Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

११.

आला आला रुखवत त्यात होता बत्ता

आणि आमच्या मुलीवर नाही राहीली आमचीच सत्ता.

१२.

आला आला रुखवत त्यात होत खाण्याच

नवरी नवर्‍याला म्हणते वेगळ कधी रहायच ?

१३.

आला आला रुखवत त्यात होते गहूं

नवरा नवरीला म्हणतो उद्या सवतं राहू.

१४.

आला आला रुखवत झाकत माकत

अर्ध्या पोळीसाठी का बसलात तुम्ही ठोकत ?

१५.

आला आला रुखवत त्यात चोळीचा खण

विहीणबाई घालतात त्यावर फुकट मन

१६.

आला आला रुखवत त्यात होती कट्यार

नवरा मागतो पंधरा हजाराची जमीन काळीशार.

१७.

आला आला रुखवत त्यात होत गोण

आम्ही जमीन दिली तरी कसणार हा कोण?

१८.

आला आला रुखवत त्यात होता आणा

आमचा मुलगा शेतकी करण्यात आहे शहाणा.

१९.

आला आला रुखवत त्यात होती किटली

जावई शहाणा म्हणण्यात हौस नाही का फिटली ?

२०.

आला आला रुखवत त्यात होता पेढा

विहीणबाई चला आता जेवायला वाढा.

२१.

आला आला रुखवत त्यात होती पुरी

विहीणीच्या नाकापेक्षा नथीचंच वजन भारी.

२२.

आला आला रुखवत त्यावर होत जांभाळ

आमच्या नवरीला नीट संभाळ नाहीतर आमचा भैरोबा हाय लई वंगाळ.

२३.

विहीणीच्या बहिणी , नका बोलू ऊणं, आडव लागल पुणं, पुण्याची पायरीनऊ लाखाची धायरी, धायरीची वडी, आडवी लागली किरकटवाडी, किरकटवाडीत फसल, आडव आल खडकवासल, खडकवासल्याच पाणी नदीनाल्यांतून खेळवल, व्याह्यानी विहीणीला उगीचच भुलीवल.

२४.

पाणी आणा गंगेच, मखर बांधा भिंगाच, साती खिडक्या रंगमहाल, फुल लावली हारोहार, विहीण आल्या डोंगराच्या, पट्ट्या पाडा भांगाच्या, भांगी भरला गुलाल, नेत्री घातल काजळ, कुंकू लावल टिळटिळ, विहीणव्याही पलंगावर लोळ, मध्ये तांन बाळ खेळ, तान्ह्या बाळाच्या हातात नाजूक शेला, गरम झाल्या वारा घाला, नऊ महिन्याचे नवशे, कात बोळ्याच तिनशे, दुध प्यायला दोन म्हशी दोन म्हशीवर दोन हेलग, नऊ मण हुलगं, दहा मण गहूं, त्याचे प्रकार केले बहू, व्याह्याला विहीणीला घाला पोटभर जेऊ आणि आनंदान उद्या वर्‍हाड लावून देऊ.

२५.

विहीणीच्या बहिणी नका बोलू उणं, आडव लागल पुंणं, पुण्याची वारी मधी आली धायरी, धायरीच वांग काही पोसना, भाऊराया पुसना, भावाला नाही माया, जातो तळेगावा, तळेगावचा कांदा, दोन्ही टाकळी बांधा, दोन्ही टाकळीमधी भेंड्याच्य़ा भिंती, कवठाला जाती, कवठ्याचा बाजार, थैमान शेजार, व्याही पडला तुरुंगात, रुपये गेले तिनशे साठ, धरा थेऊर कौलवची वाट, थेऊर कौलवाच्या जमल्या आयाबाया, चला बोलाई पहाया, बोलाईच आडनाव भारी, डोंगरी पेरले शेजारी.

डोंगरी पेरणीतून घसरली, लोणीमधी जावून पसरली, थोरली डुक्कर, धाकली ओंढुळकर, थोरलीच्या घरी तळमळ, घेऊन आपटी करमळ, करडं लिंबू भरले दारी, विहीण व्याह्याची गाठ पडली घोड बाजारी, विहीण पडती व्याह्याच्या गळी, अंदण मागती पानमळा आणिक नदीकाठची मळी.

२६.

रुखवत आला रुखवत आला, रुखवतावर अंड, नवरदेवाच्या करवलीला मुलगा झाला कवडभांड, तो सार्‍या मांडवात हिंड.

२७.

रुखवत आला, रुखवत आला डोंगरानी, विहीण डोक खाजवी लोखंडी नागरांनी, रुखवत आला रुखवत आला, रुखवतावर चंची, भाडयानं डाग घालणारी विहीण कंची, रुखवत आला रुखवत आला रुखवतावर जांभूळ, उघडुनी पाहती तर लक्ष्मण रामाच देऊळ, मांडवाच्या दारी वेल गेला जाईचा, वाकडा तिकडा आणा घालू नका आम्ही मर्जीतली माणसं म्हणून विचार करा त्याचा.

२८.

रुखवत आला रुखवतावर कटयार, नवरदेवाला द्यायची होती मोटार पण आडव आलं गटार.

२९.

माडीचा जानवसा कोण मागती हौशी, ती आहे नवर्‍या बाळाची मावशी.

३०.

मांडवाच्या दारी हळदीबाईचा पाट गेला, नवर्‍या बाळाचा बाप न्हाला.