Get it on Google Play
Download on the App Store

शबरी 10

ऋषींच्या उपदेशाच्या गोष्टी ऐकतांना तिच्या मनांत विचार येई की, 'असे अमोल बोल आता किती दिवस ऐकावयास मिळणार ? ही पवित्र गंगोत्री लौकरच बंद होणार का ? ऋषींचे शब्द सतत ऐकत बसावें.' असेंच तिला वाटे.

एक दिवस मतंग ऋषि तिला म्हणाले, 'शबरी, मरण हें कोणाला टळलें आहे ? केलेली वस्तु मोडते, गुंफलेला हार कोमेजतो. जें जन्मलें तें जाणार, उगवलें तें सुकणार. सृष्टीचा हा नियम आहे. शबरी, एक दिवस तुला, मला, हा मृण्मय देह सोडून जावें लागणार. फूल कोमेजलें, तरी त्याचा रंग, त्याचा सुगंध आपल्या लक्ष्यांत राहतो. त्याप्रमाणे माणूस गेलें, तरी त्याचा चांगुलपणा विसरला जात नाहीं.'

मतंग ऋषि असें बोलूं लागले की, शबरीला वाटे ही निरवानिरवीची भाषा गुरूदेव का बोलत आहेत ? हें शेवटचें का सांगणें आहे ?
आज मतंग ऋषि स्नानसंध्या करीत होते. एकाएकी त्यांना भोवळ आली. शबरी तीराप्रमाणे तेथे धावत आली आणि पल्लवांनी वारा घालूं लागली. ऋषिपत्नीहि आली व तिने पतीचें मस्तक मांडीवर घेतलें. ऋषींनी डोळे उघडले. ते म्हणाले, 'आता हा देह रहात नाही. तुळशीपत्र आणा, पंपासरोवराचें पाणी पाजून मला दोन थेंब द्या. शबरी, जीवन अनंत आहे. मरण म्हणजे आनंद आहे.'

शबरीने पाणी देऊन तुळशीपत्र तोंडावर ठेविलें. ओम ओम म्हणत मतंग ऋषि परब्रह्मांत विलीन झाले ! ऋषींचें प्राणोत्क्रमण होतांच जिच्या मांडीवर त्यांचें मस्तक होतें, ती त्यांची प्रेमळ पत्नीहि एकाएकी प्राण सोडती झाली व तीहि तेथे निश्चेष्ट पडली !
पतिपत्नी ऐहिक जीवन सोडून चिरंतन जीवनांत समरस झाली; परंतु शबरी-बिचारी शबरी-पोरकी झाली ! तिला आता कोण पुसणार ? तिला ज्ञान कोण देणार ? रोज नवीन विचारांची नूतन सृष्टि तिला कोण दाखविणार ? 'शबरी, आज तूं कांहीच खाल्लें नाहीस, हीं दोन फळें तरी खाच,' असें तिला प्रेमाग्रहाने आता कोण म्हणणार ? शबरीचा आधार तुटला ! मूळ तुटलेल्या वेलीप्रमाणे तीहि पडली; परंतु सावध झाली. तिने चिता रचिली आणि गुरूचा व गुरूपत्नीचा देह तिने अग्निस्वाधीन केला !

मृत्युदेव आला व शबरीचीं ज्ञान देणारीं मातापितरें तो घेऊन गेला. मृत्यु ही प्राणिमात्राची आई आहे. मृत्यु हा कठोर वाटला, तरी कठोर नाही. मृत्यु नसता तर या जगांत प्रेम व स्नेह हीं दिसतीं ना ! मृत्यूमुळे जगाला रमणीयता आहे. हे मृत्यो, तुला कठोर म्हणतात, ते वेडे आहेत. तूं जगाची जननी आहेस. सायंकाळ झाली, म्हणजे अंगणांत खेळणारीं मुलेंबाळे दमलीं असतील, त्यांना आता निजवावें, म्हणजे पुन: तीं सकाळीं ताजींतवानीं होऊन उठतील, या विचाराने आई त्यांना हळून मागून जाऊन घरांत घेऊन येते; त्याप्रमाणे या जगदंगणांत मुलें खेळून दमलीं, असें पाहून आयुष्याच्या सायंकाळीं, ही मृत्युमाता हळूच मागून येते व आपल्या बाळांना निजविते आणि पुन: नवीन जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी पाठवून देते. अमर-जीवनाच्या सागरांत नेऊन सोडणारी मृत्युगंगा पवित्र आहे.