Get it on Google Play
Download on the App Store

अमोघवज्र

अमोघवज्र हे भारतीय बौद्ध भिक्खु होते. तसेच ते बौद्ध भाषांतरकारही होते. अमोघवज्र हे वज्रबोधी यांचे शिष्य होते.. यांनी भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. यांनी अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. यांनी नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.

वज्रबोधी हे दक्षिण भारतातील तर अमोघवज्र उत्तर भारतातील होते. म्हणजेच त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादी. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.