Get it on Google Play
Download on the App Store

भुताला कामगिरी

एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरु केला, पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे, त्याच्यावर देवाऎवजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले.

ते भूत त्याला म्हणाला, 'तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन, पण जर का तू मजकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास, तर मात्र मी तुला खाऊन टाकीन.'त्या माणसानं आंबे मागितले, भुतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले !त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली, भुतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली !त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला, भुतानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करुन ठेवला !दहा हजार रुपयांची मागणीही त्या भुतानं अशीच बघता बघता पूर्ण केली !

'मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय ? या विचारात तो मनुष्य पडला असता, ते भूत त्याला म्हणालं, 'मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्या जवळ ? मग मी आता तुला खाऊन टाकतो.'भुताची एक धमकी ऎकून त्या माणसाला एक युक्ती सुचली. तो त्या भुताला म्हणाला, 'एक मल्लखांब तयार करुन तो मागल्या अंगणात पूर पाहू ?'मल्लखांब तयार करुन, तो पुरलादेखील,' भूत म्हणालं.तो गृहस्थ त्या भुताला म्हणाला, 'बस्स ! आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं, आणि माझं काम झालं रे झालं, की या मल्लखांबाकडे जाऊन, त्याच्यावर चढत उतरत राहायचं.'

अशा तर्‍हेने त्या मनुष्यानं त्या भुताकडून आयुष्यभर आपली कामे तर करुन घेतलीच, पण उरलेल्या वेळेत त्या भुतामागे त्या मल्लखांबावर चढण्या-उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम नसलेल्या वेळी येणार्‍या मृत्युची भीतीही टाळली.