Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 101

२२. प्रेमळ स्मृती

मित्रांनो ! गतजीवनाच्या समुद्रात मी बुडया मारु लागतो म्हणजे कितीतरी गोड स्मृतींची सुरम्य मोन्ये माझ्या हाताला लागत. जीवनात गोड स्मृती किती आहेत यावरुन जीवनाची किंमत ठरवावी लागते. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाच्या घडयात डोकावून पहावे व आपल्या जीवनाचे मोल ठरवावे. हा सोन्यासारखा मोलवान मानवी जन्म मिळाला. या जन्माला येऊन प्रेमस्नेहाच्या स्मृती जोडणे याहून धन्यतर अन्य काय आहे ?

सोनियाचा कलश  ।  माजि भरला सुरास  ।
काय करावा प्रमाण ।


असा तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे. सोन्याच्या कलशात दारु भरणा-या माणसाचे कोण कौतुक करील ! परंतु आपण प्रत्यही हेच निंद्य कर्म करीत आहोत, याची मानवास आठवण नसते. द्वेष, मत्सर, द्रोह, स्पर्धा, स्वार्थ यांचीच घाण या जीवनाच्या कलशात आपण प्रयत्नपूर्वक भरुन ठेवीत आहोत आणि त्यातच पुरषार्थ मानीत आहोत.

जीवनातील लहान लहानच प्रसंग असतात; परंतु त्या प्रसंगात अपार गोडी भरलेली असते. माझे म्हणजे महान् व्यक्तीचे जीवन नव्हे. एक क्षुद्र मानव प्राणी मी आहे; तरीही माझ्या जीवनात कितीतरी मधुरता मला दिसते. ही मधुरता माझ्या लहानमोठया मित्रांनी माझ्या जीवनात ओतली आहे. माझ्या ओसाड जीवनावर प्रेमसिंचन करुन त्याला सुंदर बनविण्याचे महान् कर्म ज्या माझ्या अनेक मित्रांनी केले त्यांचा मी किती उतराई होऊ ? कसा उतराई होऊ ? त्यांचे स्मरण-तर्पण करणे हाच अनृणी होण्याचा एकमात्र मार्ग मला मोकळा आहे.

दापोलीस मी आत्याकडे रहात होतो. लागून लागून आत्याची दोन घरे होती. एका घरातील अर्धा भाग भाडयाने दिलेला होता. त्या जागेत दिगंबर नावाचा बेलिफ रहात असे. दिगंबर व त्याची आई दोनच माणसांचे ते कुटुंब होते. दिगंबराचे लग्न झालेले नव्हते. दिगंबर तोतरे बोलत असे. तो आनंदी स्वभावाचा होता. त्याचे आईवर फार प्रेम असे. कोर्टातून घरी आला की, दिगंबर आईच्या मांडीवर डोके ठेवून निजावयाचा. ती माउली त्याचे कपाळ थोपटी. 'माझ्या दिगंबराला नेहमी गावोगाव भटकावे लागते, त्याचे पाय किती दुखत असतील,' असे म्हणून दिगंबराची आई त्याचे पायसुध्दा चेपी.

एखादे वेळेस दिगंबर आईला धरुन गदागदा हालवायचा. 'माझी आई, माझी आई,' असे म्हणून तिच्याभोवती नाचावयाचा. दिगंबराच्या आईने काही घरात गोड केले तर दिगंबर आधी आईच्या तोंडात त्याचा घास द्यावयाचा. 'तू सारे माझे पानात वाढतेस. स्वत:ला काही ठेवत नाहीस. तू स्वत:चे का हाल करतेस ? स्वत: काही न खाता या दिगंबराला फक्त खायला दिलेत तर त्याने दिगंबराचे पोट भरेल; परंतु दिगंबराचे हृदय भरेल का ? पोटाची पिशवी भरणे एवढे- का माणसाचे काम ? तुझ्या दिगंबराला का मन नाही, हृदय नाही. भावना नाही ? घे आधी, तू खा. एक घास आधी तू खा. देवाला आधी नैवेद्या दाखवितात तसा मी तुला आधी नैवेद्य दाखवितो. ये, तू माझा देव; तू सर्व काही.' दिगंबराची आई हसून म्हणावयाची, 'देवाचा नैवेद्य पुजारीच खातो; देव थोडाच खातो ?' दिगंबर म्हणे, 'नामदेवाच्या देवाने नाही का खाल्ला ? ज्याचा देव केवळ दगडाचा नसतो, ज्याचा देव चैतन्यमय आहे, त्याचा देव नैवेद्य भक्षण करतो. तू का दगडाला ना हसू ना आसू. कोमेजणे व फुलणे या गोष्टी फुलालाच ठाव्या त्या का दगडाला माहीत असतात ? त्याप्रमाणे हसणे, रडणे, ज्याला हृदय आहे, ज्याचे हृदय दगडासारखे नाही, त्यालाच अनुभवता येतात, तुला हे अनुभव आहेत. हा घास घे.'

कधी आई दिगंबराला म्हणावयाची, 'तुझे लग्न झाले म्हणजे मला बरे वाटेल.' ते ऐकून दिगंबर म्हणे 'तुला माझा कंटाळा आला वाटते ? माझा कंटाळा आला असेल तर मी चालता होतो. जाऊ ? पुन्हा नको तुझ्याजवळ येऊ ? आई, तू एक आहेस तेवढी पुरे. आपल्या प्रेमात नको कोणी वाटेकरी.'

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148