Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ८

९१.

आला आला रुखवत, गाडया आल्या बारामती, माप केले सोलापुरी, द्ळण टाकल इंदापुरी, बाजार केला म्हाडात, पाणी पेली भोरात, नांदगाव तारगाव, बिवरुन गोपगाव, पाण्यातील पानगाव, धयातील धयगाव, नको मला तोंड दावू, गावाच पुडीद नावू, गावाच नाव जावळी, ऊशाला पान संबळी, ईवाय केला चांदाचा, शिरी टिकला गंधाचा, खाईना धोंडा बांधाचा, नवर्‍याचा भाव ऊठा तिरसींग राव, त्याला विनवितो सारा गाव, नवरा म्हणतो नवरी आणा, करवल्या म्हणतात आम्हा पासी काय, धरा वाजंत्र्याचे पाय, वाजंत्री म्हणतात आमचा मेळा, धरा बामनाचा गळा, विहीण रुसली परोपरी, जाऊन बसली जानवस घरी, बसाया टाकला ऊंच पाट, चोळी शिवली जरी काठ, जरीकाठी महागाचा, चुडा भिंगाचा, असा आणा घातला कोणी, आई बापांची लेक शहाणी, रुखवत उघडती x x x रावांची राणी.

९२.

आला आला रुखवत, मांडवाच्या दारी, झाडाचा पाला, नवरा नवरीचा जन्म झाला, खर का खोट बरम्याला पुसा. बरम्यान सांगीतली काचबंदी न्हाणी, आत गंगा भागीरथीच पाणी, यीन न्हाली राती, भांग भरुन मोती, हाती चंदनाची फणी, कुंकू लेती चोहूकोणी, त्याला मोती बारादाणी, व्याही गेला इंद्रसभ, काशी गांधारी बसून, रामा चंद्रास पुसून, विहीणबाई आमच्या वाडयाला या, पायघडया घ्या, वटीचा मान घ्या, हाळद कुंकू ल्या, आणि रुखवत उघडायला अस पुढ या.

९३.

आला आला रुखवत, त्यात रुपये होते सतरा, मायणीची आली जत्रा, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले सोळा, विहीणबाईचा गेला डोळा, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले पंधरा, विहीणबाईला नेली बंदरा, तिथ येक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले चौदा, विहीणबाईला न्हवता सौदा, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले तेरा, विहीणीला न्हवता पाण्याला डेरा, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले बारा आकरा, विहीणीन मागीतला शिंगारी बकरा, तिथ एक रुपया खर्च झाला. रुपये राहिले दहा, विहीणबाईच्या संग कोण आल पहा, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले नऊ, विहीणीचा आला भाऊ, तिथ एक रुपाया खर्च झाला, रुपये राहिले आठ, विहीणबाईन मागितला बसाया पाट, तिथ एक रुपया खर्च झाला. रुपये राहिले सात, विहीणबाईचे आले गोत तिथ एक रुपाया खर्च झाला रुपये राहिले सहा. विहीणीचा आला बा कव्हा, तिथ एक एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले पाच, विहीणबाईन घातला नाच, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले चार, विहीणीन मागितला घोडेस्वार, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले तीन, विहीणीन मागितला घोडयास जीन, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपये राहिले दोन, विहीणीन मागितली तांदळाची गोण, तिथ एक रुपाया खर्च झाला. रुपाया राहिला, एक विहीणबाईस झाला लेक, तिथ एक रुपाया खर्च झाला. सभा जागी झाली, सभा उठली, विहीण व्याह्याला करणी केली, तर तुम्हाला का हो ही गोष्ट नवलाची वाटली ?

९४.

आला आला रुखवत, त्यात होता गोंडा, विहीणबाईस बसाया टाका धोंडा, धोंडा पुरना चौरंग मांडा. तोंड धुण्यास घ्या हंडा, हंडा पुरना रांजण मांडा. दात घासायला घ्या वासा, वासा पुरना तुळ्या तासा. बारा पायलीचा केला रसा, विहीणबाई म्हणतात पुरेल कसा ? बारा पायलीच्या केल्या वडया, विहीणबाई म्हणल्या आहेत थोडया. बारा पायलीचा भात, विहीणीन धुतला हात. बारा पायलीच्या केल्या रोटया , विहीणबाई म्हणतात आहेत बारीक मोठया. बारा पायलांच्य केल्या पोळ्या, विहीणबाई म्हणतात आहेत शिळ्या. बारा पायलयांच केले उंडे, विहीण म्हणते आहेत माळ्यावरी धोंडे. तिथून विहीणीला व्याही भ्याला, पुण्यास गेला, पुण्याहून आणली चोळी, विहीण झाली गोरी काळी तिथून व्याही मुंबईला गेला. तिथून आणली साडी, विहीणबाई मोडीनात घडी. तिथून व्याही सातारला गेला, सातारहून आणली ठुशी, मग विहीणीच्या मनाची झाली खुशी, आणि शेस भरायला आली भावल्यापाशी.

९५.

आला आला रुखवत थोराचा, कमरी करदूडा मोराचा, पायात तोडा कुलपाचा, मंदिल झुलपाचा, अंगात खमीस झीरझीरी, पाहल्याती नगरच्या नारी, द्रिष्ट झाली लालाला, काळ लावा गालाला, येवढा रुसवा कशासाठी ? नवरदेवाच्या हौसेसाठी.

९६.

आला आला रुखवत न्हाव्याच्या आळी, उघडा दाराची फळी, दाराच्या फळीत शेराचा भात, शेराच्या भातावर वडाच पान, धरा कुरवलीचा कान, कुरवली म्हणती मी एकली, लावा वरमायला टिकली, वरमाय म्हणती मी पंचगंगा, जाऊन वर्‍हाडास सांगा, वराड म्हणत आम्ही सुखाची पाखर, धरा वाजंत्र्याची धोतर, वाजंत्री म्हणतात आम्ही काय केल, नवरानवरीच घरदार दावून दिल.

९७.

आला आला रुखवत, गुल धुंबराच, फूल हुंबराच, आठशे दुरुन, नऊशे झारी, उघडून बघती काय काय परी; हळदीच्या वाटया, पानाच्या पट्‌ट्या, गुळाचे खडे, उडदाचे वडे, पापड फरफरी, सांडगा नकसगीरी, वर भांड गमज्या करी, जिरसाळीचे तांदूळ, दोन्ही आण्याबरोबरच घेतल जांभूळ, पेढे, बर्फी जिलबी न्याहरी, देटासकाट पिकली केळ, विहीणबाईन करणी केली धन संपत्तीच्या बळ.

९८.

आला आला रुखवत, मांडवाच्या दारी, उघाडल्या निंदयापुरी, गूळ वाटला घरोघरी, हातपाय आंथरुन कांबराय लासरुन, निजली बारामतीत, पाय टाकला पुण्यात, उजाडल मुंबई ठाण्यात, मुंबई ठाण्यात बांधला वाडा, बग्गीला जुंपला घोडा, बग्गीच्या घोडयाची चाल स्थीर, केली तीन मणाची खीर, तीन मणांच्या खिरीन करणी केली ईनीन, न्हारी गेली मंमादेवीला लवाजम्यान, मंमादेवीच तिनशे हत्ती, त्या गावात स्वाती न्‌ चितळीला पाणी प्याला येती.

९९.

मुंबईत झाली मारामारी, पुण्यात आली वर्दी, इस्लामपूरचे खटले, सातार्‍यात मिटले, बंदरचा मेवा, कोकणची खारीक, लोक झाली बारीक, वाटी गावाच वाटान, कडी गावाच फुटान, डीग्रीजीच्या दातवानाची भरली कळी, आली शामगावची हाळी, शाम गावची वलांडली शीव, चला पंढरपूरला जाऊ, पंढरपूरला फार छान पाहू, दिवस उगवला नवश्यार, वजरटीला गोंड चार, ठुशीला पुतळ्या आनीवार, रात्री आणली मोहनमाळ, मोहनमाळेच लेन अवघड, पुन्हा आणली सवंगड, सवंगडचे मोती, नथ आनली राती, नथीचा फासा लवचीक, डोरल आणल आवचित, डोरल्याची झाली घडामोड, सोनाराची मोडली खोड, हडावळी जूडवी इरुद्या चार, मधी तोळबंदी तार, वर साकळ्यांचा भार, कंबरपट्ट्याला कुलप चार, माग पुढ गोठ पाटल्या, मधी भरती छंद, इलायती केकती, नव्या नवतीचा कोका न्‌ रुखवत उघडताना नाव घेताना काय काय म्हणते ते नीट लक्षात राका.

१००.

हिरे, माणिक, मोती, दोन्ही जोडून करती आरती, जुन्नरगाव पुणे धर्ती, उखलगाव बडा, सोमवारी वाजे चौघडा, वराडाला गेला आडवा, आली कोळ्याची कावड, आली मारुतीची दवड, मारुतीला शेला, वेशीत गलबला कशाचा झाला, वेस्करान रस्ता आडविला, वेस्कराला कडी, आली ब्राह्मणाची उडी, ब्राह्मण म्हणतो आटपा, लग्न राहिल दोन घटका, लग्न लावून नवरा हसला, मामा कन्यादानाला बसला, कन्यादानाची थाळावाटी, जानवस घरी मानवसपटी, व्याहीदादा विहीणबाईच्या हाती. म्हणून ओवाळा इंद्रसभेच्या तुम्ही मंगलमूर्ति.