Get it on Google Play
Download on the App Store

सोने परत आले 4

ते मूल जागे झाले. मा मा मा मा करू लागले. आईचे हात पाहू लागले. त्या हातांनी स्वत:ला पुन्हा घट्ट धरून ठेवावे असे त्या मुलाला वाटत होते. परंतु ते हात दूर झाले होते. कायमचे दूर झाले होते. इतक्यात त्या मुलाचे लक्ष समोरच्या झोपडीतून आलेल्या प्रकाशाकडे गेले. ते मूल रांगू लागले. प्रकाशाकडे येऊ लागले. झोपडीचे दार लावलेले नव्हते. त्या दारांतून ते मूल आत आले. ते चुलीजवळ आले. गारठलेल्या त्या मुलाला ऊब मिळाली. मनूबाबा आपल्याच तंद्रीत होता. इतक्यात त्याचे लक्ष त्या मुलाकडे गेले. सोन्यासारखे मूल. तो पाहू लागला. सोने आले असे त्याला वाटले. बोलणारे सोने, जिवंत सोने त्याला मिळाले! तो त्या लहान मुलाला घेऊन नाचवू लागला. त्याने त्या लेकराला घट्ट धरून ठेवले. जणू पुन्हा कोणी घेऊन जाईल. ते मूल त्याच्याशी खेळू लागले. ते त्या मुलाच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवीत होता. ती मुलगी होती. सुंदर मुलगी. डोळे कसे टपोरे काळेभोर होते. डोक्यावर दाट काळेभोर केस होते. अंग कसे गोरे गोरे पान होते. मातीतून, खड्यातून ती मुलगी रांगत आली होती. मनूबाबाने तिचे पाय चेपले. “कुठून आलं माझं सोनं, सुंदर सोनं!” असं म्हणून त्या मुलीचे मुके घेऊ लागला. केव्हा एकदा उजाडते असे त्याला झाले. साळूबाईला ही आनंदाची वार्ता केव्हा सांगू असे त्याला झाले. शेवटी ती मुलगी मनूबाबाच्या प्रेमळ हातांत झोपी गेली. मनूबाबांनाही झोप लागली.

बाहेर पाखरे किलबिल करीत होती. ती लहान मुलगी उठली मा मा मा मा करू लागली. ती दाराकडे निघाली. कोठे जाते ही मुलगी. तिची आई आहे की काय बाहेर? मनूबाबा बाहेर येऊन पाहू लागला. तो त्याला दूर काही तरी दिसले. ती चिमणी मुलगी घेऊन तो तेथे गेला, तो तेथे एक अनाथ स्त्री मरून पडलेली दिसली. ती मुलगी खाली उतरू लागली. मनूबाबाने तिला खाली ठेवली. ती लहानगी आईजवळ गेली. आईचे हात ती ओढू लागली. परंतु आज आईचे हात तिला प्रेमाने ओढून जवळ घेत नव्हते. ती दूध पिण्याची खटपट करू लागली. ती आईचे डोळे उघडू लागली. ‘मा मा मा मा !’ बोबड्या शब्दांनी ती मुलगी आईला जागवू पाहात होती. ती आईला हाका मारीत होती. आई ना उठे, ना बोले, ना बसे, ना हसे. ती लहान मुलगी रडू लागली. आपल्या रडण्याने तरी आई उठेल असे तिला वाटले. परंतु आज आई कशानेही उठेना. का झाली कठोर आई?

मनूबाबाचे हृदय कळवळले. त्याने मुलीला उचलून घेतले. तिनं त्याच्या गळ्याला मिठी मारली. मनूबाबा तेथून निघाला. तो एकदम दिगंबररायांकडे आला. दिगंबररायांकडची मंडळी आता कोठे उठत होती. कोणाची तोंडधुणी होत होती. तोच अंगणात मनूबाबा त्या लहान मुलीला घेऊन उभा राहिला. सर्वांना आश्चर्य वाटले.

“हे काय, मुलगी कोठून आणलीत? असं उजाडताच कोठे आलेत? अशी काय तुमची चर्या? काय आहे हकीगत?” त्यांना विचारण्यात आले.

मनूबाबा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
जन्मभूमीचा त्याग 1 जन्मभूमीचा त्याग 2 जन्मभूमीचा त्याग 3 एकाकी मनू 1 एकाकी मनू 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 1 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 4 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 7 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9 सोने परत आले 1 सोने परत आले 2 सोने परत आले 3 सोने परत आले 4 सोने परत आले 5 सोने परत आले 6 संपतरायाचे लग्न 1 संपतरायाचे लग्न 2 संपतरायाचे लग्न 3 सोनी 1 सोनी 2 सोनी 3 सोनी 4 सोनी 5 सोनी 6 सोनी 7 सोनी 8 सोनी 9 सोनी 10 सत्य लपत नाही 1 सत्य लपत नाही 2 सत्य लपत नाही 3 सत्य लपत नाही 4 सोनीचा नकार 1 सोनीचा नकार 2 सोनीचा नकार 3 सोनीचा नकार 4 सोनीचा नकार 5 सोनीचा नकार 6 सोनीचे लग्न 1 सोनीचे लग्न 2 सोनीचे लग्न 3 सोनीचे लग्न 4 सोनीचे लग्न 5 सोनीचे लग्न 6 सोनीचे लग्न 7 सोनीचे लग्न 8 सोनीचे लग्न 9 सोनीचे लग्न 10 सोनीचे लग्न 11 जन्मभूमीचे दर्शन 1 जन्मभूमीचे दर्शन 2 जन्मभूमीचे दर्शन 3