Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 21

'तू वाचायची सवय ठेव. तुला वर्तमानपत्र आणून देत जाईन. तुला लवकर येईल. मला जड जाते.'

'शेतक-याला कुठे आहे वेळ वाचायला नि लिहायला?'

'परंतु असे म्हणून चालणार नाही. येतो आता. गोप्या, तू विचार कर. ताराला पाठव. काही हरकत नाही.'

हरबा गेला. गोप्या दोन प्रहरी घरी आला. तारा गवत कापायला गेली होती. ती आता सांजवल्याशिवाय थोडीच घरी येणार होती?

गोप्या घरी विचार करीत बसला. ताराचा विचार करीत होता. दिनू - विनू जवळच होते.

'पोरांनो, तुम्ही खाल्लीत का भाकर?'

'हो, कधीच खाल्ली भाकर.'

'तुमची ताई कोठे गेली गावाला, तर चालेल का?'

'कुठे जाणार ताई? तिच्याबरोबर आम्हीही जाऊ.'

'तुम्ही लहान आहात. तुम्ही मोठे व्हा. मग तुम्ही जा.'

'ताई गेल्यावर भाकर कोण भाजील?'

'मी भाजीन.'

'तुम्ही कोठे गेलेत म्हणजे?'

'मग तुम्ही भाजा. काटक्या-कुटक्या चुलीत घालाव्या. विस्तव करावा. तवा चुलीवर टाकावा. करावी भाकर.'

'पण तांबूचे दूध कोण काढील?'

'दिनू काढील. परवा बकरीला धरून नव्हता का दूध काढीत?'

'बकरी लहान असते, बाबा!'

'आपली तांबू गरीब आहे. तुम्हीसुध्दा तिचे दूध काढाल.'

'आम्ही जातो बाबा, नदीत डुंबायला. मासे धरायला.'

'मासे पकडता येतात का?'

'आम्ही असा आकडा टाकतो! मजा. चल दिनू!'

पोरे उडया मारीत गेली. गोप्या घटकाभर झोपून पुन्हा शेतावर गेला.

रात्री ताराजवळ बोलणे काढले.

'जाईन, बाबा. तुम्हालाही मदत होईल आणि दिनू शाळेत जाऊ दे. मीही तिकडे शिकता आले तर शिकेन. काम करीन. सर्वांची आवडती होईन.'

'तू अजून लहान आहेस.'

'गवत कापायला जाते. आता का लहान?'

'मी मधून मधून येऊन तुला भेटत जाईन. आपल्या गावची माणसे शिवापूरला जातात येतात. त्यांच्याबरोबर खुशाली कळवीत जा.'

'केव्हा जायचे बाबा?'

'परवाच्या दिवशी निघू. गुरूवार आहे. तुझ्या आईचे नि माझे लग्न गुरूवारी लागले होते.'

'आईचे हाल झाले, बाबा. नाही का?'

'तुम्हा मुलांचे तसे न होवोत.'

आणि गुरूवारी तारा जायला निघाली. तांबूच्या दुधाबरोबर भाकर खाऊन ती निघाली. सकाळी सर्वांनीच बरोबर भाकर खाल्ली.

दिनू, विनू, गोप्या, तारा सर्वांनीच एकत्र जेवण केले. गाडी तयार होती.