Get it on Google Play
Download on the App Store

पत्र चवथे 5

तुला ती एका म्हाता-याची गोष्ट माहीत आहे का? त्याला दोन मुलगे होते. आपली इस्टेट कुणाला द्यावयाची याचा तो विचार करीत होता. कोणता मुलगा शहाणा? शेवटीं त्यानें परीक्षा घेण्याचें ठरविलें. त्यानें प्रत्येकाला चार दिडक्या दिल्या व तो म्हणाला, ''या चार दिडक्या घ्या व ह्या शेजारीं दोन खोल्या आहेत, त्यांतील प्रत्येकानें एक खोलीं नीट भरुन ठेवावी.'' दोघे मुलगे विचार करूं लागले. मोठा मुलगा म्हणाला, ''चार दिडक्यांत अशी कोणती वस्तु मिळेल कीं, जिनें ही सारी खोली भरतां येईल? इतकी स्वस्त व मुबलक कोणती गोष्ट? बाबांची कांही तरीच अट ! अडाणी व हट्टी आहेत बाबा.'' परंतु त्याला एक युक्ति सुचली. गांवचा सारा कचरा एके ठिकाणीं टाकण्यांत येत असे. हा कचरा त्यानें विकत घेतला. गाडीभर कचरा त्याला मिळाला. तो कचरा त्यानें खोलीत ओतला. खोली भरुन गेली. त्याला आनंद झाला ! बाप आपल्यावर प्रसन्न होऊन आपणांसच सारी इस्टेट देईल, असें त्याला वाटलें. त्या दुस-या भावानें काय केलें? त्यानें दोन दिडक्यांच्या आठ पणत्या आणल्या. एका दिडकीचें तेल घेतलें. एका दिडकीच्या वाती घेतल्या. त्यानें खोली स्वच्छ झाडूनसारवून त्या आठ पणत्या आठ दिशंना लावून ठेवल्या ! बाप पहावयास आला. तों एका खोलींत कच-याचा ढीग ! अरे हे रोगाचे जंतू येथें कशाला आणलेस? घाणीनें का खोली भरायची ! ''असें म्हणून पिता दुस-या खोलीकडे वळला. तों त्या खोलींत सुंदर प्रकाश भरलेला होता. ज्योति तेवत होत्या. दिवा देखून नमस्कार ! त्या पित्याचें मन प्रसन्न झालें. त्यानें त्या ज्योतींना प्रणाम केला. त्यानें लहान मुलाच्या पाठीवर शाबासकी दिली व तो म्हणाला, ''बाळ, तूं शहाणा आहेंस, तुला घे इस्टेट !''

वसंता, जुन्या इतिहासांतील कचरा घेऊन आपण पुढें जाणार कीं, शेंकडो वर्षाच्या इतिहासांतून जें मांगल्य आपण निर्मिलें, ज्या मधुर रुढि निर्मिल्या, सुरेख रीतीरिवाज निर्मिले ते घेऊन पुढें जाणार? एखाद्या मनुष्याची एका गावांहून दुस-या गांवाला जर बदली झाली तर तो बरोबर काय नेतो? मौल्यवान वस्तु बरोबर नेतो. फुटक्या कांचा, खोकीं, टिनपाटें, केरसुण्यांचे बुडखे, दगडधोंडें हे तो बरोबर नेतो का? मग आपणांस तर एका शतकांतून दुस-या शतकांत जावयाचें आहे. अशा वेळेस मंगल स्मृतीचे कांहीं तारेच बरोबर घेऊन गेले पाहिजे. काळाच्या ओघांत जे भले असेल ते शिदोरी म्हणून बरोबर घेऊन पुढील यात्रेसाठी निघालें पाहिजे. द्वेष-मत्सरांच्या पुरचुंडया बरोबर घेण्यांत काय अर्थ?

मी यासंबंधी पुढच्या पत्रांत अधिक लिहीन. माझी काँग्रेस तरी हिंदुस्थानचा आत्मा ओळखून चालली आहे. समुद्र आपण पवित्र मानतों. कारण सारे प्रवाह तेथें असतात. नद्यांचासंगम आपण पवित्र मानतों. कारण दोन भिन्न प्रवाह एकत्र मिळाले. नदी आपण पवित्र मानतों. कारण अनेक प्रवाह जवळ घेऊन ती बनली. म्हणून आपले पूर्वज नदींत, संगमांत, समुद्रांत स्नानें करा असें म्हणत. आपण स्नानें तर करतों परंतु नदीचा, संगमाचा, समुद्राचा संदेश ध्यानांत घेत नाहीं. जास्तींत जास्त प्रवाहांस जवळ घेईल ती नदी अधिक मोठी होते, अधिक पवित्र मानली जाते. त्याप्रमाणे आपण सारे मानवी प्रवाह जवळ येऊं या. मानवी प्रवाहांचे या भारतांत ऐक्य होवो. समुद्रांत सारीं तीर्थे. त्याप्रमाणे भारतांत मानवी समुद्र उचंबळून मानवी तीर्थक्षेत्र येथें निर्माण होवो. सारें जग म्हणेल, ''तो पहा हिंदुस्थान. सारे धर्म व संस्कृति गुण्यागोविंदानें नांदत आहेत. परस्परांचे मंगल घेत आहेत.'' पूर्वजांचा हा संदेश आहे. हा भारताचा स्वधर्म. ही आपली परंपरा. हजारों वर्षाच्या इतिहासाचें हें सार व सूत्र. तें कोणी ओळखले? काँग्रेसनें नाही का?  

तुझा
श्याम

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7