Get it on Google Play
Download on the App Store

श्रीदुर्गास्तोत्र

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदुर्गायै नमः ॥
नगरांत प्रवेशले पंडुनंदन । तों देखिला दुर्गास्थान । अर्मराज करी स्तवन । जगदंबेचें तेधवां ॥१॥
जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदागर्भसंभवकुमारी । इंदिरारमण सहोदरी । नारायणी चंडिके अंबिके ॥२॥
जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी । मूलस्फूर्ति प्रणवरूपिणी । ब्रह्मानंदपददायिनी । चिद्विलासिनी अंबिके तूं ॥३॥
जय जय धराधरकुमारी । सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी । हेरंबजननी अंतरीं । प्रवेशीं तूं धामुचे ॥४॥
भक्तहृदयारविंदभ्रमरी । तुझे कृपाबळें निर्धारी । अतिमूढ निगमार्थविवरी । काव्यरचना करी अद्भुत ॥५॥
तुझिये कृपावलोकनें करून । गर्भाधासी येतील नयन । पांगुळ करील गमन । दूर पंथें जाऊनि ॥६॥
जन्मदारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका । तूं स्वानंदसरोवर मराळिका । होसी भाविकां सुप्रसन्न ॥७॥
ब्रह्मानंदे आदिजननी । तंव कृपेची नौका करुनि । दुस्तर भवसिंधु उल्लंघूनि । निवृत्तीतटां जाईजे ॥८॥
जय जय आदिकुमारिके । जय जय मूलपीठनायिके । सकलसौभाग्यदायिके । जगदंबिके मूलप्रकृतिके ॥९॥
जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशके भक्तवरदायिनी । सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामाये ॥१०॥
जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके । त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ॥११॥
शिव मानसकनकलतिके । जय चातुर्यचंपक कलिके । शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपालके अपर्णे ॥१२॥
तव मुखकमलशोभा देखोनी । इंद्रबिंब गेलें विरोनी । ब्रह्मादिदेव बाळें तान्हीं । स्वानंदसदनीं निजविसी ॥१३॥
जीव शिव दोन्हीं बाळकें । अंबे त्वां निर्मिलीं कौतुकें । स्वरूप तुझें जीव नोळखे । म्हणोनि पडला आवर्ती ॥१४॥
शिव तुझें स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो नित्यमुक्त । स्वानंदपद हातां येत । तुझे कृपेनें जननिये ॥१५॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ । त्वां रचिला ब्रह्मांड गोळ । इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मूळ करिती तूं ॥१६॥
अनंत बालादित्य श्रेणी । तंव प्रभेमाजीं गेल्या लपोनी । सकल सौभाग्य शुभकल्याणी । रमारमण वरप्रदे ॥१७॥
जयशंबररिपुहरवल्लभे । त्रैलोक्य नगरारंभस्तंभे । आदिमाये आत्मप्रिये । सकलारंभे मूलप्रकृती ॥१८॥
जय करुणामृतसरिते । भक्तपालक गुणभरिते । अनंतब्रह्मांड फलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ॥१९॥
तूं सच्चिदानंदप्रणवरूपिणी । सकल चराचरव्यापिनी । सर्गस्थित्यंतकारिणी । भवमोचनी ब्रह्मानंदे ॥२०॥
ऐकोनि धर्माचे स्तवन । दुर्गा जाहली प्रसन्न । म्हणे तुमचे शत्रु संहारीन । राज्यीं स्थापीन धर्मातें ॥२१॥
तुम्ही वास करा येथ । प्रगटो नेदीं जगांत । शत्रू क्षय पावती समस्त । सुख अद्भुत तुम्हां होय ॥२२॥
त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण । तें जे त्रिकाळ करिती पठण । त्यांचे सर्व काम पुरवीन ॥ सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥२३॥
इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गास्तोत्रं समाप्तम् ॥