Get it on Google Play
Download on the App Store

दुर्दैवी 3

ती मुकाटयाने तोंड धुऊन मुलीजवळ बसली. मुलगी त्या गोंगाटातही शांतपणे झोपली होती. ती तरुण माता दु:खी कष्टी अशी तेथे बसून होती. सायंकाळी सूर्याच्या सोनेरी किरणांत रम्य दिसणारा तिचा चेहरा आता दु:खाने काळवंडलेला होता. निसर्गाने तिला आनंदी निर्मिले होते. परंतु जगाने, संसाराने तिला दु:खी बनविले होते. निसर्गाने तिला सुंदर बनविले होते. परंतु जगातील जाचांनी तिचे मुळचे कोवळे सौंदर्य नष्ट झाले होते. निसर्गाच्या त्या गोड चित्राची जगातील कठोरपणामुळे हेळसांड झाली होती.

तिचा नवरा प्रत्येक द्रोणाबरोबर बेताल होऊ लागला. प्रथम हातवारे करीत होता. नंतर बडबड करू लागला. तेथे एका बाकावर तो बसला. बाहेर तिकडे रस्त्यात कोणी घोडेविक्या होता.

''एकच घोडा उरला. कोणी घेतो का? एकच घोडा. या लौकर, सुंदर घोडा, उमदा घोडा.'' असे तो पुकारीत होता.

ते शब्द आमच्या त्या तरुणाच्या कानांवर पडले.

तो एकदम म्हणाला;

''लोक घोडे विकतात. कोणी गाईगुरे विकतात. ज्याच्याजवळ जे असेल ते तो विकतो. जवळच्या बायका का विकू नये? बायका म्हणजे घोरपडी. सार्‍या संसाराचे या मातेरे करतात. लहानपणी आमची लग्ने होतात. लौकर मुलाबाळांचे लेंढार पाठीस लागते. मरमर मरावे लागते त्या सर्वांना पोसण्यासाठी. मनातील सारे मनोरथ, महत्त्वकांक्षा धुळीत मिळतात, आपण मोठे व्यापारी व्हावे, मला वाटे. परंतु कसा होणार? बापाने पंधराव्या वर्षी माझे लग्न केले आणि स्वत: आपण मेला. लागला संसार माझ्या पाठीस. अठरावीस वर्षांचा झालो नाही तो ही मुलगी! कुठला व्यापार नि काय? रोज मजुरी करीत असतो. इकडे गवत काप, तिकडे लाकडे फोड असे करतो. तिकडे कामधंदा मिळेना तर इकडे भटकत आलो. बायकांमुळे हा सारा गोंधळ. या बायका विकून टाकाव्या. का नाही कोणी त्यांना विकीत?'' अशी त्याची बडबड सुरू झाली. तो दुसरा एक तर्र झालेला म्हणाला.

''कोणी बायको विकायला काढलीच, तर पलीकडचा तो मनुष्य विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. माझी खात्री आहे. तू विकतोस का आपली? का उगीच बडबड करतो आहेस? स्वत:ची बायको विकण्याचे धैर्य आहे का तुझ्याजवळ? आहे असा पराक्रम?''

तो पलीकडचा मनुष्य त्या तरुणीकडे बघत होता. तो दारू प्याला नव्हता. तो शांतपणे म्हणाला,

''ती बाई सुस्वभावी दिसते. माणसांची मला पारख आहे. कोणाला गायी- बैलांची पारख असते, घोडयाची पारख असते, परंतु माणसांची पारख थोडयांना असते, पण मला माणसांची पारख आहे. ती पलीकडची बाई म्हणजे रत्न आहे. शपथेवर सांगतो.''

दुर्दैवी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
दुर्दैवी 1 दुर्दैवी 2 दुर्दैवी 3 दुर्दैवी 4 दुर्दैवी 5 दुर्दैवी 6 दुर्दैवी 7 दुर्दैवी 8 दुर्दैवी 9 दुर्दैवी 10 दुर्दैवी 11 दुर्दैवी 12 दुर्दैवी 13 दुर्दैवी 14 दुर्दैवी 15 दुर्दैवी 16 दुर्दैवी 17 दुर्दैवी 18 दुर्दैवी 19 दुर्दैवी 20 दुर्दैवी 21 दुर्दैवी 22 दुर्दैवी 23 दुर्दैवी 24 दुर्दैवी 25 दुर्दैवी 26 दुर्दैवी 27 दुर्दैवी 28 दुर्दैवी 29 दुर्दैवी 30 दुर्दैवी 31 दुर्दैवी 32 दुर्दैवी 33 दुर्दैवी 34 दुर्दैवी 35 दुर्दैवी 36 दुर्दैवी 37 दुर्दैवी 38 दुर्दैवी 39 दुर्दैवी 40 दुर्दैवी 41 दुर्दैवी 42 दुर्दैवी 43 दुर्दैवी 44 दुर्दैवी 45 दुर्दैवी 46 दुर्दैवी 47 दुर्दैवी 48 दुर्दैवी 49 दुर्दैवी 50 दुर्दैवी 51 दुर्दैवी 52 दुर्दैवी 53 दुर्दैवी 54 दुर्दैवी 55 दुर्दैवी 56 दुर्दैवी 57 दुर्दैवी 58 दुर्दैवी 59 दुर्दैवी 60 दुर्दैवी 61 दुर्दैवी 62 दुर्दैवी 63 दुर्दैवी 64 दुर्दैवी 65 दुर्दैवी 66 दुर्दैवी 67 दुर्दैवी 68 दुर्दैवी 69 दुर्दैवी 70 दुर्दैवी 71 दुर्दैवी 72 दुर्दैवी 73 दुर्दैवी 74