Get it on Google Play
Download on the App Store

रामानुजन अंक

इ.स. १९१७ साली रामानुजन आजारी झाले. त्यांना एका इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रारंभिक तपासण्यांत आजार टी.बी.चा असल्याचे वाटले; परंतु नंतर समजले की, पोषणमूल्ये नसलेला आहार व जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे ते आजारी झाले. इंग्लंडच्या कडाक्याच्या थंडीला रामानुजन यांचा शाकाहार रोखू शकत नव्हता. ते क्षयाने ग्रासले. त्याकाळी त्यावर उपाय नव्हता. ते थकत, खंगत गेले. चर्या मलूल पडली. मरणोन्मुख असतानाही त्यांची गणिते चालूच होती. रामानुजन आजारी असताना प्रा. हार्डी हे इंग्लंडच्या 'पुतनी रुग्णालयात' भेटण्यास टॅक्सीने गेले. टॅक्सीचा नंबर होता १७२९. हार्डीना ती संख्या डल, अशुभ वाटली. प्रा. हार्डी म्हणाले, 'मी १७२९ क्रमांकाच्या टॅक्सीने आलो. हा अंक अशुभ आहे कारण त्यास तेरा या अशुभ अंकाने भाग जातो.' रामानुजन पटकन म्हणाले, 'हा फार रंजक व महत्त्वपूर्ण आकडा आहे.दोन घनांच्या (क्यूब) बेरजेच्या स्वरूपात दोन प्रकारे मांडता येणारी ही सर्वात लहान संख्या आहे.
१७२९ = १००० (१० चा घन) + ७२९ (९ चा घन) आणि
१७२९ = १७२८ (१२ चा घन) +१ ( १ चा घन)

तेव्हापासून सारे जग १७२९ ला 'रामानुजन अंक' म्हणून ओळखू लागले. ते म्हणायचे, ''कोणत्याही संख्येकडे चिकित्सेने पाहिले की, त्या संख्येत चेतना निर्माण होते आणि ती बोलकी होते.'