Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ३१

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगत्पाळका ॥ जगत्पते वैकुंठनायका ॥ जगत्सृजका यदुकुळटिळका ॥ भक्तसखा तूं होसी ॥१॥

निखिलजीवन निर्विकारा ॥ विवेकरत्नवैरागरा ॥ शुद्धसत्त्वगुणगंभीरा ॥ रुक्मिणीवरदा दीनबधो ॥२॥

हे कृपार्णवा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं भक्तिसारग्रंथा ॥ मागिले अध्यायीं अनाथनाथा ॥ जन्म चौरंगीचा करविला ॥३॥

करविला परी त्याचें कथन ॥ राहिलें तें ग्रंथीं लेखन ॥ आतां करवीं जगज्जीवन ॥ पुढें वैखरी बैसूनियां ॥४॥

तरी गताध्यायीं सापत्नमाता ॥ लोटली तातें कामसरिता ॥ परी कृष्णागर प्राज्ञिक सुता ॥ बळेंचि नेलें पाचारुनी ॥५॥

करुनि जननीचा धिक्कारु ॥ सदना गेला होता कृष्णागरु ॥ येरी सखी जीवापारु ॥ पाचारिली होता कीं ॥६॥

तिये सांगूनि सकल वृत्तांत ॥ प्राणघातासी झाली होती उदित ॥ परी ती सखी प्रज्ञावंत ॥ देत मसलते तियेसी ॥७॥

म्हणे बाई वो भुजावंती ॥ ईश्वरकरणी प्रारब्धगती ॥ जैसे असेल तैसी पुढती ॥ घडून येईल भिऊं नको ॥८॥

परी तूतें सांगेन हित कांहीं ॥ तैसेचि धरुनि जीवीं ॥ नको कष्ट मानूं आपुले देहीं ॥ शयन शयनीं करी आतां ॥९॥

शयन शयनीं केलिया पूर्ण ॥ राव येईल पारधीहून ॥ आल्या सेवील तुझें सदन ॥ परी तूं उठू नको कीं ॥१०॥

मग तो राव पुसेल तूतें ॥ तंव तूं सोंग दावीं शोकाकुलतें ॥ रुदन करुनि वदें रायातें ॥ प्राणरहित होय मी ॥११॥

आतां काय ठेवूनि प्राण ॥ झाला नाहीं अबूरक्षण ॥ ऐसें बोलतां राव वचन ॥ पुढें तुजशीं पुसेल ॥१२॥

पुसतां वदे कीं प्रांजळवंत ॥ कृष्णागर तुमचा सुत ॥ कामुक होऊनि मम सदनांत ॥ स्पर्शावया धांवला ॥१३॥

धांवला परी यत्नेकरुन ॥ बळें दिधला मागें लोटून ॥ ऐसें होतां अनुचित प्राण ॥ कैसा ठेवूं महाराजा ॥१४॥

ऐशा परी आराधूनि युक्तीं ॥ क्रोंध उपजवीं रायचित्तीं ॥ क्रोधवश झालिया राय नृपती ॥ कलहें मुला सोडील कीं ॥१५॥

मग तो कदा ना म्हणे सुत ॥ त्वरें करील प्राणरहित ॥ मग तूं सदनीं आनंदभरित ॥ सुखलाभातें सेवीं कां ॥१६॥

अंगीं विपतरुचा कोंब चांग ॥ खुडूनि टाकिल्यानें मार्ग ॥ मग विषाचा शरीरीं लाग ॥ कोठूनि होईल जननीये ॥१७॥

आधीं ठेचिल्या उरगमुख ॥ मग कैंचें मिरवेल विषदुःख ॥ कंटकी धरिल्या वृश्चिक ॥ वेदनेतें मिरवेना ॥१८॥

कीं वन्हि असतां धूम्रा कार ॥ वरी सांडावे लगबगे नीर ॥ मग धांव सदनापर ॥ घेत नाहीं जननीये ॥१९॥

तरी कृष्णागराचा वसवसा ॥ तव हदयी मिरवे स्वबाळफांसा ॥ तरी राया सांगूनि ऐशिया लेशा ॥ दुःखसरिता लोटवीं ॥२०॥

तरी त्या उदकाचे आधीं वळण ॥ दुःखसरिते बांधावे बंधन ॥ बंधन बांधिल्या सजीवपणें ॥ सुखे पुढें मिरवीं कां ॥२१॥

ऐसी सांगूनि ती युवती ॥ गेली आपुल्या सदनाप्रती ॥ येरीकडे भुजावंती ॥ कनकमंचकीं पहुडली ॥२२॥

त्यजूनि अन्नोदक स्नान ॥ कैंचे श्रृंगार कुंकुमलेण ॥ सर्व उपचारांतें त्यजून ॥ विन्मुख तई पहुडली ॥२३॥

तों येरुकडे शशांगर ॥ पारधी खेळूनि काननभर ॥ चिंताब्धीची फोडूनि लहर ॥ सदना तदा जातसे ॥२४॥

नाना गजरें यंत्रस्थित ॥ चमूअब्धीचा लोट लोटीत ॥ क्षेत्रपातीं पूर्ण भरित ॥ चमृतोयें तेधवां ॥२५॥

यावरी राव तो पूर्ण ज्ञानी ॥ संचार करी आपुले सदनीं ॥ दृष्टीसमोर न देखितां राणी ॥ परिचारिके विचारीतसे ॥२६॥

म्हणे कोठे आहे भुजावंती ॥ सन्मुख कां न आली पारधीप्रती ॥ आजि चुकुर होऊनि चित्तीं ॥ निंबलोणा नातळली ते ॥२७॥

रायातें बोलती परिचारिका ॥ हे महाराजा सद्विवेका ॥ आजि राणी कवण दुःखा ॥ दुखावली कळेना ॥२८॥

तेणेंकरुनि शयनापाटी ॥ निजली आहे होऊनि कष्टी ॥ होतांचि शब्द कर्णपुटी ॥ सदनामाजी संचरला ॥२९॥

तों ती मंचकीं भुजावती ॥ राव देखूनि बोले युक्तीं ॥ म्हणे कां हो कवण अर्थी ॥ शयन केलें जिवलगे ॥३०॥

परी तई उत्तरा न देती ॥ कांहींच न बोले रायाप्रती ॥ जीवन आणूनि नेत्रपातीं ॥ अश्रु ढाळी ढळढळां ॥३१॥

तें पाहुनियां राव दयाळ ॥ चिंत्तीं दाटला मोहें केवळ ॥ मंचकीं बैसे उतावेळ ॥ हदयीं धरीं कांतेतें ॥३२॥

अश्रुधारा नेत्रपातीं ॥ राव पुसी स्वयें हस्तीं ॥ चुंबन घेऊनि लालननीतीं ॥ अंकावरी बैसवीतसे ॥३३॥

अंकीं बैसवोनि स्वदारारत्न ॥ हेम जडावया करी यत्न ॥ राव कोंदणी हाटकप्रयत्न ॥ अर्थरत्ना जोडीतसे ॥३४॥

म्हणे सुखसरिते ॥ कोठूनि भेदलें गढोळ चित्तीं ॥ दुःखघनाचा वर्षाव अमित ॥ कोणें केला तो सांग ॥३५॥

मी राव महीचा भूप ॥ मी बोलणारा दर्पसर्प ॥ ऐशा व्याघ्राचा करोनि लोप ॥ दिधलें माप दुःखाचें ॥३६॥

तरी ती कवण पुरुष नारी ॥ तूतें अन्य झाली भारी ॥ तरी मातें बोलूनि वैखरी ॥ निमित्तमात्र दावीं कां ॥३७॥

अगे सहज दिठवा होते ॥ दावीन त्यातें अर्कसुत ॥ या बोलाची सहज भ्रांत ॥ मानूं नको जिवलगे ॥३८॥

अगे प्रिय तूं मातें अससी ॥ कोण गांजील उद्देशीं ॥ हरिबाळातें जंबुकलेशी ॥ दुःखदरी मिरवेना ॥३९॥

अगे मशकाचेनि पाडा ॥ धडके उतरे गिरीचा कडा ॥ कीं रामरक्षे भूतवडा ॥ रक्षणिया बैसतसे ॥४०॥

तेवीं तूं माझी पट्टराणी ॥ कोण घालूं शके काचणी ॥ नाम दर्शवीं प्रांजळपणीं ॥ मग ऊर्वी न ठेवीं तयातें ॥४१॥

ऐसें ऐकतां राववचन ॥ हदयीं तोषली अर्थार्थी सघन ॥ म्हणे महाराजा तव नंदन ॥ भ्रष्टबुद्धी व्यापिला ॥४२॥

आपण गेलिया पारधीसी ॥ एकांत पाहूनि मम उद्देशीं ॥ येथें येऊनि स्मरलेशी ॥ हस्त माझा धरियेला ॥४३॥

धरिला परी निर्दयवंतें ॥ कामें ओढिता झाला हस्त ॥ म्हणे चालावें एकांतांत ॥ सुखसंवाद भोगावा ॥४४॥

मग म्यां पाहूनि कामिकवृत्ती ॥ हात आंसडूनि घेतला निगुतीं ॥ भयार्थ मानूनि आपुले चित्तीं ॥ सदनामाजी पावलें ॥४५॥

पळता कोणे झाली अवस्था ॥ उलथूनि पडलें महीवरती ॥ परी म्यां धरुनि तैशीच शक्ती ॥ आड कवाड पैं केलें ॥४६॥

मग तो छलबलत्वहीन ॥ होऊनि पाहे आपुलें सदन ॥ तस्मात् आतां आपुला प्राण ॥ ठेवीत नाहीं महाराजा ॥४७॥

भलतैसिया गरळांत ॥ घेऊनि करीन प्राण मुक्त ॥ परी धैर्य वरिलें तुम्हांकरितां ॥ तुमचा मुखेंदु पहावा ॥४८॥

मज वाटलें पारधीचें कानन ॥ अति तीव्र कर्कश भयाण ॥ त्यातूनि तुम्ही जीवंतपणें ॥ कैसे याल वाटलें ॥४९॥

ऐसेपरी धुसधुशीत ॥ संचार होतां हदयांत ॥ म्हणोनि महाराजा येथपर्यंत ॥ प्राण देहीं रक्षियेले ॥५०॥

आतां याचि बोलापाठीं ॥ मी चकोर देहीं चंचुपुटीं ॥ तव आननेंदूचे जीवन शेवटी ॥ लक्षूनि तुष्ट झालें असें ॥५१॥

ऐसें बोलतां भुजावंती ॥ परम क्रोधावला नृपती ॥ परी क्रोध नव्हे क्षितीं ॥ वडवानलचि पेटला ॥५२॥

वडवानल तरी कैसा ॥ शिखा मिरवी अंबरलेशा ॥ सुतरत्नालागीं कैसा ॥ ग्रासूं पाहे क्षणांत ॥५३॥

मग तैसाचि येऊनि सदनाबाह्ये ॥ आरक्त नेत्रीं भंवता पाहे ॥ म्हणे कोणी तरी येथे आहे ॥ पुढें यावें माझिया ॥५४॥

तंव ते भृत्य धांवत येती ॥ भृत्य नव्हे ते कृत्तांत दिसती ॥ राव वरुनि क्रोधरीती ॥ स्वतां त्यांतें लोटीतसे ॥५५॥

म्हणे भृत्य हो याचि पावलीं ॥ जाऊनि मम सुताची करा होळी ॥ अथवा बंधन करुनि हस्तवेली ॥ खंडोनियां टाकाव्या ॥५६॥

ऐसें बोले नृपनाथ ॥ दूत धांवती वाताकृत ॥ सदन वेढूनि राजसुत ॥ मृत्युमहीं नेलासे ॥५७॥

परी ते सेवक ज्ञानखाणी ॥ पुनः जाती राजांगणी ॥ म्हणती महाराजा मृत्युभुवनीं ॥ कृष्णागरु पैं नेला ॥५८॥

राव क्रोधें तयां पहात ॥ म्हणे हस्तपादांते करा खंडित ॥ पुनः येवोनि सांगत ॥ धांवधांवोनि रायातें ॥५९॥

तरी रायाचा कोपानळ ॥ कदा न होय शीतळ ॥ पुनः पाहोनि दूतमेळ ॥ तीच आज्ञा आज्ञापा ॥६०॥

परी ते भृत्य देहस्थितीं ॥ म्हणती हा स्वामी राजसुत ॥ यासी वधितां काय अनर्थ ॥ कैसा होईल कळेना ॥६१॥

ऐसे संदेहें भयस्थित ॥ पुनः जाती राजांगणांत ॥ परी तो राव अति संतप्त ॥ तीच आज्ञा आज्ञापी ॥६२॥

मग ते दूत निष्ठुरपणी ॥ चौरंग आणिती कनककोंदणीं ॥ तयालागी बैसवोनी ॥ कार्यावर्ती वहिवटले ॥६३॥

शुद्ध चर्‍हाटें बांधोनि हस्त ॥ तदा नेत कृष्णागरातें ॥ म्हणती बंधसिद्ध केले हस्त ॥ खंडविखंड करावया ॥६४॥

परी कृष्णागर चव्हाटां नेला ॥ हा वृत्तांत सकळ ग्रामांत कळला ॥ मग चुंगारचुंगार मेळा ॥ विलोकावया धांवती ॥६५॥

येरीकडे येरीकडे राजांगणी ॥ मिळाले थोर प्राज्ञीं ॥ परी नृपतीचा क्रोधाचि पाहुनी ॥ बोलो न शकती कदाचित ॥६६॥

तरी वृत्तीचा क्रोधानळ ॥ लोकबोलाचें सुभद्रजळ ॥ प्राशनें भेणें उतावेळ ॥ धांव मागें घेतसे ॥६७॥

येरीकडे चव्हटेंशी ॥ कनकचौरंगी राजसुतासी ॥ दूर्ती बैसवोनि हस्तपादांसी ॥ योजिते झाले छेदावया ॥६८॥

शस्त्र करुनियां नग्न त्वरित ॥ एकें घायाळ केले हस्त ॥ तैसेचि झाले चरण व्यक्त ॥ भग्न होऊनि पडियेला ॥६९॥

एकचि आकांत वर्तला तेथें ॥ कोणी कोणा न विचारी जेथे ॥ पाहूनि सकळ संग्रामातें ॥ भयभीत संपूर्ण ॥७०॥

उपरी योजूनि पद निगुतीं ॥ तीक्ष्णधारा शस्त्रें हाणिती ॥ तीहीं एका घायें क्षिती पदकमलीं पडियेली ॥७१॥

मग रुधिराचा भडभडाट ॥ महीं लोटला अपार लोट ॥ जेवीं युवतिकुंकुममळवट ॥ तेवीं धारा शोभली ॥७२॥

परी राव तो कृष्णागर ॥ मूर्च्छेनें व्यापूनि तीव्र ॥ कनकासनीं चौरंगावर ॥ उलथोनियां पडियेला ॥७३॥

प्राण होऊनि कासावीस ॥ मुखावरी दाटला फेस ॥ उपरी कोरड पडली मुखास ॥ श्वेतनयन पैं केले ॥७४॥

मग तें दुःख पाहूनि लोक ॥ दुःखानें करिती महाशोक ॥ अहा कृष्णागरासारखें माणिक ॥ व्यर्थ राये भंगिले ॥७५॥

एक म्हणती म्हातारपणीं ॥ राव चळला आहे प्राज्ञी ॥ ऐसा पुत्र लावण्यखाणी ॥ नष्ट केला पदवीचा ॥७६॥

तरी राजा परम भ्रष्ट ॥ झाला आहे निर्दय नष्ट ॥ आतां येथें राहतां उत्कृष्ट ॥ योग्य काहीं दिसेना ॥७७॥

सहज प्रपंचाचे पाउलीं ॥ पडतसे आड पाउली ॥ परी रायें हदयीं क्षमा न केली ॥ घात करील कधीं तो ॥७८॥

अहा एकुलता एक बाळ ॥ त्यावरि पाखडिला क्रोधानळ ॥ मग प्रजान्याया कैसा शीतळ ॥ वृद्ध राव राहील हा ॥७९॥

एक म्हणे राजनीती ॥ तैशीच आहे सर्व क्षितीं ॥ गृहीं दाविली क्रोधसंपत्ती ॥ धाक पडेल प्रजेतें ॥८०॥

एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर ॥ कुबुद्धि धरिली मातेवर ॥ तैं शिक्षा पावला साक्षात्कार ॥ राया दोष न लागेचि ॥८१॥

गौपीडक व्याघ्रे असला ॥ तरी कां मारुं नये त्याला ॥ तरी रायानें धर्म पाळिला ॥ लोभ धरिला नाहीं की ॥८२॥

वृश्चिक होतां दृष्टिव्यक्त ॥ तरी कां करुं नये प्राणांत ॥ दुष्ट आहे कीं धुसधुसीत ॥ मारु नये कीं त्याला ॥८३॥

ऐशा नानापरी युक्तीं ॥ तर्कवितर्क जग बोलती ॥ अपार मेळा चवाठ्याप्रती ॥ मिळाला असे लोकांचा ॥८४॥

त्यांत सहजासहज गमन ॥ गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण ॥ करीत आले चव्हाटेंकारणें ॥ तो अपार मेळा देखिला ॥८५॥

सोडूनि गर्भाद्रिपर्वतातें ॥ न्यावें भेटीसी मच्छिंद्रातें ॥ घेऊनि जाता गोरक्षनाथ ॥ आले होते त्या ठायीं ॥८६॥

आले परी सहज चालीं ॥ नगरदीक्षेची कामना फिरली ॥ म्हणोनि पाहतां व्यवहारपाउली ॥ येवोनि तेथें धडकले ॥८७॥

धडकले परी अपार मेळ ॥ पाहूनि त्यांत संचरले गौरबाळ ॥ तों कृष्णागर होऊनि विकळ ॥ कनकचौरंगी पडियेला ॥८८॥

मग मच्छिंद्रातें पाचारुन ॥ दाविता झाला गौरनंदन ॥ जळचरसुतें पाहून ॥ परम चित्तीं द्रवलासे ॥८९॥

परी त्याचा अन्याय काय ॥ लोकांपाशी पुसों जाय ॥ क्षण स्थिर करुनि हदय ॥ करणी विलोकी बाळाची ॥९०॥

तों सहज अंतरीं दृष्टि करितां ॥ त्या समजली तयाची माता ॥ आणि कृष्णागरासी वरता ॥ अवतारदक्ष आढळला ॥९१॥

ऐसा शोध शोधिल्या चित्तीं ॥ मग क्रोधें दाटले तपोगभस्ती ॥ म्हणे अहो हे रांड शक्ती ॥ प्रविष्ट झाली लोकांत ॥९२॥

परी तो आहे मूर्ख राय ॥ चित्तीं योजितां न ये न्याय ॥ बाळावरी तिनें घाय ॥ कोपशस्त्रीं योजिला ॥९३॥

तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट ॥ विषयलोभी अति वरिष्ठ ॥ महीं नसावा महाभ्रष्ट ॥ महीमार आगळा ॥९४॥

लागूनि कांतेच्या बुद्धिसंगतीं ॥ बाळालागीं केली आर्ती ॥ तस्मात् राव विषयभक्ती ॥ ठेवूं नये महीसीं ॥९५॥

ऐसें चित्तीं धरुनि तेथून ॥ उभय निघाले मंडळांतून ॥ मग गोरक्षा सकळ खूण ॥ निवेदिली रायाची ॥९६॥

सकळ गोरक्षां निवेदन होता ॥ तोही आपुले हदयीं पाहतां ॥ पाहूनि म्हणे गुरुनाथा ॥ यांचे नांव रंगाते आणावें ॥९७॥

कृष्णागर तो चौरंगीं व्यक्त ॥ म्हणोनि चौरंगी बोलला नितांत ॥ कृष्णागर हें नाम महींत ॥ नाहीं म्हणोनि वदलासे ॥९८॥

आणि हस्तपादादि सकळ ॥ एका चौरंगी झाले सकळ ॥ म्हणोनि चौरंगी गौरबाळ ॥ सहजस्थितीं वदलासे ॥९९॥

असो गोरक्ष मच्छिंद्रातें ॥ म्हणे राजसदना जाऊं त्वरिते ॥ मागूनि घ्यावें चौरंगातें ॥ नाथपंथीं मिरवावया ॥१००॥

मच्छिंद्र म्हणे कर्मशासन ॥ रावराणीतें दुःख दावून ॥ मग न्यावा शिवनंदन ॥ नाथपंथीं मिरवावया ॥१॥

गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसें ॥ नऊं आधीं चौरंगास ॥ पूर्णपर्णी नाथपंथास ॥ विद्यार्णव करावा ॥२॥

मग तयाचेचि हातीं ॥ रायासी दावावी प्रतापशक्ती ॥ आणि त्या रांडे चामुंडेप्रती ॥ ओपणें तें ओपावें ॥३॥

तरी आतां सौम्य उपचार ॥ राया करुं वागुत्तर ॥ मागून घ्या स्नेहपरिवार ॥ चौरंगीतें महाराजा ॥४॥

ऐसी गोरक्ष बोलतां वाणी ॥ अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी ॥ मग उभयतां राजसदनीं ॥ प्रविष्ट जाहले महाराजा ॥५॥

पुढें धाडूनि द्वाररक्षक ॥ श्रुत करविलें नांव दोंदिक ॥ कीं मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक ॥ भेटीसी येती महाराजा ॥६॥

रायें ऐकोनि ऐसें नाम ॥ मनीं उचंबळे भावार्थ प्रेम ॥ मनांत म्हणे योगद्रुम ॥ वंद्य असती हरिहरा ॥७॥

परी मम दैवार्णवा सुफळबांध ॥ मच्छिंद्रकृपेचा वोळला मेध ॥ ऐसें म्हणूनि लागवेग ॥ कनकासन सांडिलें ॥८॥

सम्यक सामोरा होऊनि नृपति ॥ दृष्टीं देखतां मच्छिंद्रजती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ आलिंगीतसे प्रेमानें ॥९॥

म्हणे महाराजा अज्ञानभंगा ॥ अज्ञानपतिता बोधली गंगा ॥ वळूनि धीर पावल्या संगा ॥ कुशब्दपाप नाशील ॥११०॥

ऐसें म्हणोनि राव पुढती ॥ नमिता झाला गोरक्षाप्रती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ सभेस्थानीं आणिलें ॥११॥

बैसवूनि कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजिले मुनी ॥ उपरी उभय जोडूनि पाणी ॥ उभा राहिला सन्मुख ॥१२॥

म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ तुमचे चरणीं असे मम प्रेमा ॥ दर्शन दिधलें भक्तिउगमा ॥ मम अभक्ताकारणें ॥१३॥

तरी आतां कामशक्तीं ॥ वेध कोणता सांगा जती ॥ जेवीं ऋतुकाल द्रुमाप्रती ॥ फळे येतील तैशींच ॥१४॥

तरी चिच्छक्तिउल्हासपणें ॥ अर्थ दावा मजकारण ॥ ते त्यावरी कामना पावन ॥ तुष्ट होईल महाराजा ॥१५॥

ऐसें बोलतां नरेंद्रपाळ ॥ मच्छिंद्रचित्तद्रुमाचें फळ ॥ शब्दचातुर्यलापिका रसाळ ॥ चौरंगभावीं निघालें ॥१६॥

म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ एक काम वेधला आम्हां ॥ आज तुमच्या कौंडण्यग्रामा ॥ शासनीं बाळ विलोकिला ॥१७॥

राया तिष्ठतां तव कोपाग्न ॥ तयाचे हस्तपाद केले भग्न ॥ तो जरी तुमचा अन्यायी उत्तम ॥ आम्हांलागीं ओपावा ॥१८॥

राव ऐशी ऐकूनि मात ॥ हदयीं गदगदोनि हांसत ॥ म्हणे महाराजा योगी समर्थ ॥ काय त्या कराल नेवोनि ॥१९॥

म्हणाल करील सेवाभक्ती ॥ तरी भग्न झाला पदहस्तीं ॥ तरी त्या पंथ गमाया शक्ती ॥ कांहीं एक दिसेना ॥१२०॥

तुम्हीच वाहोनियां आपुल्या स्कंधीं ॥ वागवाल कीं कृपानिधी ॥ तो स्वामी तुम्ही सेवकबुद्धी ॥ आचराल कीं महाराजा ॥२१॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ तो सत्यपणें शक्त कीं अशक्त ॥ इतुके वद कीं आमुचे अर्थ ॥ कासया तूं पाहशी ॥२२॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रजती ॥ अवश्य म्हणे शशांगरनृपती ॥ घेऊनि जावें आवडल्या चित्तीं ॥ सिद्धसंकल्प महाराजा ॥२३॥

ऐसें बोलतां धरापाळ ॥ उठोनि आले तत्काळ ॥ परोपकारी अति कनवाळ ॥ चौरंगापाशीं पातले ॥२४॥

कनकचौरंगी सधीर युक्त ॥ तैसाचि उचलिला महीभुवसुत ॥ नेऊनि आपुले शिबिरांत ॥ हस्तपाद तळविले ॥२५॥

येथें श्रोते कल्पना घेती ॥ निजीवास सजीव करितो जती ॥ तेणें चौरंगीहस्तपादांप्रती ॥ स्नेहकढयी कां तळविलें ॥२६॥

निर्जीव पुतळा नृत्य करीत ॥ तेथें मिरवले गहिनीनाथ ॥ मग हस्तपादनिमित्त ॥ काय अशक्य झालें तें ॥२७॥

तरी कवि म्हणे पुढील कारण ॥ होतें म्हणोनि मच्छिंद्रानें ॥ लोहढथीं द्विमूर्धानें ॥ स्नेहीं तळले पदहस्त ॥२८॥

तूतें करोनि दुःखाचें शमन ॥ पुढें पहा म्हणती नेमानेम ॥ समान उत्तमोत्तम ॥ फळा मिरवूं ययासी ॥२९॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ तळों लागले पदहस्ती ॥ मग तेथें राहोनि एक राती ॥ पुढें गमती महाराजा ॥१३०॥

चौरंगी स्कंधीं वाहून ॥ मार्ग गमीतसे गौरनंदन ॥ मग ग्राम पाहूनि निघून ॥ बद्रिकाश्रमीं पातले ॥३१॥

शीघ्र जावोनि शिवालयांत ॥ भावें वंदिला उमाकांत ॥ उपरी चौरंगी ठेवूनि तेथ ॥ काननांत संचरले ॥३२॥

काननीं हिंडतां तेथ पाहीं ॥ तों एक गव्हर देखिलें महीं ॥ देखतां विसरती तया ठायीं ॥ गुहागृहामाझारी ॥३३॥

तंव तें गव्हर परम गोमट ॥ पाहूं बोलती प्रताप सुभट ॥ म्हणती चौरंगीनिश्चयतुळवट ॥ येथें कसून पहावा ॥३४॥

पाहावें तरी कैसें रीतीं ॥ मग काय करिते झाले जती ॥ एक शिळा विस्तीर्ण शक्ति ॥ गोरक्षनाथें आणिली ॥३५॥

आणिली परी गुहागृहांत ॥ उचलूनि वरल्या जमिनीत ॥ शस्त्र अस्त्र जल्पूनि तेथें ॥ अंधारव्यक्त केलेंसे ॥३६॥

ऐसें कृत्य करुनि तेथें ॥ पुन्हां परतोनि आले नाथ ॥ स्कंधीं वाहूनि चौरंगीतें ॥ पुन्हां परतोनि गेले त्या ठायीं ॥३७॥

तेव्हां गृहद्वारासमीप ॥ तरु एक होत विशाळरुप ॥ तयाखालीं प्रतापदीप ॥ सावलींत बैसले ॥३८॥

बैसले परी गोरक्षासी ॥ मच्छिंद्र म्हणे भावउद्देशीं ॥ वा अनुग्रह चौरंगासी ॥ याच ठायीं ओपावा ॥३९॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष वदतसे उत्तरातें ॥ मम अनुग्रह तपाश्रित ॥ लाभ होतसे महाराजा ॥१४०॥

तरी चौरंगीचें अनुष्ठान ॥ पूर्णस्वरुपीं मी पाहीन ॥ मग प्रसन्नचित्तें देईन ॥ अनुग्रह महाराजा ॥४१॥

ऐसें बोलतां वरदउक्ती ॥ मच्छिंद्र म्हणे बरवी नीती ॥ तरी याचि ठायीं चौरंगीप्रती ॥ तपालागीं स्थापावा ॥४२॥

ऐसें म्हणूनि गोरक्षासी ॥ पुसता झाला चौरंगासी ॥ हे बाळा तूं पूर्ण तपासी ॥ बसतोसी कीं या ठाया ॥४३॥

यावरी बोले चौरंगनाथ ॥ मी मान्य तुमचे कर्तव्यांत ॥ जेथें ठेवाल राहीन तेथ ॥ सांगाल करीन तैसेंचि ॥४४॥

परी एक मागणें आहे येथें ॥ तुम्ही जावें कोण्या देशातें ॥ परी प्रतिदिनीं माझा हेत ॥ कूर्मदृष्टीं रक्षावा ॥४५॥

इतकें मातें दिधल्यास दान ॥ सकळांत माझे कल्याण ॥ दिवसानुदिवस माझे स्मरण ॥ तव धवळारीं पाळावें ॥४६॥

तुम्हांस होतां माझें स्मरण ॥ त्या कृपें होईल माझें पोषण ॥ जैसें कूर्मदृष्टीकरुन ॥ बाळालागीं पोषीतसे ॥४७॥

ऐसें बोलतां चौरंगनाथ ॥ उमय झाले तोषवंत ॥ मग उचलोनि गुहागृहांत ॥ चौरंगीतें ठेविलें ॥४८॥

ठेविलें परी त्यास सांगती ॥ बा रे ऊर्ध्व करीं कां दृष्टीप्रती ॥ शिळा सुटक दिसे क्षितीं ॥ पडेल वरती तुज राया ॥४९॥

परी आपुले प्रसादेंकरुन ॥ तूतें देतों एक वरदान ॥ दृष्टी याजवरुन ॥ काढूं नको कदापि ॥१५०॥

जरी दृष्टी किंचित चुकुर ॥ होता पडेल अंगावर ॥ मग प्राण सोडूनि जाईल शरीर ॥ चूर्ण होशील रांगोळी ॥५१॥

मग पुढील कार्य साधेपर्यंत ॥ सकळ राहिले नरदेहांत ॥ तरी जतन करुनि शरीरांत ॥ हित आपुलें जोडी कां ॥५२॥

मग एक मंत्र सांगूनि कानीं ॥ म्हणे करी याची सदा घोकणी ॥ येणेंचि सर्व तपालागुनी ॥ प्राप्त होसील पाडसा ॥५३॥

मग गोरक्ष जाऊनि उत्तम फळातें ॥ तया सामोरें आणूनि ठेवीत ॥ म्हणे हें फळ भक्षूनि निश्वितें ॥ पूर्ण तपा आचरी कां ॥५४॥

परी आणिक राया तूतें ॥ दृष्टी रक्षावी जीवित्वनिमित्तें ॥ मंत्र जपावा तपोअर्थे ॥ फळे भक्षावीं क्षुधेसी ॥५५॥

ऐसी त्रिविधा गोष्टी तूतें ॥ सांगितली परी रक्षी जीवातें ॥ तों आम्ही लवकरी करुनि तीर्थातें ॥ तुजपासीं येऊं कीं ॥५६॥

ऐसें सांगूनि चौरंगासी ॥ बाहेर निघे गोरक्षेंसी ॥ शिळा आपुले गुहाद्वारासी ॥ बंधन केलें दृष्टोत्तर ॥५७॥

या उपरांतीं तपाचारशक्ती ॥ चामुंडा स्मरला लावोनि चित्तीं ॥ तंव त्या स्मरतां येऊनि क्षितीं ॥ गोरक्षातें भेटल्या ॥५८॥

म्हणती महाराजा योगोत्तमा ॥ कामना उदेली कोण तुम्हां ॥ तैसाचि अर्थ सांगूनि आम्हां ॥ स्वार्थालागीं मिरविजे ॥५९॥

येरी म्हणे हो शुभाननी ॥ मम प्राण आहे या स्थानीं ॥ तरी तयाच्या क्षुधेलागुनी ॥ नित्य फळें ओपावीं ॥१६०॥

आणावी परी गुप्तार्थ ॥ फळें ठेवावीं त्या नकळत ॥ शिळे उचलूनि जावें त्वरित ॥ नित्य फळें ओपावीं ॥६१॥

ऐसें सांगूनि चामुंडेसी ॥ चालते झाले तीर्थवासी ॥ सहज चालीं चालतां महीसीं ॥ गिरनारपर्वतीं पोंचले ॥६२॥

येरीकडे चामुंडा सकळ ॥ उत्तम आणूनि देती फळ ॥ शिळा उचलूनि उतावेळ ॥ काननांत सांडिती ॥६३॥

सांडिती परी कैसे रीतीं ॥ गुप्त सेवा करुनि जाती ॥ परी चौरंगी महाजती ॥ शिळाभयें दाटला ॥६४॥

मनांत म्हणे गुरुवचन ॥ कीं शिळा घेईल तुझा प्राण ॥ म्हणोनि दृष्टीं याकारण ॥ अखंडित रक्षावें ॥६५॥

ऐसी भावना आणूनि चित्तीं ॥ दृष्टी ठेवी शिळेप्रती ॥ मुखीं नाम मंत्रउक्ती ॥ आराधींत सर्वदा ॥६६॥

परी त्या शिळेच्या भयेंकरुन ॥ खाऊं विसरला फळाकारण ॥ किंचित वायूचें होतां गमन ॥ तोचि आहार करीतसे ॥६७॥

शिळेवरती सदा दृष्टी ॥ परी ऊर्ध्वभागीं ओपिली दृष्टी ॥ अंग हालवेना महीपाठीं ॥ अर्थ कांहीं चालेना ॥६८॥

जरी करावें चलनवलन ॥ नेणों दृष्टीसी चुकुरपण ॥ शिळा झालिया घेईल प्राण ॥ म्हणोनि न हाले ठायातें ॥६९॥

फळें जरी चांचपूनि घ्यावें हातीं ॥ नेणों तिकडे जाय अवचितीं ॥ चित्त गेलिया इंद्रियें समस्तीं ॥ तयामागें धांवती ॥१७०॥

मग चित्त बुद्धि अंतःकरण ॥ हें तों ऐक्य असती तिचे जण ॥ फळ स्पर्शितां भावनेकरुन ॥ भ्रष्ट होईल सर्वस्वें ॥७१॥

मग मंत्ररुपें स्मरणशक्ती ॥ आबुद्ध करील माझी मती ॥ म्हणोनि सांडिलें फळप्राप्ती ॥ योगाहूनि लक्षीतसे ॥७२॥

ऐसी उभयतां कांचणी करुन ॥ आटत चालिले रुधिर प्राण ॥ परी तें रुधिर मांस लक्षून ॥ आटत आहे तंव सत्य ॥७३॥

रुधिर मांसालागूनि भक्षीत ॥ भक्षूनि उदरकमय करीत ॥ शेवटीं चित्तासी हरीत ॥ भक्षण करीतसे नित्यशः ॥७४॥

चित्ता आटिलें सकळ रुधिर ॥ पैं शरीर उरलें अस्थिपंजर ॥ वरी उगवली त्वचा त्यावर ॥ गवसणीपरी विराजे ॥७५॥

जोंबरी शरीरीं असे प्राण ॥ तोंबरी अस्थि त्वचा घ्राण ॥ प्राण भंगल्या भंग जाण ॥ सर्वत्रासी माहिती ॥७६॥

नाडी त्वचा अस्थी ॥ चौरंगी उतरल्या देहाप्रती ॥ सूक्ष्म शरीरीं आपण भूतीं ॥ त्रासूनियां पळाले ॥७७॥

मग तो देह काष्ठासमान ॥ बोलारहित चलनवलनहीन ॥ ऐसें पाहूनि बाळ तान्हें ॥ वारुळ वरी रचियेलें ॥७८॥

मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रती ॥ मुखीं ध्वनि मंत्रशक्ती ॥ तितुकें उरे मग निश्वितीं ॥ जिकडे तिकडे झालीसे ॥७९॥

ऐसेपरी चौरंगीतें ॥ झालें आहे निजदेहातें ॥ यावरी पुढील स्वार्थे ॥ पुढील अध्यायीं ऐका तें ॥१८०॥

तरी हा ग्रंथ नवरत्नहार ॥ आणि वैडूर्य स्वतेजापर ॥ तुम्हां श्रोतियां शृंगार ॥ धुंडीसुत अर्पीतसे ॥८१॥

नरहरिवंश मालूतें ॥ मालू नरहरीचा शरणागत ॥ तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ ॥ श्रोतियांतें संकल्पिला ॥८२॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ एकत्रिंशाध्याय गोड हा ॥१८३॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३१॥ ओंव्या ॥१८३॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार एकत्रिंशाध्याय समाप्त ॥