Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ११ ते २०

तेषामेवाऽनुकम्पार्थम हमज्ञानजं तमः ।

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥११॥

म्हणोनियां मज । आत्मयाचा भाव । केला ज्यांनीं ठाव । जगावया ॥२७९॥

मज एकाविण । सर्व हि असार । ऐसी च साचार । मति ज्यांची ॥२८०॥

तयां शुद्धज्ञानी - । भक्तांपुढें मी च । मशालजी साच । होवोनियां ॥२८१॥

ज्ञान -कर्पूराचा । पोत पाजळीत । दाखवीत वाट । चालूं लागें ॥२८२॥

अज्ञानाच्या रात्री - । माझारीं अंधार । दाटतां अपार । भक्तांपुढें ॥२८३॥

स्वयें मी च दूर । सारितां तो होय । नित्य ज्ञानोदय । तयांलागीं ॥२८४॥

देखा भक्तांलागीं । प्रिय जो अत्यंत । देव भगवंत । नारायण ॥२८५॥

बोलतां तो ऐसें । काय म्हणे पार्थ । प्रभो , मन शांत । झालें माझें ॥२८६॥

संसाराचा सारा । झाडोनियां मळ । मज तूं निर्मळ । केलें देवा ॥२८७॥

जन्म -मरणाचे । संपले सायास । नाहीं गर्भवास । आतां मज ॥२८८॥

आपुलें जनन । आपुलिया डोळां । देखिलें दयाळा । आज येथें ! ॥२८९॥

गमे हें जीवन । माझ्या चि स्वाधीन । झालें आत्म -ज्ञान । म्हणोनियां ॥२९०॥

तुमचिया मुखें । झाला उपदेश । कृपा ही विशेष । मजवरी ॥२९१॥

धन्य केलें मज । देवा नारायणा । भक्तीचिया खुणा । दाखवोनि ॥२९२॥

आज भाग्याचा हा । पातला सुदिन । सफल जीवन । झालें माझें ॥२९३॥

अंतर्बाह्म तम । गेलें निरसोन । तुझिया वचन - । तेजाकारें ॥२९४॥

म्हणोनि स्वरूप । आज तुझें देवा । देखिलें केशवा । याथार्थत्वें ॥२९५॥

अर्जुन उवाच --

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ‍ ।

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ‍ ॥१२॥

महाभूतांचें जें । विश्रांतीचें स्थान । तूं चि तें निर्वाण । परब्रह्म ॥२९६॥

परम पावन । तूं चि जगन्नाथ । आराध्य दैक्त । तिन्ही देवां ॥२९७॥

चोवीस तत्त्वांच्या । पलीकडे साजे । पंचविसावें जें । दिव्य तत्त्व ॥२९८॥

जया सांख्य देती । ‘ पुरुष ’ हें नांव । तो तूं स्वामी देव । नित्य -सिद्ध ॥२९९॥

होसी अजन्मा तूं । प्रकृतिपरता । हें चि आम्हीं आतां । ओळखिलें ॥३००॥

तूं चि काळरूप - । यंत्र -सूत्रधार । तूं एक आधार । जीवनासी ॥३०१॥

आणि ब्रह्मांडाचें । तूं चि अधिष्ठान । ऐसें स्पष्ट ज्ञान । झालें मज ॥३०२॥

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।

असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥१३॥

आणिक हि एके । परी थोरपण । येई समजोन । तुझें मज ॥३०३॥

कीं तें थोरपण । ऐकिलें पूर्वीं च । वर्णिलें जें साच । महर्षींनीं ॥३०४॥

तयाची प्रचीति । परी आतां आली । तुम्हीं कृपा केली । म्हणोनियां ॥३०५॥

नारद ऐसें चि । करी गुण -गान । अखंड बैसोन । आम्हांपाशीं ॥३०६॥

परी तयाचें तों । रहस्य नेणोन । होतसों तल्लीन । गीत -सुखीं ॥३०७॥

अहो जी गोविंदा । आंधळ्यांच्या गांवीं । स्वयें जरी रवि । प्रकटला ॥३०८॥

तरी तयां होय । उन्हाची च सोय । परी दिसे काय । प्रकाश तो ? ॥३०९॥

एर्‍हवीं देवर्षि । अध्यात्माचें गीत । राग -रागिणींत । आळवितां ॥३१०॥

गीत -माधुरीचें । वरिवरी सुख । कळे ना आणिक । दुजें आम्हां ॥३११॥

असित देवल । महर्षींनीं साच । आम्हांसी तैसें च । सांगितलें ॥३१२॥

परी विषयांच्या । विषें मति व्याप्त । झाली होती तेथ । तिये वेळीं ॥३१३॥

आणिकांचे तुज । काय सांगूं आतां । व्यासदेवें स्वतां । येवोनियां ॥३१४॥

आमुच्या मंदिरीं । तुझें चि वर्णन । करावें संपूर्ण । निरंतर ॥३१५॥

परि चिंतामणि । देखिला अंधारीं । सारावा तो दूरी । नोळखोनि ॥३१६॥

मग सुर्योदय । होतां चि तो जैसा । चिंतामणि ऐसा । ओळखावा ॥३१७॥

तैसे व्यासादिक । महर्षींचे बोल । खाणी त्या अमोल । चिद्रत्नांच्या ॥३१८॥

असोनि समीप । उपेक्षिल्या पूर्ण । सूर्या तुजविण । कृष्ण -देवा ॥३१९॥

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।

न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥१४॥

आतां तुझीं वाक्यें । हे चि सूर्य -कर । फांकतां साचार । मदंतरीं ॥३२०॥

महर्षींनीं जे जे । सांगितले मार्ग । आकळले चांग । सर्व हि ते ॥३२१॥

ह्र्दय -भूमींत । पडलें सखोल । ज्ञान -बीज बोल । तयांचे ते ॥३२२॥

तुझिया कृपेचें । लाभतां चि ओल । संवादें सफल । झालें मग ॥३२३॥

अहो नारदादि । संतांच्या ज्या । उत्ति । घोघावत येती । नद्या जैशा ॥३२४॥

तयांलागीं झालों । सागर मी साचा । संवाद -सुखाचा । आज येथें ॥३२५॥

जन्मजन्मान्तरीं । आजवरी येथ । केलें जें सुकृत । सर्वोत्तम ॥३२६॥

तेणें तूं सद्‍गुरु । जोडलासी मज । फळा आलें काज । आज ऐसें ॥३२७॥

वाडवडिलांचे । मुखे तुझे गुण । होते निशि -दिन । येत कानीं ॥३२८॥

परी नोळखिलें । तुझिया स्वरूपा । नव्हती जों कृपा । एक तुझी ॥३२९॥

केले यत्न होती । सदैव सफळ । दैव सानुकूळ । असे जरी ॥३३०॥

तैसें जें आपण । करावें साधन । श्रवण -पठण - । मननादि ॥३३१॥

तयाचा तों घ्यावा । तेव्हां चि प्रत्यय । गुरुकृपा होय । जिये वेळीं ॥३३२॥

करोनियां श्रम । नित्य जिवापाड । माळी जरी झाड । वाढवितो ॥३३३॥

तरी तो वसंत । तया जेव्हां भेटे । तेव्हां चि तें लोटे । फळ -भारें ॥३३४॥

विषम -ज्वरासी । पडतां उतार । गोड तें साचार । गोड लागे ॥३३५॥

तेव्हां चि तें ठरे । रसायन चांग । आरोग्यें सर्वांग । भरे जेव्हां ॥३३६॥

चैतन्य आपण । येवोनियां जरी । शरीरामाझारीं । संचरेल ॥३३७॥

तरी च इंद्रियें । वाचा आणि प्राण । सर्व तीं असोन । सार्थ होती ॥३३८॥

तैसें वेदशास्त्र । जें का अभ्यासिलें । साधन जें केलें । योगादिक ॥३३९॥

तेव्हां चि तें सर्व । सापुलेंसें होय । जेव्हां गुरुराय । कृपा करी ॥३४०॥

येतां प्रत्ययास । श्रीकृष्ण -स्वरूप । पार्थासी अमूप । तोष झाला ॥३४१॥

प्रत्ययाच्या माजें । मग नाचूं लागे । रूप तें निजांगें । निर्धारोनि ॥३४२॥

तेविं म्हणे देवा । बोलिलें जें तुवां । आलें अनुभाव । सर्व हि तें ॥३४३॥

देव -दानवांच्या । बुद्धीसी निश्चय । सर्वथा न होय । त्वद्रूपाचा ॥३४४॥

हें तों निःसंदेह । आकळलें येथें । साच मोक्ष -पते । मजलागीं ॥३४५॥

उपदेशाविण । झालें ज्ञान साच । निज -बुद्धीनें च । आपणातें ॥३४६॥

ऐसें म्हणे कोणी । तरी तें अज्ञान । प्रत्ययें ही खूण । कळों आली ॥३४७॥

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुणोत्तम ।

भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥१५॥

नभें चि जाणावा । नभाचा विस्तार । पृथ्वीचा तो भार । पृथ्वीनें च ॥३४८॥

सर्व सामर्थ्यानें । तैसा तुझा तूं च । ओळखसी साच । आपणातें ॥३४९॥

एर्‍हवीं इतर । वेदादिक सर्व । वायां ज्ञान -गर्व । वाहती ते ॥३५०॥

मनोवेगालागीं । सांडोनियां मागें । पुढें कैसी सांगें । धांव घ्यावी ॥३५१॥

वीत हात वांवा । घालोनियां काय । माप केलें जाय । पवनाचें ॥३५२॥

काय सांगें थोर । झालें बाहू -बल । तरी तरवेल । माया -नदी ? ॥३५३॥

तैसें तुझें ज्ञान । होणें अघटित । म्हणोनि तूं ज्ञात । नाहीं कोणा ॥३५४॥

जाणावया तुज । तुझा तूं समर्थ । कळलें यथार्थ । आतां मज ॥३५५॥

जाणोनियां स्वतः । आपणा आपण । आणिकातें खूण । सांगावया ॥३५६॥

तूं चि एक देवा । समर्थ म्हणोन । तुज विनवून । सांगतों हें ॥३५७॥

माझिया इच्छेच्या । निढळावरील । प्रभो एक वेळ । घाम पूसीं ॥३५८॥

त्रिभुवनरूपी । कुंजरालागोन । होसी पंचानन । तूं चि देवा ॥३५९॥

देव -देवतांसी । साच पूजनीय । स्वरूप तें होय । एक तुझें ॥३६०॥

भूत -भावना तूं । होसी जगन्नाथ । क्षणभरी चित्त । द्यावें आतां ॥३६१॥

तुजपाशीं उभें । रहावयातें हि । मी तों योग्य नाहीं । सर्वथैव ॥३६२॥

म्हणोनियां खेद । वाटे माझ्या मना । ऐसा थोरपणा । तुझा देवा ॥३६३॥

परी भिवोनियां । नच विनवावें । तरी ओळखावें । कैसें तुज ? ॥३६४॥

भरले सागर । पूर्ण चोहींकडे । तरी कोरडे । चातकासी ॥३६५॥

गळतील थेंब । जरी मेघांतून । तरी च तहान । भागे त्याची ॥३६६॥

तैसें गुरु -तत्त्व । सर्वत्र तें साच । परी कृष्णा तूं च । गति आम्हां ॥३६७॥

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥१६॥

असो हें सकळ । तुझ्या विभूति । परी दिव्य -शक्ति - । व्याप्त ज्या ज्या ॥३६८॥

त्या त्या मज आतां । द्याव्या दाखवोनि । ही च विनवणी । पायापाशीं ॥३६९॥

ज्या ज्या विभूतींनीं । समस्त हे लोक । व्यापोनि तूं एक । राहिलासी ॥३७०॥

त्या त्या मुख्य मुख्य । आणि नामांकित । विभूतित प्रकट । करीं देवा ॥३७१॥

कथं विद्यामंड योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ‍ ।

केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥१७॥

कोण्या स्वरूपांत । तुज ओळखून । करावें चिंतन । नित्य तुझें ॥३७२॥

नित्य सर्वांठायीं । तूं च म्हणूं जरी । चिंतन तें तरी । घडे कैसें ? ॥३७३॥

म्हणोनियां पूर्वीं । तुवां सांगितले । भाव जे आपुले । थोडक्यांत ॥३७४॥

ते चि आतां येथें । विस्तारेंकरोन । द्यावे दाखवोन । मजलागीं ॥३७५॥

ज्या ज्या विभूतीचें । करितां चिंतन । सहजें स्मरण । होय तुझें ॥३७६॥

तो तुझा विभूति - । योग विवरोनि । सांगें चक्र -पाणि । मज आतां ॥३७७॥

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।

भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वन्तो नास्ति मेऽमृतम् ‍ ॥१८॥

आणि जगन्नाथा । विभूति -विस्तार । पुसिला साचार । तो हि सांगें ॥३७८॥

तें चि तें सांगावें । किती वारंवार । म्हणसी साचार । जरी ऐसें ॥३७९॥

तरी मनामाजीं । देवा जनार्दना । नको हि कल्पना । येवों देवों ॥३८०॥

सर्वथा प्राकृत । अमृत जें तें हि । म्हणों येत नाहीं । पुरे ऐसें ॥३८१॥

काळकूटाचें जें । होय सहोदर । मृत्यु -भयें सुर । प्राशिती जें ॥३८२॥

तरी हि एका चि । ब्रह्मदेव -दिनीं । लोपती जन्मोनि । चौदा इंद्र ! ॥३८३॥

अम्रुतपणाचा । जया व्यर्थ भास । ऐसा जो का रस । क्षीराब्धीचा ॥३८४॥

तयाची हि गोडी । पुरे झाली जीवा । म्हणवेना देवा । ऐसें कोणा ॥३८५॥

क्षुद्र अमृताचा । ऐसा बडिवार । हें तव साचार । परमामृत ॥३८६॥

मंदराचळाचा । न करितां मंथा । न च घुसळितां । क्षीराब्धीतें ॥३८७॥

अनादि आइतें । सिद्ध स्वयमेव । नव्हे जें का द्रव । नव्हे बद्ध ॥३८८॥

रस -गंधाची तों । नाहीं वार्ता जेथ । स्मरतां चि प्राप्त । कोणातें हि ॥३८९॥

आघवा संसार । होतसे असार । जयातें साचार । ऐकतां चि ॥३९०॥

आणि सर्वश्रेष्ठ । अविनाशपण । ठायीं च संपूर्ण । लाभतसे ॥३९१॥

जन्म -मरणाचा । बोल जो केवळ । जाय तो समूळ । हारपोनि ॥३९२॥

जें का ऐकतां च । वाढूं लागे एक । नित्य ब्रह्मसुख । अंतर्बाह्य ॥३९३॥

करावें सेवन । तें चि ऐसा योग । जरी आला मग । थोर भाग्यें ॥३९४॥

तरी सेवित्यासी । तद्रूपता येत । ऐसें परमामृत । थोर जें का ॥३९५॥

तें तूं आज येथें । पाजितोसी मातें । तरी काय तूतें । पुरे म्हणों ? ॥३९६॥

तुझें नाम तें हि । आवडे आम्हासी । वरी भेटलासी । दैवयोगें ॥३९७॥

तशांत हि तुझा । नित्य सहवास । घडला आम्हांस । आजवरी ॥३९८॥

आतां आम्हांलागीं । आनंदभरांत । ऐसें बोधामृत । पाजिसी तूं ॥३९९॥

सुखाची ह्या गोडी । वर्णवेना मज । अंतरीं सहज । समाधान ॥४००॥

तुझ्या मुखें झाली । होवो पुनरुक्ति । परी त्या विभूति । सांगें मज ॥४०१॥

नभीं प्रतिदिन । उगवे म्हणोन । शिळा म्हणे कोण । सूर्यालागीं ? ॥४०२॥

अग्निनारायणें । नाहीं केलें स्नान । होय का म्हणोन । ओंवळा तो ? ॥४०३॥

वाहे निरंतर । गंगेचें जें तोय । म्हणों ये तें काय । शिळें ऐसें ? ॥४०४॥

तुझ्या मुखें देवा । निघती जे शब्द । मृर्तिमंत नाद - । ब्रह्म तें चि ॥४०५॥

चंदनवृक्षाचें । तुरंबावें फूल । तैसे तुझे बोल । सुगंधित ॥४०६॥

अर्जुनाचें ऐसें । ऐकोनि भाषण । सर्वांगें श्रीकृष्ण । डोलूं लागे ॥४०७॥

म्हणे ऐकावया । हा चि एक पात्र । जाहला सु -क्षेत्र । भक्ति -ज्ञाना ॥४०८॥

प्रिय भक्ताचा तो । पाहोनि संतोष । प्रेम -सिंधु ईश । उचंबळे ॥४०९॥

परी आवरोनि । यत्नें प्रेमावेग । मग तो श्रीरंग । काय बोले ॥४१०॥

श्रीभगवानुवाच --

हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥१९॥

ब्रह्मदेवाचा हि । असोनि तो बाप । आपुला प्रताप । नाठवोनि ॥४११॥

म्हणे पार्था बापा । भलें केलें आज । बोलविलें मज । भक्ति -बळें ॥४१२॥

पार्थालागीं बापा । ऐसें म्हणें देव । नाहीं नवलाव । येथें आम्हां ॥४१३॥

कीं तो नव्हे काय । नंदाचें लेंकरूं । स्वयें जगद्‍गुरु । असोनि हि ॥४१४॥

असो हा विस्तार । आवडीचा भर । म्हणोनि श्रीधर । बोले ऐसें ॥४१५॥

म्हणे आतां ऐकें । सांगतों विभूति । तुवां मजप्रति । पुसिल्या ज्या ॥४१६॥

परी त्या असंख्य । म्हणोनि अर्जुना । मोजतां येती ना । माझा मज ॥४१७॥

आपुल्या शरीरीं । रोम -रंध्रें किती । न होय गणति । ज्याची त्यास ॥४१८॥

तैसा तो अपार । विभूति -विस्तार । म्हणोनि साचार । आकळेना ॥४१९॥

एर्‍हवीं मी कैसा । केवढा हें साच । कळे ना माझें च । मजलागीं ॥४२०॥

तरी मुख्य मुख्य । विख्यात ज्या होती । सांगतों विभूति । त्या चि आतां ॥४२१॥

जैसें मुठीमाजीं । सांपडतां बीज । वृक्षत्व सहज । हाता येतें ॥४२२॥

तैसें तयांचें तों । होतां तुज ज्ञान । होय आकलन । सर्वांचें हि ॥४२३॥

नातरी उद्यान । जरी हाता आलें । येती फळें । स्वभावें चि ॥४२४॥

तैशा ज्या विभूति । जाणतां केवळ । जाणवे सकळ । विश्व तुज ॥४२५॥

एर्‍हवीं विस्तारा । नाहीं माझ्या अंत । सुखे लपे ज्यांत । गगन हि ॥४२६॥

अहमात्मा गुडाकेश सर्वभृताशयस्थितः ।

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥२०॥

तुझिया मस्तकीं । कुरळे हे केंस । शोभती विशेष । गुडाकेशा ॥४२७॥

धनुर्विद्येमाजीं । जणूं त्रि -लोचन । ऐसा तूं प्रवीण । होसी पार्था ॥४२८॥

सुरूप सुधीर । तूं चि नर -वीर । विभूति -विस्तार । ऐक माझा ॥४२९॥

असे आत्मा जो का । प्राणिमात्रीं एक । मी चि तो निःशंक । जाण ऐसें ॥४३०॥

भूतां अंतर्बाह्य । व्यापोनि मी राहें । आदि -अंतीं आहें । मध्यें हि मी ॥४३१॥

मेघांलागीं जैसें । खालींवरी एकं । आकास चि देख । अंतर्बाह्य ॥४३२॥

आणि आकाशीं च होवोनि उत्पन्न । राहती ते जाण । आकाशीं च ॥४३३॥

मग जिये वेळीं । पावती विलय । आकाशीं च लय । होय त्यांचा ॥४३४॥

तैशा रीती मी च । आदि स्थिति अंत । अर्जुना समस्त । भूत -ग्रामा ॥४३५॥

विभूति -योगें हा । व्यापक विस्तार । ऐसा चि साचार । जाण माझा ॥४३६॥

आतां जीवाचे च । करोनियां कान । देईं अवधान । धनंजया ॥४३७॥

ज्ञान हें केलें चि । करावें श्रवण । तें चि तें सांगेन । जरी तुज ॥४३८॥

जाणतां चि एक । स्वरूप व्यापक । कायसें कौतुक । विभूतींचें ॥४३९॥

परी बोलिलों मी । सांगेन म्हणोन । तरी ज्या प्रधान । त्या चि ऐक ॥४४०॥