Get it on Google Play
Download on the App Store

स्नेहमयीचा अपार शोक 6

आली-गाडी आली. दिगंबर राय सुटणार म्हणून सारा गाव तेथे लोटला होता. सुटले, खरेच सुटले ! कायमचे सुटले ! ! ! देहाच्या तुरुंगातूनही सुटले. स्वर्गात चढणार्‍या दिगंबर रायांना निरोप देण्यासाठी जणू सारा गाव जमला होता. ‘लोकांनी दिगंबर राय की जय’ गर्जना केली. स्नेहमयी “गेले रे- मारले रे त्यांनी- आई !” असे म्हणत धाड्कन खाली पडली. पडली ती पडली ! हा दिव्य सती जाण्याचा प्रकार इंग्रजांना बंद करता आला नाही ! दिगंबर रायांना हाक मारून, त्यांना थांबवून स्नेहमयीने त्यांचा प्रेमळ स्वर्गीय हात हातात घेऊन प्रयाण केले ! “जा, दिव्य आत्म्यांनो, परत स्वर्गीय राज्यात जा. राखालच्या कुटुंबाने ती पाहा पंचारती तुमच्यासाठी पाजळली आहे.”

गावातील लोक स्वागतासाठी जमले होते. आनंदासाठी जमले होते. तो भयंकर प्रसंग समोर उभा ! त्या गावचे मायबाप तेथे मरून पडलेले ! क्रूर परकी सरकारने त्यांचे मायबाप हिरावून घेतले. दिगंबर रायांचा तो शतचूर्ण देह पाहून लोक धाय मोकलून रडले. हजारो-लाखो शिव्याशाप त्यांनी मनोमन दिले. एक दिवस ते शाप समूर्त होतील आणि गुलामगिरीचा बळी घेतील.

लोकांनी मोठ्या भक्तिभावाने ते दोन देह पालखीत ठेवले. फुलांनी सारी पालखी आच्छादून गेली. स्नेहमयीला नवीन चुडे भरण्यात आले. ललाटी कुंकू माखण्यात आले. हरिनामाचा गजर करीत प्रेतयात्रा गेली. ते दोन पुण्यमय देह अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले. “ने,- अग्ने, जातवेदा अग्ने, या आत्म्यांना अमर वैभवाकडे घेऊन जा. अग्ने नय राये सुपथा- ने अग्ने ने !”