Get it on Google Play
Download on the App Store

चार दिवसांचे चांदणे 2

“पण सूत, बारीक सूत कोठे मिळेल ?” दिगंबर रायांनी विचारले.

“माहीत नसलेल्या बायांकडून जपून ठेवलेले आहे काढून. त्या विकायला आणीत. कोणी घेईना. त्यांनाही सांगण्यात आले की, तुम्ही काढाल तर शिक्षा होईल. अमूक केल तर शिक्षा, तमूक केले तर शिक्षा, समुद्राच्या पाण्याचा घडा भरून आणला तरीही शिक्षा म्हणे ! विचित्रच राजा आहे ! समुद्राच्या पाण्यालाही किंमत ? हवा, प्रकाश, यांनाही पुढे किंमत होईल की काय ? गवतकाडी, झाडाचा पाला, यालाही किंमत पुढे पडणार का ? कर पडणार का ? बंदी होणार का ? मग ढोरे मरतील, पोरे मरतील, दुनिया मरेल ! कलियुगच खरोखर यांनी आणले म्हणायचे ! का कल्पना ? सूत मिळेल, माझ्या ओळखीच्या बायका आहेत.” त्यांच्याजवळून मी घेऊन येईन. परंतु मजजवळ पैसे नाहीत सूत विकत घ्यायला !” राखाल म्हणाला.

“ते माझ्याजवळून तुम्ही घेऊन जा, त्याची काळजी नको.” दिगंबर राय म्हणाले.

राखाल गेला. गावोगाव भटकला व गुप्तपणे ते तलम, बारीक, नजर न ठरणारे सूत गोळा करुन घेऊन आला. त्याच्या मदतीस त्याचा मुलगा व बायको होती. राखालला आज कितीतरी दिवसांनी आनंद मिळाला. दिगंबर रायांकडे त्या सर्वांना खाणयापिण्यास मिळे, म्हणून का आनंद झाला ? नाही. खाण्यापिण्याचा आनंद हा पशु-पक्ष्यांचा आनंद ! कलेची पूजा करावयास मिळाली, देवाची पूजा हातांना, डोळ्यांना, पायांना करायवयास मिळाली म्हणजे त्यांना आनंद झाला. कोमेजलेल्या फुलावर पाणी शिंपल्याने ते जसे जरा टवटवीत दिसते, वाळलेल्या तृणपर्णावर निसर्गमातेने, निशादेवीने, उषाराणीने चार दवबिंदू टाकताच ते जसे टवटवीत हिरवे हिरवे दिसू लागते, त्याप्रमाणे राखालचे तेजहीन विकल मुखकमल टवटवीत दिसू लागले, त्याच्या तोंडावर आनंदकिरण नाचत होते. ते पाहा डोळे हसत आहेत, फुलत आहेत. ‘झिनी झिनी झिनी झिनी बिनी चादरिया’ बाहेर विणीत होता ; आतही आनंदाचे वस्त्र, आनंदाचा पीतांबर विणून हृदयदेवाला नेसवीत होता. कलावानाचा आनंद कलावानच जाणे ! त्याची ती समाधी, ती तन्मयता, ती स्वार्थनिरपेक्षता, सुखविन्मुखता, बाह्यविस्मृती त्याची त्यालाच पाहीत. त्याने विणलेल्या वस्त्रांत जी कोमलता व पवित्रता भासते, ती याचमुळे. त्याच्या हृदयाचा पवित्र आनंद त्या वस्त्रांत उतरे व ते वस्त्र परिधान करणार्‍यालाही उन्नत करी, पवित्र करी. ध्येयप्रवण करी ! क्षुद्रत्वापासून, गुलामगिरीपासून, नीच सेवेपासून दूर ठेवी. कलावान कलावस्तूच जगाला देत नसतो ; तद्द्वारा हृदय देत असतो, विचार देत असतो, भावना देत असतो, ध्येय देत असतो, धर्म देत असतो, देव देत असतो. जे आपण पाहतो, जे आपण खातो, ऐकतो, पितो, पेहरतो त्या सर्वांचा हृदयावर परिणाम होतो. प्रत्येक वस्तू व प्रत्येक विचार, प्रत्येक उच्चार व प्रत्येक आचार यांना शक्ती असते. त्यांना जीव असतो. त्यांचा परिणाम जीवनावर होत असतो. कलावानाची मनोभूमिका जितकी उंच असेल, तितकी उंच समाजाची मनोभूमिका तो नेत असतो.