Get it on Google Play
Download on the App Store

कर्मयोग

अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणार्‍या एकूणेक दु:ख क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल .