Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश तिसरा 1

प्रवेश तिसरा
(डॉक्टर व नारायण. डॉक्टरांच्या हातांत त्यांच्या धंद्याचे सर्व सामान आहे.)
डॉक्टर -  अरे, पण कुठं जायचं तें तर सांगशील.

नारायण -  ते मग सांगेन; आधीं माझ्याबरोबर येतां कां ? बोला. नहीं म्हणूं नका. एका गरिबावर उपकार करावयाचे आहेत. फीची फिकीर नको, पैसे मी देईन.

डॉक्टर -  तूं फी देणार आणि लक्ष्मीधरपंत ओरडतील तें ! बाप पैसा जपतो, तर पोंर सर्व उधळतो ! पण जायचं कुठं ?

नारायण -  तें आधी मी सांगणार नाहीं, तुम्हीं चला.        

डॉक्टर -  बरं बाबा, तूं तरी खमक्याच आहेस ! तुझ्यासारखंच का होईना, चल ! ( पुढें होऊन.)

डॉक्टर -  अरे, आपण तर महारवाडयाच्य रस्त्याला आलो. कुणा महारामांगाकडे नेणार कीं काय मला ?

नारायण -  होय. डॉक्टर, त्या पांडू महाराचा पोरगा राघू फार आजारी आहे. तापाने तळमळत आहे.

डॉक्टर -  छे रे बाब, लोक काय म्हणतील ! या गांवांत मी नवीनच दवाखाना घातला आहें. माझी अजून प्रॅक्टिस नीट सुरू देखली नाहीं; तोंच लोकांविरूध्द वागण्याचें धाडस मी कसं करूं ? मला तशी येण्यास हरकत नही. अरें, कॉलेजात शिकत होतों, तेव्हां प्रेतंसुध्दां आम्ही फाडीत होतों. उंदीर -बेडूक कापीत होतों; पण या गांवांत नको.

नारायण - तुम्ही पशूंना शिवतां, परंतु मनुष्यप्राण्याला शिवण्याची तुम्हांला लाज वाटते ?

डॉक्टर-  लोकांच्या बागुलबोवाला भितां ? वाहवा, तुमची सदसद्विवेकबुध्दि वगैरे चट् सारं बाजूला ठेवावं लागतं. रामालासुध्दां, सीतादेवी शुध्द होती तरी जनापवादामुळें सोडावी लागली. 'यद्यपि शुध्दं लोकाविरूध्द, ना चरणीयं ना करणीयम् । असा प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांनींसुध्दां दंडक घालून ठेवला आहे.

नारायण -  बोलतों, माफ करा ! सैतानाला सुध्दां मोठमोठीं वाक्य म्हणून दाखवून स्वत:च्या वर्तनाचे समर्थन करतां येतं. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेवकबुध्दीचा - ह्रदयांतील जागृत देवतेचा - खून पाडील आहां. जोंपर्यंत हिंदुस्थानांत सदसद्विवेकबुध्दीला महत्व नसून लोकांच्या रूढीलाच मोठेपणा आहे, तोंपर्यंत त्याच्य उध्दाराची आशा नको.