Get it on Google Play
Download on the App Store

महात्मा गांधींचें दर्शन 13

आधी पोटोबा मग विठोबा असे आपण म्हणतो, त्यांत हाच अर्थ आहे. महात्मा गांधीहि ही गोष्ट मानतात. परंतु जरा निराळया दृष्टीने ते त्या गोष्टीकडे पाहातात. नैतिक उन्नतीसाठी आर्थिक सुस्थिती हवी ही गोष्ट खरी आहे. परंतु या गोष्टीलाहि काही मर्यादा आहे. आर्थिक सुस्थितीने नैतिक उन्नति होते हे सर्वांशी खरे नसून काही अंशी खरे आहे. मनुष्याची भूक भागल्यावरच त्याची जीवनधारणा होईल, तेव्हाच नैतिक उन्नतीची शक्यता असते. परंतु तुम्ही जर असे म्हणाल की, इतके सुखोपभोग मिळाले की दुस-या बाजूस इतकी नैतिक उन्नति होतेच तर ते खरे नाही. त्याला काही मर्यादा आहे. या मर्यादेत आर्थिक सुधारणा झाली तर ती नीतीस पोषक असते. तेथे सम प्रमाण असते. परंतु सुखोपभोग फारच वाढले, धनदौलत फारच वाढली तर नीति सुधारण्याऐवजी, उलट मनुष्य नीतिभ्रष्ट होतो. मग व्यस्त प्रमाण होते. सुखोपभोग फार वाढला तर नीति कमी होत जाईल. म्हणून महात्माजी सांगतात की, उगीच वायफळ गरजा वाढवण्यांत अर्थ नाही. जास्त पैसा जवळ झाला तर नैतिक अधःपात होतो. हे जे सत्य त्यांच्याकडे समाजवाद्यांनी लक्ष दिले नाही. महात्माजी दोन्ही डोळयांनी पाहतात. आवश्यक गरजा भागल्या पाहिजेत, हेहि खरे; तसेच फाजील गरजा वाढवू नका हेहि खरे. लोकशाहीत ज्याप्रमाणे ते नैतिक प्राण आणू पाहतात, लोकसत्ता नैतिक पायावर ते उभी करूं पाहतात, त्याचप्रमाणे अर्थकारणांतहि नीति असली पाहिजे, तेथेहि नीतीची वाढ झाली पाहिजे असे ते म्हणतात. आणि ही नीतीची वाढ व्हावी म्हणून जीवनोपयोगी आवश्यक गरजा भागवा, परंतु फालतु गरजा वाढवू नका असे ते म्हणतात. देहाचे फाजील चोचले पुरवूं तर आत्मा गुदमरेल. नीतीची धार बोथट होईल. सद्सद्विवेकबुध्दीची मंजुळ मुरली ऐकू येणार नाही. एकदा याविषयी 'आर्थिक व नैतिक सुधारणा' या शीर्षकाखाली महात्माजींनी एक मजेदार लेख लिहिला होता. त्या लेखांत ते म्हणतात, ''अत्यन्त दरिद्री मनुष्य ज्याप्रमाणे आपली नीति टिकवू शकत नाही हे खरे, त्याचप्रमाणे अति श्रीमंत मनुष्यहि नीति टिकवू शकत नाही. हेहि खरे. ख्रिस्ताने म्हटले आहे की, एकवेळ सुईच्या नेढयांतून उंट पलीकडे जाईल, परंतु स्वर्गाच्या राज्यांत श्रीमंत मनुष्य जाणे कठीण.'' अतिसंग्रही मनुष्यास परमेश्वराच्या राज्यांत प्रवेश नाही. ख्रिस्ताकडे एकदा एक श्रीमंत मनुष्य आला. तो ख्रिस्ताला म्हणाला, ''भगवन्, मी तुमच्या सर्व आज्ञा पाळीत असतो.' तेव्हा ख्रिस्ताने विचारले, 'जवळ काही पुंजी आहे का? संग्रह केलेला आहे का?' तो म्हणाला, 'हो, संग्रह बराच आहे.' ख्रिस्त म्हणाला, 'तर मग तो संग्रह देऊन टाक.' तो श्रीमंत मनुष्य पुन्हा ख्रिस्ताकडे कधी गेला नाही. याच प्रसंगी ते सुप्रसिध्द वाक्य खिस्त उद्गारला : ''सुईच्या नेढयांतून उंट जाईल, परंतु स्वर्गाच्या राज्यांत श्रीमंत जाऊं शकणार नाही.''

महात्माजींची ही अशी दृष्टि आहे. आर्थिक उन्नति नाही तोपर्यंत नैतिक उन्नति होऊ शकत नाही. या सिध्दांतालाहि काही मर्यादा आहेत. गरजा कमी असलेल्या ब-या असे नैतिक दृष्टीचा मनुष्य म्हणतो. परंतु विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या सर्व गरजा मात्र भागल्याच पाहिजेत. असे हे महात्माजींचे स्वराज्य आहे. नैतिक कायद्याचे जेथे साम्राज्य आहे, असे हे स्वराज्य आहे. जीवनाच्या प्राथमिक गरजा जेथे भागवल्या जातात असे हे स्वराज्य आहे. हे स्वराज्य अहिंसेने आणावयाचे आहे. नैतिक शक्तीवर जे स्वराज्य आधारावयाचे आहे ते अहिंसेशिवाय कसे शक्य होईल?

इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, फ्रान्समध्ये जी लोकशाही आहे ती खरी नाही. लोकशाहीचा डोलारा तेथे आहे. लोकशाहीची कुडी तेथे आहे; परंतु तीत प्राण नाही. बाह्य स्वरूप लोकशाहीचे परंतु आतील गाभा भांडवलशाहीचा आहे. अशी ही तकलादू लोकशाहीसुध्दा सशस्त्र क्रान्तीने आणू म्हणू तरी ती टिकत नाही असा इतिहास आहे. ज्या लोकशाहीसाठी सशस्त्र क्रांन्त्या झाल्या, ती लोकशाही तर नाहीच आली; बाह्य स्वरूपी लोकशाहीहि नाही आली, तर उलट हुकूमशाही सत्ताच तेथे स्थापन झाल्या. इंग्लंडमध्ये चार्लसला ठार मारल्यावर क्रॉमवेलची हुकूमशाही आली. फ्रान्समध्ये क्रांन्ति झाली आणि नेपोलियनची हुकूमशाही मानगुटीस बसली. रशियांत स्टॅलिनची हुकूमशाही आली. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये जेव्हा ती प्रसिध्द लोकशाही क्रांति झाली, त्या वेळेस सर्वांना वाटत होते की, आता जगांत सुवर्णयुग येणार, जगाचा उध्दार होणार. रूसानेच प्रथम ''जनतेची खरी सत्ता'' हे शब्द उच्चारले.

महात्मा गांधींचें दर्शन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
महात्मा गांधींचें दर्शन 1 महात्मा गांधींचें दर्शन 2 महात्मा गांधींचें दर्शन 3 महात्मा गांधींचें दर्शन 4 महात्मा गांधींचें दर्शन 5 महात्मा गांधींचें दर्शन 6 महात्मा गांधींचें दर्शन 7 महात्मा गांधींचें दर्शन 8 महात्मा गांधींचें दर्शन 9 महात्मा गांधींचें दर्शन 10 महात्मा गांधींचें दर्शन 11 महात्मा गांधींचें दर्शन 12 महात्मा गांधींचें दर्शन 13 महात्मा गांधींचें दर्शन 14 महात्मा गांधींचें दर्शन 15 महात्मा गांधींचें दर्शन 16 महात्मा गांधींचें दर्शन 17 महात्मा गांधींचें दर्शन 18 महात्मा गांधींचें दर्शन 19 महात्मा गांधींचें दर्शन 20 महात्मा गांधींचें दर्शन 21 महात्मा गांधींचें दर्शन 22 महात्मा गांधींचें दर्शन 23 महात्मा गांधींचें दर्शन 24 महात्मा गांधींचें दर्शन 25 महात्मा गांधींचें दर्शन 26 महात्मा गांधींचें दर्शन 27 महात्मा गांधींचें दर्शन 28 महात्मा गांधींचें दर्शन 29 महात्मा गांधींचें दर्शन 30 महात्मा गांधींचें दर्शन 31 महात्मा गांधींचें दर्शन 32 महात्मा गांधींचें दर्शन 33 महात्मा गांधींचें दर्शन 34 महात्मा गांधींचें दर्शन 35 महात्मा गांधींचें दर्शन 36 महात्मा गांधींचें दर्शन 37 महात्मा गांधींचें दर्शन 38 महात्मा गांधींचें दर्शन 39 महात्मा गांधींचें दर्शन 40 महात्मा गांधींचें दर्शन 41 महात्मा गांधींचें दर्शन 42 महात्मा गांधींचें दर्शन 43 महात्मा गांधींचें दर्शन 44 महात्मा गांधींचें दर्शन 45 महात्मा गांधींचें दर्शन 46 महात्मा गांधींचें दर्शन 47 महात्मा गांधींचें दर्शन 48 महात्मा गांधींचें दर्शन 49 महात्मा गांधींचें दर्शन 50 महात्मा गांधींचें दर्शन 51 महात्मा गांधींचें दर्शन 52 महात्मा गांधींचें दर्शन 53 महात्मा गांधींचें दर्शन 54 महात्मा गांधींचें दर्शन 55 महात्मा गांधींचें दर्शन 56 महात्मा गांधींचें दर्शन 57 महात्मा गांधींचें दर्शन 58