Get it on Google Play
Download on the App Store

कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता.

उगम

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्‍याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन,(तथ्य तपासा ?)मुंबई पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.

१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू (तथ्य तपासा ) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्‍या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.

कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

नाविक तळ

१६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.

कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले.साचा:अपूर्णवाक्य( नेमके कोण इंग्लंडला परतले ?) त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.

मृत्यू

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी ह्यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली, पण त्यांना कान्होजींची सर आली नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आंअले.