Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय पहिला

॥ श्रीगणेशाय नमः ॥
मार्कंडेय ऋषी आपण ॥ भागोरी ऋषीशीं करी कथन ॥ पूर्वीं वर्तली कथा संपूर्ण ॥ परमादरे करून सांगता ॥१॥
सूर्यपुत्र सावर्णीशीं ॥ अष्टम मनू म्हणती तयासी ॥ ऐक तयाचिया उत्पत्तीसी ॥ विस्तारे तुजसीं सांगेन ॥२॥
महामाया प्रभावें करून ॥ मन्वंतराचा अधिप जाण ॥ झाला ऐसा विख्यात संपूर्ण ॥ सूर्यनंदनदन सावर्णी तो ॥३॥
पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी जाण ॥ चैत्रवंशी झाला उत्पन्न ॥ सुरथनामा राजा आपण ॥ पृथ्वीचें संपूर्ण करी राज्य ॥४॥
नीतिन्यायें प्रजा पाळीत ॥ पिता पाळी जैसा पुत्रातें ॥ राजाशीं त्या शत्रू बहुत ॥ केला विध्वंसीते असते झाले ॥५॥
तया दोघा युद्ध झालें ॥ दोघेंही राजे प्रबळ बळें ॥ बळ थोडें असताही जिंकिलें ॥ कोला विध्वंसी बळें युद्धीं त्यासीं ॥६॥
राजा स्वपुरासी येऊन ॥ स्वदेशाचा नृप झाला आपण ॥ प्रबळ शत्रूंनीं कैद जाण ॥ टाकिले करून तयासीं ॥७॥
प्रधान दुष्टें बळें तयासी ॥ वश्य झाले दुष्ट दुरात्म्याशीं ॥ हरण केलें कोशबळासी ॥ तैसेही स्वपुरासी राहतां ॥८॥
तेद्वा शिकारी मिस करून ॥ हीन राज्य राजा आपण ॥ येकलाचि अश्वावरी बसून ॥ अतिघोर वन प्रवेशला ॥९॥
तो तेथें पाहे आश्रमासी ॥ जेथें आहे सुमेधा महाऋषी ॥ शांत श्वापदसंघासी ॥ शोभे ऋषी शिष्यासहित ॥१०॥
मुनीनें त्यासी सत्कारितां ॥ कांहीं येक काळ तेथें राहतां ॥ स्वेच्छा संचार करीत होता ॥ आश्रमी असतां ऋषीच्या ॥११॥
तो तेथें चिंतन करीत ॥ राज्य गेलें माझें समप्त ॥ माझ्या पूर्वजांनीं पाळिलें तें ॥ पारख्यें पुरतें मज झालें ॥१२॥
माझ्या भृत्यासहीं दुष्ट जाण ॥ न कळे धर्मे करिती पाळन ॥ न जाणे माझे ते प्रधान ॥ शूर संपूर्ण मस्त हस्ती ऐसे ॥१३॥
माझ्या वैरियासी वश्य झाले ॥ त्यासि कैंचे भोग सोहळे ॥ जे मजसि अनुसरले ॥ वेतन धन मिळे कैसें त्यांसी ॥१४॥
त्यांसी निरंतर जीवनवृत्ती ॥ अन्य भूपती देती न देती ॥ ते व्यय चांगला न करिती ॥ सर्व संपत्ती करितील नाश ॥१५॥
अतिदुःखें करी चिंतन ॥ नाश होईल कोश संपूर्ण ॥ आणिकही निरंतर जाण ॥ करी चिंतन भूपती तो ॥१६॥
त्या ब्राह्मणाच्या आश्रमांत ॥ वैश्य येक पाहिला तेथें ॥ त्यासि पुशे तूं कोण येथें ॥ काय निमित्त यावया ॥१७॥
काय निमित्त तूंस शोक ॥ दुर्मन ऐसा दिसशीं आणीक ॥ वचन ऐकूनि त्याचें देख ॥ बोले मस्तक नम्र करून ॥१८॥
वैश्य तो प्रतिवव्चन जाण ॥ राजासि बोले प्रीती करून ॥ मी समाधीनामा वैश्य आपण ॥ जन्मलो सधन कुळीं मी ॥१९॥
स्त्री - पुत्रांनीं बाहेर घातलें ॥ दुष्ट धनलोभें ते भुलले ॥ स्त्री आणि स्वजन मी नसते वेळें ॥ पुत्रादिकीं हरिलें धन माझें ॥२०॥
वनासी आलों मी अतिदुःखी ॥ आप्तबंधूंनीं सोडिलें शेखीं ॥ तो मी न जाणे पुत्रसुखी ॥ किंवा दुःखी मी नेणे ॥२१॥
स्वजनाची कैसी प्रवृत्ती ॥ गृहीं स्त्री वर्ते कोणे रीती ॥ ते काय गृहीं क्षेम असती ॥२२॥
अथवा पुत्र माझे दुर्वृत्त ॥ ऐसी ऐकूनि वैश्याची मात ॥ राजा बोलत तयांसीं ॥२३॥
लोभ्यांनीं घातिलें बाहेरी ॥ दारापुत्रा प्रीति धनावरी ॥ तुला त्यांचा मोह भारी ॥ स्नेहबंधन शिरीं । तूं का वाहसी ॥२४॥
वैश्य म्हणे माझ्या मनीं होतें ॥ तेचि तूं बोलिलासी सत्य ॥ काय करूं बद्ध झालो निश्चित ॥ मानस स्वस्थ नव्हे माझें ॥२५॥
त्यांनीं टाकूनि पितृस्नेहें ॥ धन त्यागिले मज पाहे ॥ स्वजनप्रेम हृदयीं मी वाहे ॥ मनां स्नेह न सोडवे त्यांचा ॥२६॥
हे कां ऐसें मी न जाणें ॥ जाणत असतांही राजा मी नेणें ॥ त्यांच्या प्रेमें गुंतलों मनें ॥ विपरीत जाण असतां बांधव ॥२७॥
त्यांनीं मज अपकार केला ॥ तेणें विषाद वाटे मनाला ॥ काय करूं माझ्या प्रेमाला ॥ निष्ठुरता मनाला न ये त्यांची ॥२८॥
मार्कंडेय म्हणे भागोरीसी ॥ पुढें वर्तली कथा कैसी ॥ ते मी सांगेन ऋषी ॥ करी श्रवणासीं सावध ॥२९॥
विप्रा रे ते दोघे मिळोन ॥ सुमेधासमीप बैसले जाण ॥ समाधिनामा वैश्य आन ॥ सुरथ जाण ते दोघें ॥३०॥
सुमेधा ऋषीसी यथाधिकारें ॥ करोनिया त्याचा सत्कार ॥ बैसोनि वैश्य पार्थिवसमोर ॥ कांहीं येक नरेंद्र कथा आरंभिली ॥३१॥
राजा म्हणे ऋषी कांहीं पुसावें ॥ मनीं असें तें तुम्ही सांगावें ॥ माझ्या मना दुःखस्वभावे ॥ यत्न करितां पाहे वाट तें ॥३२॥
गेल्या राज्याची ममता ॥ राज्यांगही गेले असतां ॥ जाणोनि हे अज्ञानता ॥ मुनी ममत्वता मज कां हे ॥३३॥
यालाही पुत्रानें घातिले बाहेर ॥ दाराभृत्यांनीं केलें दूर ॥ त्याग केले स्वजन निष्ठुर ॥ तथापि ममता फार हाही मानी ॥३४॥
या प्रकारे आम्ही दोघेही ॥ अतिदुःखें दुःखी पाहीं ॥ सदोष विषय पाहताहीं ॥ मना ममत्व कांहीं न सुटेची ॥३५॥
ज्ञानवंताही मोह जाण ॥ ममत्वाचा बाधील दारूण ॥ आम्ही अंधमूढ संपूर्ण ॥ अविवेकी अज्ञान अतिशयेशीं ॥३६॥
ऋषी म्हणे ज्ञान सर्वांसीं ॥ जीवमात्रा विषयभोगासी ॥ ऐक राजा विषयज्ञानासी ॥ वेगळीक त्यासी असे जाण ॥३७॥
दिवसा अंधळे कोणी प्राणी ॥ रात्री न दिसे ऐसे कोणी ॥ दिवसांरात्रीं दृष्टि देखणी ॥ असती प्राणी ऐसेही ॥३८॥
मनुष्य ज्ञानी सत्य जाण ॥ त्यांसि तें ज्ञान शुद्ध न म्हणे ॥ या कारणे सर्वांसही ज्ञान ॥ पशुपक्षी मृगाही संपूर्ण असे ॥३९॥
जे ज्ञान मनुष्या असे ॥ तेचि प्राणिमात्राच्या ठाईं वसे ॥ पतंगा ज्ञानेचि होय नाश ॥ पिल्यासाठीं असे पक्ष्यासही ॥४०॥
कणमोहें संचय करी ॥ अथवा क्शुधेने पीडिल्या भारी ॥ मनुष्य व्याघ्रादि शरीरी ॥ अभिलाषें करी कुटुंब पोषण ॥४१॥
लोभें प्रत्युपकार जाण ॥ पाहे ऐसा असे कोण ॥ तथापि ममता वाढून ॥ मोहगर्तीं नेउन नेमे टाकी ॥४२॥
संसारीं स्थिती करावयां ॥ महामायेचाचि प्रभाव राया ॥ यदर्थीं विस्मय न लगे करावयां ॥ योगनिद्रा - माया हरीची ॥४३॥
हरीच्या महामाये करून ॥ जगा पडलेंसे मोहन ॥ ज्ञानियाचेही जे ज्ञान ॥ तेही आपण देवी भगवती ॥४४॥
बळेंचि आकर्षूनि पाहीं ॥ नेऊन टाकी महामोहीं ॥ चराचर विश्व सर्वहीं ॥ स्वेछां नसतांही उत्पन्न करी ॥४५॥
ते जयासि होय प्रसन्न ॥ तो मुक्त होय तत्क्षणें ॥ तेचि विद्या हेतू आपण ॥ परमेश्वरीहीं जाण राया तेची ॥४६॥
संसार हाचि बंध पूर्ण ॥ बंधालागी होय कारण ॥ तयासही हेतूभूत जाण ॥ तियेवांचून नसे कोण्ही ॥४७॥
सुरथ राजा सुमेधासीं ॥ प्रश्न करी हे महाऋषी ॥ देवी कोणते सांग कैसी ॥ म्हणती जियेसी महामाया ॥४८॥
कशासाठीं तिचा उद्भव ॥ कोण कर्म काय वैभव ॥ त्या देवीचा सांग प्रभाव ॥ उत्पन्न कशास्तव झाली ते ॥४९॥
हें सर्वही तुम्हांपासुनी ॥ ऐकावें ऋषी ऐसें मनीं ॥ सुमेधा ऐसें ऐकुनि ॥ सावध श्रवणी होय म्हणे ॥५०॥
ते जगन्मूर्ती निरंतर ॥ व्यापूनि वसे सर्वांतर ॥ तथापि तिचा उत्पत्तिप्रकार ॥ सांगतों समग्र राजा तुज ॥५१॥
ते सिद्ध करावयां देवकार्या ॥ अवतार धरी महामाया ॥ उत्पत्ति नसतांती शिराया ॥ लोकीं इया उद्भवली म्हणती ते ॥५२॥
शेषआस्तरणी नारायण ॥ जग येकार्णव होतां जाण ॥ योगनिद्रा करी आपण ॥ कल्पांती भगवान जगत्पती ॥५३॥
त्या काळीं घोर अत्यंत ॥ मधुकैटभ नामे विख्यात ॥ विष्णु कर्णमळें उद्भुत ॥ माराया उद्यत ब्रह्मयासीं ॥५४॥
विष्णूच्या नाभी कमळीं जाण ॥ ब्रह्मा बैसला होता आपण ॥ निजेला असतां जनार्दन ॥ असुर दारुण ब्रह्मा पाहे ॥५५॥
योगनिद्रेचा अतिभर ॥ तेणें हृदय झालें येकाग्र ॥ झाकिले असतां पद्मनेत्र ॥ भगवंत जागृत कराया ब्रह्मा ॥५६॥
जगन्माता विश्वेश्वरी ॥ स्थित्यंत सृष्टी उत्पन्न करी ॥ विष्णुतेज जे निधारी ॥ ब्रह्मास्तुति करी देवी हे निद्रे ॥५७॥
तूं स्वाहा तूं स्वधा जाण ॥ वषट्कारही तूंचि आपण ॥ अक्षर अमृत नित्यपूर्ण ॥ त्रिमात्रा संपूर्ण प्रणव तूंचि ॥५८॥
सर्वसाक्षिणी तूंचि होसी ॥ उच्चार नव्हे परावाचेसी ॥ संध्यासावित्री म्हणती तुजसी ॥ परामाता ऐसी तूचि माते ॥५९॥
तूंचि करिसीं विश्व धार्ण ॥ विश्वही करिसीं तूं उत्पन्न ॥ देवी करिसी पाळन ॥ अंत संपूर्ण कर्ती तूंची ॥६०॥
सृष्टिरूपे उत्पन्न करिसी ॥ स्थितिरूपें तूंचि पाळिसी ॥ संहाररूपें निर्दाळिसी ॥ जगा तूं व्यापिसीं जगन्माये ॥६१॥
महामाया महाविद्या ॥ महा स्मृती महामेघा ॥ महामोह भगवती आद्या ॥ महादेवी विद्यामहेश्वरी ॥६२॥
सर्वांची प्रकृति तूं जाण ॥ गुणत्रय तुजपासून ॥ काळरात्रीं महारात्रीं आपण ॥ मोह दारुण तेही तूंची ॥६३॥
र्‍ही श्रीपरमेश्वरी ऐसी ॥ तूं बुद्धिबोध लक्षणेंसीं ॥ लज्जातुष्टीष्टिही होही ॥ शांतीनिजक्षांती तूंचि येक ॥६४॥
खङ्गिणी शूलिनी घोरा जाण ॥ गदिनी चक्रिणी तूं आपण ॥ शंखिणी चापिणी बाण ॥ भूषंडी परिघायुधा संपूर्ण नामे तूंची ॥६५॥
अशेष सौम्यसौम्यतर ॥ सौम्यत्वें तूं अतिसुंदर । तूं परापराहूनि पर ॥ ऐसी तूं अपार परमेश्वरी ॥६६॥
अषेष जे कां वस्तुजात ॥ असतां तूंचि व्याप्त ॥ शक्तिरूपें तूं सर्वांत ॥ मी काय तूतें स्तवूं जगदंबे ॥६७॥
या जगासी आणि तुजसी ॥ सृष्टिसंहारकर्ता ऐशासी ॥ त्यासही तूं निद्रेवश्य करिसी ॥ तुझ्या स्तुतीसी करील कोण ॥६८॥
शिव विष्णु मजसहित ॥ देह धरविसी स्वसामर्थ्यें ॥ स्तवन तुझें करावया माते ॥ समर्थ तूं तें कोण असे ॥६९॥
तुझ्या प्रभावा उपमा नाहीं ॥ तथापि उदारे स्तविलों कांहीं ॥ दुराधर्ष असुर पाहीं ॥ मधुकैटभा मोहीं महामोहें ॥७०॥
प्रबोध करी जगत्स्वामीसीं ॥ निद्रेपासूनि उठवी तयासी ॥ महाअसुर वध करावयासी ॥ प्रबोध विष्णूसी करी तूं ॥७१॥
सुमेधा ऋषी तो आपण ॥ सुरथ राजा ऐक म्हणे ॥ या प्रकारें देवीचें स्तवन ॥ तामईचे जाण करी तेव्हां ॥७२॥
जागृत करावया विष्णूसी ॥ मारवावयां मधुकैटभासीं ॥ नेत्रनासिका बाहू मुखेसीं ॥ हृदयदेशींहूनि निघाली ॥७३॥
अव्यक्त व्यक्तिरूपें निघाली ॥ ब्रह्म्यपासी उभी राहिली ॥ आपण होतांचि निराळी ॥ जगमूर्ति उठली स्वानंदाची ॥७४॥
येकार्णवापासून उठून ॥ मधुकैटभ दुरात्मे जाण ॥ पराक्रमी मोठे बळवान ॥ दुष्ट दुर्जन दोघें पाहिले ॥७५॥
क्रोधयुक्त नेत्र आरक्त ॥ ब्रह्मदेवा भक्षावया उद्युक्त ॥ उठोनियां असुरासमवेत ॥ युद्ध करीत जगन्नाथ तो ॥७६॥
पांच हजार वर्षेंपर्यंत ॥ बाहुयुद्ध करी भगवंत ॥ तेहीं अत्यंत बळें उन्मत्त ॥ महामायामोहित असुर ते ॥७७॥
देवाधिदेवा आम्हांपासून ॥ वर माग तूं म्हणती आपण ॥ वर मागितला नारायण ॥ तुम्हां मजपासून मृत्यू व्हावा ॥७८॥
काय करावा आणीक वर ॥ वर हाचि मला प्रियकर ॥ ऋषी म्हणे सुरथा असुर ॥ मायेनें फार मोहिलेल्यांसी ॥७९॥
आम्हांसी ठकविलें म्हणून ॥ जगीं पाहती उदकपूर्ण ॥ तेव्हां कमलेक्षणा अवलोकून ॥ असुर भाषण करिते झाले ॥८०॥
संतोषलो तुझ्या युद्धासी ॥ श्लाघ्या तूं मृत्यू आम्हांसी ॥ उदक नसेल ज्या स्थळासी ॥ आमुच्या नाशासी करी तेथें ॥८१॥
ऋषी म्हणे राजा बरें म्हणून ॥ सायुध चतुर्भुज नारायण ॥ आपुल्या मांडीवरी घेऊन ॥ शिरेच्छेदन केलें त्यांचें ॥८२॥
करितां ब्रह्म्यानें स्तवनासीं ॥ उत्पन्न झालीया प्रकारेसीं ॥ तिचा प्रभाव राजा तुजसी ॥ सांगेन पर्येसी म्हणे आणिक ॥८३॥
अपुल्या कथेचें वर्णन ॥ नित्यानंद निमित्त करून ॥ प्राकृत भाषा करवी कथन ॥ देवीवर प्रदान करूनियां ॥८४॥
भागोरी ऋषीशीं मार्कडेय ॥ ऐक म्हणे पुढील अध्याय ॥ सुमेधा सुरथाशीं सांगताहे ॥ गोड कथा आहे पुढें ॥८५॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कडेय पुराणसंमत ॥ झाला प्रथमाध्याय समाप्त ॥ जगदंबा समर्थ प्रीति पावो ॥८६॥
इतिश्री देवीविजय ग्रंथ प्रथमाध्याय समाप्तः ॥श्री॥        ॥         ॥
॥ इति श्रीदेवीविजय प्रथमाध्याय समाप्त ॥