Get it on Google Play
Download on the App Store

राजा दिगंबर राय 3

दिगंबर रायांचा गावात तलाव होता. तो तलाव एका बाजुस जरा कोसळणार होता. सार्‍या गावाचा त्या तलावावर व्यवहार. गावाचा तो जीवनाधार. दिगंबर रायांनी ताबडतोब त्याची दुरुस्ती केली. असे हे दिगंबर राय होते. घरात मुलेबाळे होती. आनंद होता.

दिगंबर रायांना हे मिलच्या सुताचे कापड पटेना. आजपर्यंत ते तलम सुंदर कापड वापरीत आले. कोणी त्यांना सांगितले की मिलच्या सुताला खळ दिलेली असते. मिलच्या कपड्याला तकतकी असते. त्यात चरबी असते. गाईगुरांची चरबी असते ! दिगंबर रायांच्या अंगावर शहाराच आला. गाई ! पूज्य गोमाता. माझ्या कृष्णभगवानाच्या, गोपालकृष्णाच्या गाई, त्यांची चरबी! राम राम ! आणि माझे लोक हा कपडा कसा अंगावर घालतात ? हे रक्त, ही आग यांना अंगावर सहन होते ? दिगंबर राय या कपड्यांचा विटाळही होऊन देत नसत.

त्यांचा मुलगा कलकत्त्याला गेला होता. शहरात येऊ लागलेला विलायती माल पाहून तो भुलला. तो चैनबाज बाबू विलायती माल घेऊन घरी आला. दिगंबर राय म्हणाले, “हे काय पाप आणलेस रे करंट्या ?”

“बाबा, कसे मऊ तजेलदार कापड आहे ! हल्ली ते जाडे कापड तुम्ही देता आम्हांला, ते नको.” त्यांचा मुलगा म्हणाला.

“अरे, ही तकतकी त्या गोमातेच्या रक्ताची आहे ! अंगणात ठेवून त्याला आग लाव, आग! जाडेभरडे- अरे, तुझ्या आयाबहिणींनी काढलेले ते सूत. त्यांना बारीक काढू देत नाहीत. त्यांनी काढले तर कोणी विकत घेत नाही. विणायला या गो-घातक्यांनी कायद्याने बंदी केली. नाही तर आतापर्यंत आम्ही बारीकच कपडे नाही का वापरले ? आता जाडे वापरा ! जाडेभरडे ! पण निर्मळ आहेत ते. तेच वापरा. ठेव ते अंगणाच्या बाहेर. ते देऊही नकोस कोणाला. विष आपणही खाऊ नये व देऊही नये कोणाला. रोगाचे जंतू मारूनच टाकावेत. गोवधाचे हे पाप- हे कसे कोणाला आपणहून द्यावयाचे ? फुकट झाले- फुकट दिले म्हणून कोण पाप का घेईल ? आणि कोण घेणारा निघाला तर आपण द्यावे का ? लाव त्याला आग.”

दिगंबर रायांनी त्या विलायती वस्त्रांची होळी केली. हिंदुस्थानातील ती पहिली विलायती कापडाची झालेली पवित्र होळी ! ती कोणाला  माहीत नाही, कोणाला ठाऊक नाही. हिंदुस्थानच्या एका कोपर्‍यातील खे़ड्यातील अंगणात जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वी ती होळी झाली. ती होळी अजून विझली नाही. ती रावणाच्या चितेप्रमाणे विझणार नाही. स्वतंत्र झाल्याशिवाय, सीता शुद्ध झाल्याशिवाय ती होळी विझणार नाही !