांच्या हातांत बांगडया भंरूं लागला तर त्याचें मन अगदीं पवित्रच राहील ! उलट ज्याला वंशपरंपरा संवय झाली त्याच्या मनांतहि कांहीं येत नाही ! पुरुष हिंदु असो, मुसलमान असो, मनें दोघांचीहि विकारक्षम आहत. फार तर आपण असें म्हणूं या कीं बायकांनींच बायकांच्या हातांत बांगडया भराव्या. त्यांत कांही अर्थ आहे. 

असें हे द्वेष फैलावले जात आहेत. मुसलमान तेवढा वाईट, असें लहान मुलांना शिकवण्यांत येत आहे. द्वेषाच्या व धर्माच्या नांवावर संघटना करण्यांत येत आहेत. परंतु अशा संकुचित धर्माच्या नांवानें केलेली संघटना टिकणार नाही. एकाच धर्माचे लोकहि आपसांत लढतांना प्राचीन काळापासून दिसत आहेत. जपान व चीन यांचा धर्म एकच. दोघांचा बुध्दधर्म आहे. परंतु दोघांचे सारखें रणकंदन चालले आहे. युरोपखंडातील सर्वांचा एकच धर्म होता. एकच धर्म आहे. परंतु युरोपांतील राष्ट्रे सारख्या लढाया करीत आहेत. औरंगजेब मुसलमान होता, परंतु गोंवळकोंडा व विजापूर येथील राज्यें त्यानें नष्ट केलींच ! मराठे इतर प्रांतांतील हिंदूवर स्वा-या करीतच होते. मराठयांना हिंदुसाम्राज्य निर्मावयाचें नव्हतें, त्यांना मराठा साम्राज्य निर्मावयाचें होतें ! नानासाहेब पेशवे म्हैसूरकडचा सुपीक व समृध्द प्रदेश पाहून  पंत्रात लिहितात, '' दक्षिणेकडची ही संपत्ती महाराष्ट्रांत नेली पाहिजे, पुण्यास नेली पाहिजे. '' ब्रिटिश साम्राज्यवाले हिंदी संपत्ती लंडनला नेतात. फरक तो काय? मराठयांचा रजपूत, जाट, शीख वगैरेंशी कोठें सहकार होता? पानिपतच्या लढाईच्या वेळेस रजपूत, जाट, वगैरे अलगच राहिलें. कारण हा मराठयांचा साम्राज्यवाद आहे हें त्यांना कळूं लागलें. मराठे जातील तेथें आपले सरदा - सुभेदार नेमतील हे जगजाहीर झालें होतें !

ज्यांचीं सुख:दुखें एक त्यांची संघटना होत असते. भगवद्गीतेनें स्वकीय व परकीय असे दोन भेंद नाहीं सांगितले. कौरव व पांडव एकाच कुलांतील होते. एकाच धर्माचे होते. परंतु ते लढाईला उभे राहिले . कारण काय? दिसायला त्यांचा एक धर्म असला, तरी प्रत्यक्ष व्यवहार-धर्म दोघांचा निराळा होता. एक पक्ष असत्याचा पुजारी होता. दुसरा पक्ष सत्याला घेऊन उभा होता. चांगल्याची वाईटाविरुध्द संघटना हें आपण समजूं शकतो. मग जे जे चांगले असतील ते चांगल्या बाजूस उभे राहतील. चांगलें हिंदु, चांगले मुसलमान, चांगले शीख, चांगले पारशी, चांगले ख्रिश्चन. होऊं दे सत्पक्ष घेणा-यांची संघटना. परंतु जातीय संघटनेला काय अर्थ?

गीतेच्या सोळाव्या अध्यांयात जगांत दोनच पक्ष आहेत असें सांगितले आहे. एक दैवी वृत्तीचा पक्ष व एक आसुरी वृत्तीचा पक्ष. '' मीच काय तो चांगला. मी फक्त श्रेष्ठ कुळांतला. मीच संपत्तिमान व बुध्दिमान. मलां हें घेऊं दे, ते जिंकूं दे. '' असें सदैव म्हणणा-यास गीतेनें आसुरी म्हटलें आहे. याच्या जें उलट तें दैवी. आसुरी वृत्तीच्या लोकांशी दैवी वृत्तीच्या माणसांचा सदैव       झगडा चालला आहे. तुम्ही हिंदु संघटनवाले का मुस्लिम संघटनवाले असा प्रश्र न करतां तुम्ही सत्पक्षाची संघटना करणारे की असत् पक्षांतले, असा प्रश्र विचारला पाहिजे.

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7