Get it on Google Play
Download on the App Store

समश्लोकी भगवद्गीता अध्याय चवथा

कर्मयोग अक्षय हा सूर्याला मी तये सुता मनुला ॥

पुत्रा इक्ष्वाकूला मनु शिकवी हे प्रभू तदा वदला ॥१॥

हे अरिताप असा हा राजर्षी ता परंपरें कळला ॥

काल बहू गेल्याने आता तो योग नष्टसा झाला ॥२॥

कर्मयोग तोच आज कथिला मी मित्र भक्‍त पार्थ तुला ॥

योग पुरातन असुनी उतम हे गुह्य होय या महिला ॥३॥

प्राचीन अशा सूर्या नूतन तूं योग शिकविला म्हणसी ॥

पार्थ पुसे शंकेने देवाला गोष्ट ही घडेल कशी ॥४॥

अरिताप अर्जुना मम जन्म बहू हे तसेच तव असती ॥

भगवान वदे जाणे मी पार्थाते तुला न आठवती ॥५॥

स्वामी मी प्राण्यांचा अव्यय मी जन्म ही नसे मजला ॥

प्रकृती माझी वेष्टुनि मायेनें मीच घेत जन्माला ॥६॥

ज्या ज्या समयी भारत धर्म ग्लानी अधर्म की पसरे ॥

त्या त्या समयी घेतो जन्मा मी तत्त्व हेच जाण खरे ॥७॥

साधूना रक्षाया निर्दाळायास दुष्ट लोकाना ॥

धर्मा स्थापायाला युगी युगी पार्थ मीच घे जनना ॥८॥

अलौकिक जन्म कर्मा पार्था जो जाणतो यथार्थ नर ॥

त्यास पुनर्जन्म नसे ईश्‍वर पदा मिळवी तोच पुरुष वर ॥९॥

प्रेम क्रोध भय मुक्‍त मज ठायी लीन अन्य ना घेती ॥

आश्रय ज्ञान तपाने पवित्र जन मजसि येउनी मिळती ॥१०॥

ज्या रीती मज भजती फल तैसे पार्थ मी तया देतो ॥

कोण्या मार्गे जावो अंतीं मजलाच येऊनी मिळतो ॥११॥

फल आशा धरितीते देवांना पूजितीच भक्‍तीने ॥

सत्वरच प्राप्‍त होते सिद्धी या जगति पाथ कर्माने ॥१२॥

गुणकर्म विभागाने ब्राह्मणादि चार वर्ण मी रचिले ॥

त्याच्या कर्त्या मजला अव्यय अकर्ता पाहिजे गणिले ॥१३॥

कर्मे न बांधिती मज कर्म फलेच्छा मज कधी नाही ॥

सत्य स्वरुप माझें जाणे त्या कर्म बंधना कांहीं ॥१४॥

प्राचीन मुमूक्षूंनी समजुनि हें सर्व कर्म ही केले ॥

यास्तवच पूर्वजा समकर्मा त्वां पाहिजेच आचरिलें ॥१५॥

कर्म अकर्म कसें हे ज्ञातेंही जाणणेत गोंधळले ॥

कथितो ज्ञाना मी त्या अज्ञान मुक्‍त मर्म तुला कळलें ॥१६॥

दुर्बोध कर्म आहे सकाम राजस तसेच विपरीत ॥

कर्म विकर्मच जाणा अकर्म तें फलाशा नसे ज्यांत ॥१७॥

अकर्म जन कर्माला कर्म गणी ज्या अकर्म जन वदती ॥

तोच होय कर्मयोगी कर्म करी बुद्धिमान जया म्हणती ॥१८॥

उद्योगांत फलाशा ज्याच्या नाहीं तपास बुध जगती ॥

कर्मे ज्ञानाग्नीने जाळी पंडित असें तया म्हणती ॥१९॥

कर्म फलेच्छा त्यागी कर्मात मग्न धरी न कोणाचा ॥

आधार असा कर्मे करिताही कर्मरहित तो साचा ॥२०॥

सर्व फलाशा सोडी त्यागी संगास इंद्रिया दामी ॥

पुरुष न पापी ऐसा युक्‍त जरी तो निसर्ग वपु का मी ॥२१॥

संतुष्ट सहज लाभे द्वंद्व मुक्‍त मत्सरास जो टाकी ॥

सिद्धि असिद्धि समानचि कर्म करी तरि न बद्ध तो लोकी ॥२२॥

राग द्वेष नसे ज्या आसक्‍ति न ज्ञानमग्न चित्त जया ॥

यज्ञास्तव कर्म करी त्यांचें तें सर्व कर्म जात लया ॥२३॥

आग्नी साधन अर्पण होमहवन हे ब्रह्म ज्या गमते ॥

योगी खरा असें तो ब्रह्मस्वरुप निश्‍चये तया मिळते ॥२४॥

काहीच कर्म योगी देवा प्रीत्यर्थ हवन्ते करिती ॥

यज्ञाने यज्ञाते ब्रह्मस्वरुप अग्निमधे हविती ॥२५॥

श्रोत्रे इंद्रियादि कांहीं संयम अग्नींत करिति कीं हवना ॥

शब्दादी विषयानी इंद्रिय अग्नीस इतर जन यजना ॥२६॥

इंद्रिय कर्मे कोणी प्राणांचीही तशीच करिति हुत ॥

अर्पून सर्व कर्मा ज्ञान प्रदिप्‍त संयम अग्नीत ॥२७॥

संयमी पुरुष कोणी तपयज्ञ वसुयज्ञ योग यज्ञाला ॥

स्वाध्याय यज्ञ करिती हविति ज्ञान इतर यज्ञाला ॥२८॥

प्राण अपानी कोणी प्राणात अपान इतर होमीती ॥

प्राणायाम परायण प्राण अपानास रोधुनी धरती ॥२९॥

कोणी आहार नियमुनि प्राण प्राणा मधेच होमीती ॥

यज्ञेच सर्वजण पापास दग्ध आपुल्या करिती ॥३०॥

यज्ञावशेष अमृता भक्षि सनातन ब्रह्मपद पावे ॥

कुरुश्रेष्ठ इह नाही यज्ञ न करी त्या पद कसे मिळावे ॥३१॥

अनेक विध यज्ञ असे ब्रम्हाच्या मुखी सर्वही असती ॥

हे ज्ञान तुला घडता कर्मापासून होय तुज मुक्‍ती ॥३२॥

ज्ञानाचा श्रेष्ठ यज्ञ द्रव्य-मयाहून जाण अरि ताप ॥

पार्था विलया पावे ज्ञानांतच कर्म शेवटी पाप ॥३३॥

प्रश्‍न विनय सेवाही यायोगे तू ज्ञानि जन्म पुसशी ॥

ज्ञान कसे मिळवावे करिती तुज बोध हा तत्वदर्शी ॥३४॥

पांडव या ज्ञाने पुनरपि मोहा न पावशी ऐशा ।

बघशी तुज मज ठायी त्वयीं भूत वस्तू राहसी आशा ॥३५॥

समजसि अपणा जरि तू पाप्यामध्येच अग्रगण्य तरी ॥

ज्ञानरुप नौकेनें जाशी तू पाप अब्धि पर तीरी ॥३६॥

प्रदीप्‍त अग्नी जैसा काष्ठाचे भस्म अर्जुना करितो ॥

सर्वाही कर्मांचें भस्म तसे ज्ञान अग्निही करितो ॥३७॥

ज्ञान समज गती या पवित्र वस्तू नसे दुजी काही ॥

योग साध्य कालानें होई तो ज्ञान मिळवी आपणही ॥३८॥

उत्सुक जो ज्ञानार्थी श्रद्धाळू इंद्रियास वश ठेवी ॥

ज्ञाना मिळवी जलदी ज्ञानाने पूर्ण शांति ही मिळवी ॥३९॥

श्रद्धा नसोनि अज्ञहि संशयि जो नाश सत्य तो पावे ॥

इह परलोक न मिळता सुख मग ते कोठुनी तया व्हावें ॥४०॥

धनंजय कर्मयोगे त्यागी जो कर्मबंध संशय ही ॥

ज्ञानाने नाशी त्या आत्मज्ञान्या न कर्म बंधन ही ॥४१॥

भारता ज्ञान खड्‌गे अज्ञानज त्‍हृदय संशया तोडी ॥

योगावलंबन करी युद्धाला ऊठ मोह हा सोडी ॥४२॥

सारांश

शा.वि.

घेतो मी अवतार पार्थ जगती येती न जे मोजिता ॥

दुष्ता निर्दलुनी स्वभक्‍त अवना मी योजितो तत्वता ॥

नेता मी जगतास हे समजुनी अर्पी स्वकर्मे मला ॥

ऐसें जो करितो न कर्म कधिही बांधी जगी त्याजला ॥१॥

समश्लोकी भगवद्‌गीता

संकलित
Chapters
प्रस्तावना समश्लोकी भगवद्गीता अध्याय पहिला समश्लोकी भगवद्गीता अध्याय दुसरा समश्लोकी भगवद्गीता अध्याय तिसरा समश्लोकी भगवद्गीता अध्याय चवथा समश्लोकी भगवद्गीता अध्याय पांचवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सहावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सातवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय आठवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय नववा समश्लोकी भगवद्गीता अध्याय दहावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय अकरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय बारावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय तेरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय चौदावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय पंधरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सोळावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सतरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय अठरावा कोण तू----? अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा