Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

३१.

सोन्याच वृंदावन, त्याला मोत्यांचा गिलावा

x x x रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी मिळावा.

३२.

जडावाच मंगळसूत्र सोन्यामध्यें मढवल

x x x रावांच्या नावामध्ये एवढ का अडवल ?

३३.

झिरीमिरी पाऊस लागे मोत्यांचा धारा

x x x रावांच्या छत्रीला हिर्‍यामाणकांचा तुरा.

३४.

चांदीच तपेल आंघोळीला, चंदनाचा पाट बसायला, जरीकाठी धोतर नेसायाला, सान येवल्याच, खोड बडोद्याच, केशरीगंध लियाला, सोन्याच पात्र, तर्‍हेतर्‍हेच्या कोशिंबिर्‍या, पक्कवान्नाची ताट, रांगोळ्यावरी पाट, उदबत्त्याच्या समया मोराच्या, ताट बिंदल्याच, डबा गझनीचा, अडकित्ता धारवाडचा, चुना भोकरनचा, जायपत्री विजापूरची, चिकनी सुपारी कोकणची, पान मालगावच, उभी राहिली मळ्यात, सवासुनींच्या मेळ्यात, नवरत्‍नांचा हार सासुबाईंच्या गळ्यात, पाचशेचा तुरा मामासाहेबांच्या मंदिलात, डाव्या डोळ्याचा रोख, पायावर धोतराचा झोक, कमरी करदुर्‍याचा गोप, अत्तरदानीचा ताल, गुलाबदाणीचा भार, पलंग सातवाडचा, तक्या साटनीचा, गादी खुतनीची, वर जरीकाठी लोड, बोलण तर अस काही अमृतावानी गोड, त्या बोलण्याच मला आल हस, विसरले आईबाप, बहिण भावंडांची नाही झाली आठवण, अशी तर कल्पना किती, एका खेडयाचे मालक आहे म्हणत्याती, ह्या हौसेला पडले तरी पैसे किती ? ह्या हौसेला बारा हजार पडला पैका, x x x पाटलांचे नाव घेते सर्व मंडळी लक्ष देऊन ऐका.

३५.

आदघर-मादघर, त्यात नांद कृष्णराव बाबरांची नात, अशी काय लाडी, सदाशिव बाबरांची ध्वाडी, अशी काय घैण, विलासराव बाबरांची बहिण, अशी काय खूण, पुणदीकरांची सून, अशी काय खाची, उरुणकरांची भाची, अशी काय पाहुणी, येलूरकरांची मेहूणी, अशी काय तानी, x x x x रावांच नाव घेते अमृतावाणी.

३६.

एक होती नगरी, नगरीत होत तळ, तळ्याजवळ होता कंदील, कंदीलाजवळ होता शिपाई, शिपाईजवळ होता वाडा, वाडयात होता पाडा, पाडयाजवळ होता घोडा, तिथे होता चौक, चौकात होत देऊळ महादेवाच, तिथे होती खुंटी, खुंटीवर होत सोळ, सोळ्यावर होती चोळी x x x रावांची गंगाबाई भोळी.

३७.

एक होती नगरी, नगरीत होत तळ, तत होता खांब, त्याला होता कंदिल, शिपायान बांधला होता मंदिल, तत होता वाडा, वाडयात होता पाडा, पाडयाजवळ होता घोडा, वाडा होता चौसोपी, चौसोपीत होत देवाळ, तत होता महादेव, महादेवाम्होर होता नंदी, तत होत पुजेच, तित होत सवळ, सवळ्याजवळ होती खुंटी, खुंटीवर होती चोळी, द्त्तोपंत सांगत्यात राणीसाहेब महाराजांना संभाळून घ्या गंगा माझी भोळी.

३८.

त्रिमली गाव शहर, भवतांनी वेशी चार, मदी बांधला चिरेबंदी पार, रुपये दिले व्हते हज्जार, वर मोत्या पवळ्या बाजार, जवार आल पेट, लावा कुलुपासनी काट, जवार गेल निघून, पान पुतळ्या बघून, वजरटिकीला गोंड चार, तोळबंदी भवरा अणिदार, माग म्होर बांगडया चार, बांगडयाला टिक, इरुद्या मासुळ्याची बोर टीक, इरुद्या मासुळ्याची बोट उघडी, मागती कानाची बुगडी, कानाच्या बुगडीला झुब x x x x राव नित्य कचेरीला उभ.

३९.

चौरंगावर बसायले, तांब्याचा घंगाळ अंग ध्वायले, जरीचे धोतर नेसायले, केसरी गंध ल्येयायले, केसरी गंध परोपरी कुसुमबरीचा आहे थाट, पांची पक्क्वांनांचा घमघमाट, डबे पडले तिनसे साठ, एक डबा धानुरचा, सुपारी चांदुरची, लवंग कुर्‍हयाची, पान उमरावतीची, सुपारी धामनगावची, चुना तयगावचा, अडकित्ता नागपूरचा, ओवा आरवीचा, बाईलेला ठसा, ठसा सांगाडे मोती, चाळीसगावचा कारभार x x x x रावांचे हाती.

४०.

इकडचा किम्यावर बरम्हांची खाण, आप्पाजीले मिळाला हिंदुस्थान x x x रावांना सारखा पति मला मिळाला छान.

४१.

चांदीच घंगाळ अंघोळीला, जरीकाठी धोतर नेसायला, चंदनाचा पाट बसायला, सान (सहाण) येवल्याची, खोड बडोद्याच, केसरी गंध लेयाला, बारा मोसंब्या खायला, सोन्याच ताट जेवायला, नासिकचा गडवा पाणी प्यायला, असे जेवणाचे विलास, रांगोळ्याचा थाट, उदबत्यांचा घमघमाट, जाईपत्री जाईपुरची, लवंग सातारची, कात बडुद्याचा, चुना लोनाळचा, पानपुडा पुण्याचा, वेलदोडा मुंबईचा, खाल्ली पान, रंगली तोंड, भरगच्च गादी, रंगारंगान भरला कळस x x x रावांच्या नावावर मी करीत नाही कसलाच आळस.