Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश नववा 1

प्रवेश नववा
बालवीर शिक्षक -  प्रौढ वीरांना आतां मोठी जागा पाहिजे. त्यांनीं आपल्या कामाचा व्याप बराच वाढविला असून चरखे, सूत यांवर हल्लीं त्यांचं फार लक्ष आहे.दहा महारांचीं मुलंहि येतात. नारायणाच्या व र्तनाचा हा परिणार ! तो रोज किती तरी कष्ट करतो ! त्यामुळेचं त्याला मेल चढत आहे. ज्या नारायणाला पंतांनीं घालवलं, त्याच पंतांकडे एखादी हवेली मागावयास जाणं मला ओशाळवाणं वाटतं ! आणि गांवांत त्यांच्याइतकी संपन्नता कुणालाच नाहीं ! परंतु कार्यकर्त्यानं असं लाजून चालायचं नाहीं. किल्ल्याचा जुना गंजलेला दरवाजा तसा ठोकून ठोकून उघडावा लागतो, त्याप्रमाणं जुन्या रूढींनीं गंजून गेलेल्या लक्ष्मीधरपंतांच्या ह्रदयावर मला पुन:पुन्हां आघात केलेच पाहिजेत. अगदीं उघट कांहीं अस्पृश्यांच्यासाठीं जागा मागावयाची नाहीं. पाहावा प्रयत्न करून ! हो, पण लक्ष्मीधरपंतच इकडे येत आहेत. फिरावयास आलेली दिसते आहे स्वारी  ! निवांतपणाही छान आहे. करतों धाडस ! (लक्ष्मीधरपंत येतात.)

लक्ष्मीधरपंत -  (स्वगत) जिकडे तिकडे हा भ्रष्टाचार माजत चालला. एक नारायण दिवटा निघाला, तर दहा त्याच्यासरखं करूं लागले ! मीच चुकतों आहें कीं जग चुकतं आहे ? (बालवीरशिक्षक पुढें येतात.)

बा. शि. -  नमस्कार !

लक्ष्मीधरपंत -  जय देवा !

बा. शि. -  आपणांस एक विनंति करावयाची आहे.

लक्ष्मीधरपंत -  बोला !

बा. शि. -  आमच्या कार्याचा व्याप हल्लीं बराच वाढला आहे ! तेव्हां बाहेरचा बगीच्याचा बंगला आम्हांस द्याल का कांहीं दिवस ? शिवाय कांहीं आर्थिक मदतही झाली तर बरें !

लक्ष्मीधरपंत -  एकदां सांगितलं , कीं माझ्याकडून एक छदाम देखील मिळणार नाहीं म्हणून. मग बंगला कोठला !
बा. शि. -  तरी पण तुम्ही कांहीं मदत कराल अशी मला अजून आशा आहे. लक्ष्मीधरपंत, ही बालवीर चळवळ फार उपयुक्त आहे. व्यवहारांत लागणा-या अनेक गोष्टीचें शिक्षण या चळवळींत मुलांस मिळतें. एकोप्यानें कसें वागावें, आज्ञावंदन, शिस्त, परोपकार, भूतदया, कष्ट, काटकपणा इत्यादि अनेक गुण या चळवळीनं अंगी बाणतात. लक्ष्मीधरपंत, आपणांसारख्या धनाढयांनीं मदत द्यावयाची नहीं तर कुणी ?

लक्ष्मीधरपंत -  मी कवडी देणार नाहीं. कितीदां सांगावं तुम्हाला ? हे पोषाखी सरदार का कुठें समाजोद्वार करणार आहेत ?