Get it on Google Play
Download on the App Store

पोलिसांकडून छळवाद 3

दिगंबर राय गिरफरदार झाले. त्यांच्याबद्दल अनेकांना मत्सर वाटतच होता. त्यांची कीर्ती, लोकप्रियता अनेकांना सहन होत नव्हती. दिगंबर रायांना सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली. पन्नाशी उलटून गेलेली. सुखात वाढलेले दिगंबर राय. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्या हातापायांत शृंखला घालून नेण्यात आले. राखालच्या डोळ्यांत अश्रूंचे पूर आले. हा थोर पुरुष तुरुंगात मरणार, हा कलेचा चाहता कारागृहात मरणार, असे त्याचे हृदय त्याला सांगू लागले.

दिगंबर रायांची तुरुंगात रवानगी झाली. आता राखालवर खटला सुरू झाला. निर्भय, खरा कलाभक्त राखाल ! तो म्हणाला, “जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी उघड तलम कपडा विणीन ! मी बंड करीन ! कलेचा खून मी उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. ही बोटे छाटा, हात तोडा, माझ्या पायाच्या बोटांनी विणीन. पाय तोडा. बायकोला शिकवीन. मुलाला शिकवीन, त्यांना विणायला लावीन. माझ्या हृदयात विणीन, डोक्यात विणीन !” राखाल एखाद्या ध्येयासक्ताप्रमाणे बोलत होता.

अधिकारी संतापले. लोकांना दहशत बसवल्याशिवाय भागणार नाही. हे बंड वेळीच दाबले पाहिजे. हा जिवंत अंकुर मारून टाकला पाहिजे. लोकांना जरब बसली पाहिजे. वरच्या अधिका-यांकडून याप्रमाणे लिहून आले. राखाल, कलाभक्त राखाल, तेजस्वी, धर्मभक्त, स्वधर्मनिष्ठ राखाल, त्याला भर चौकात फाशी देण्याचे ठरले ! फाशीची शिक्षा राखालला फर्मावण्यात आली. कायदे न मानणारा व कायदे मानू नका असे चिथावणारा हा बंडखोर आहे. असा त्याच्यावर आऱोप लादण्यात आला. याचे नुसते हात छाटून, बोटे छाटून भागणार नाही. याला जिवंत ठेवणे धोक्याचे आहे, असे सरकारने जाहीर केले. लोकशाहीला हा विघातक आहे. राखालला जिवंत राखण्यात लोकशांतीला धोका आहे, असे सरकारने जाहीर केले.

राखालची पत्नी, त्याचा मुलगा, कोठे जाणार ती ? ती अधिका-यांच्या पोलीस अधिका-यांच्या दारात जाऊन रडली. त्यांना दंडे मारून हाकलून देण्यात आले. अरेरे ! या पृथ्वीने दुभंगून आपणाला पोटात घ्यावे, असे त्या उभयतांना वाटले.

मातेने एक निश्चय केला. पती फासावर चढवला जाण्यापूर्वी आपणच या जगातून नाहीसे व्हावे असे तिने ठरवले. ती आपल्या बाळाला म्हणाली, “बाळ, चल, आपण त्या भेलापुष्कर तीर्थाला जाऊ. देवाची प्रार्थना करू.”

मुलगा आईबरोबर निघाला. घरातले देव घेऊन मायलेकरे निघाली. भेलापुष्करला मायलेकरे आली. बाळ तलावाच्या काठावर उभा होता. मातेने बाळाला पाण्यात लोटले व आपण पाण्यात उडी घेतली. बुड बुड बुड- गेले-दोन तीन गंटागळ्या आणि सारे शांत ! त्या पवित्र पुष्कर तडागाने ते मायलेक-दुःखाने होरपळलेले ते जीव- त्यांना आपल्यात घेतले, त्यांचे अश्रू आपल्या अनंत अश्रूंत मिळवून टाकले.