Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश सतरावा 2

गोपाळराव -  अपूर्व त्यागानं आपण कालच देवकोटीत जाऊन अनुकरणर्ह झाला आहांत ! तेव्हां रूढीचीं बंधनेहि तोडण्यास आपणच समर्थ आहांत !

रामराव -  असा धडाडीचा त्यागी पुढारी मिळाल्यावर आम्ही त्याचे अनुयायीं आहोंतच !

खंडेराव -  योग्य मार्ग दाखविणा-या पुढा-याचीच आपल्या समाजांत वाण आहे.

माधवराव -  अस्पृश्य हे आपले बंधू आहेत, ही माझी कल्पना होतीच; पण तसं वागण्याचं धैर्य नव्हतं ! आज आनंद झाला ! तुटणारा हिंदुसमाज आपणाशी संलग्न झाला !

पांडू -  आम्ही याबद्दल आपले ऋणी आहोंत !

राघू -  आपण आम्हांला जवळ केलंत ! आपण थोर राष्ट्रकार्य करीत आहांतच; त्यांत मी पित्यासह राष्ट्राकरतां प्राण देणारा सैनिक आहे, हें निश्चित समजा !

नारायण -  अंत्यजाला जवळ केल्याबरोबर त्याची दृष्टि विशाल कार्याकडे वळली. ऐका मंडळी ! राघू, तुझ्या महत्वाकांक्षेबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांना जवळ करून एक मोठें सैन्य आपण राष्ट्रकार्यांत समाविष्ठ केलें आहे.

लक्ष्मीधरपंत -  बाळा, हा तुझ्याच पुण्याईचा प्रभाव !

नारायण -  अशा पित्याच्या पोटीं जन्मोजन्मी पुत्र म्हणून राहण्यांतच खरोखरी जन्माचं सार्थ आहे.

लक्ष्मीधरपंत
-  आनंदी, आनंद झाला. परमेश्वर अशीच सर्वास सदबुध्दि देवो ! भेदभाव हरपोत ! सर्वांना राष्ट्रकार्याची गोडी लागो ! या प्रसंगी आपण सर्वजण सर्व प्रकारची मंगलें वर्षणा-या मंगलमूर्तीची आपल्या सदिच्छा सिध्दीस नेण्याकरितां प्रार्थना करूं !
(सर्व उभें राहून गाणें म्हणतात.)

(मालकंस; त्रिताल.)
मंगलमूर्ती मंगलवितरो । दु:ख विपत्ती दैन्यासहरो ॥ मं ॥
अतुला प्रीती, निर्मल दयाधर्म सुनीती ह्रदयांत भरो ॥
लोक नांदो एकमतानें । आनंदाने संसार करो ।

(पडदा.)