Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ३१ ते ३४

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्चच्छान्तिं निगच्छति ।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥३१॥

पावेल तो भक्त । मज कालांतरीं । म्हणशील जरी । ऐसें पार्था ॥८०५॥

तरी नित्य करी । अमृतीं जो वास । बाधेल तयास । काय मृत्यु ? ॥८०६॥

जिये वेळीं नाहीं । सूर्याचा उदय । बोलती । समय । रात्रीचा तो ॥८०७॥

माझ्या भक्तिविण । तैसें जें जें होय । तें तें नव्हें काय । महा -पाप ? ॥८०८॥

म्हणोनियां आतां । तयाचिया चित्ता । माझी प्राप्त । होतां । जवळीक ॥८०९॥

पावला तो माझें । तत्त्वतां स्वरूप । राहिला मद्रूप । होवोनियां ॥८१०॥

कोणता आदील । नये ओळखितां । दीपें चि लावितां । दुजा दीप ॥८११॥

तैसा भजे मातें । सर्वस्व मानोन । मी च तो होवोन । ठाके पार्था॥८१२॥

मग नित्य शांति । माझी स्थिति कांति । सर्व हि तीं होती । तया प्राप्त ॥८१३॥

किंबहुना पार्था । माझिया जीवें च । जिवंत । तो साच । राहतसे ॥८१४॥

आतं ऐशापरी । करोनि विस्तार । तें चि वारंवार । किती सांगूं ॥८१५॥

जरी माझी प्राप्ति । इच्छिसी साचार । न पडो विसर । भक्तीचा गा ॥८१६॥

निर्मळ तें कुळ । कासयासी व्हावें । कासया वानावें । कुलीनत्व ॥८१७॥

कासयासी व्यर्थ । पांडित्याची हांव । तारुण्याचा गर्व । कासयासी ॥८१८॥

कां गा मिरवावें । सौंदर्य तें फोल । संपत्तीचा डौल । कासयासी ॥८१९॥

पार्था , जरी नाहीं । एक माझी भक्ति । निष्फळ तीं होती । जाण सर्व ॥८२०॥

दाण्याविण जैसीं । कणिसें फोलट । काय घनदाट । लागोनियां ॥८२१॥

काय करावी ती । सुरम्य नगरी । नसे तेथें जरी । लोकवस्ती ॥८२२॥

एक दुःखी कष्टी । वनीं हिंडे साच । दुजें हि तैसेंच । तया भेटे ॥८२३॥

किंवा सरोवर । आटोनियां गेलें । झाड बहरलें । वांझ फुलीं ॥८२४॥

तैसें कुळ -जाति - । गौरव सकल । वैभव निष्फळ । जाणावें तें ॥८२५॥

आहे सावयव । शरीर तें पाहीं । जीवचि तो नाहीं । परी त्यांत ॥८२६॥

तैसें भक्तिवीण । जळो तें जीवन । भूवरी पाषाण । काय थोडे ? ॥८२७॥

हिंवर -तरूची । दाट छाया झाली । तरी ती वाळिली । सज्जनांनीं ॥८२८॥

तैसें पुण्यजात । धनंयजा जाण । गेलें डावलोन । अभक्तांतें ॥८२९॥

निंब निंबोळ्यांनीं । ओथंबोन आला । सुकाळ तो झाला । कावळ्यांसी ॥८३०॥

तैसा भक्ति -हीन । करंटा केवळ । वाढला सकळ । दोषांशाठीं ॥८३१॥

षड्रस पक्वान्न । खापरीं वाढोन । ठेविलें नेवोन । चव्हाटयांत ॥८३२॥

तरी तें खावोन । टाकिती श्र्वानें च । तैसें जिणें साच । अभक्तांचें ॥८३३॥

अर्जुना , स्वप्नीं हि । सुकृत जो नेणे । आमंत्रिलें तेणें । भव -दुःखां ॥८३४॥

म्हणोनियां कुळ । नसो तें निर्मळ । असो कीं चांडाळ । हीन जाति ॥८३५॥

त्या हि वरी होवो । पशु -देह -प्राप्ति । परी माझी भक्ति । चुकूं नये ॥८३६॥

पाहें गजेंद्रानें । केला माझा धांवा । पाय नक्रें जेव्हां । धरियेला ॥८३७॥

सर्वभावें मज । येतां चि शरण । तया दिलें स्थान । माझ्या ठायीं ॥८३८॥

तयाचें का आलें । पशुत्व तें आड । भक्तीचा पवाड । ऐसा जाण ॥८३९॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां परां गतिम् ‍ ॥३२॥

उच्चारितां ज्यांचीं । नांवें हि वाईट । ऐसे जे कनिष्ठ । पाप -योनि ॥८४०॥

असोत ते मूढ । जैसे का दगड । परी भक्ति द्दढ । माझ्या ठायीं ॥८४१॥

जयांचिये वाचे । माझे चि आलाप । माजें चि स्वरूप । द्दष्टी भोगी ॥८४२॥

माझा चि संकल्प । जयांचें गा मन । वाहे रात्रं -दिन । आवडीनें ॥८४३॥

तेविं माझिया चि । गुण -कीर्तिवीण । ऐकती ना कान । दुजें कांहीं ॥८४४॥

माझी सेवा हें चि । सर्वांगसंपूर्ण । जाहलें भूषण । जयांलागीं ॥८४५॥

जयांलागीं मज । एकाचें चि ज्ञान । जयां नाहीं भन । विषयांचें ॥८४६॥

ऐसी स्थिति होय । तरीच जीवन । ए‍र्‍हवीं मरण । ऐसें वाटे ॥८४७॥

सर्वांपरी ऐसा । जीवनीं आधार । जाहलों साचार । मी चि जयां ॥८४८॥

नसोत ते शास्त्री । किंवा बहुश्रुत । आणि नीच जात । असो त्यांची ॥८४९॥

परी माझ्या संगें । तोलितां ते साच । न्यूनता नाहीं च । तयां ठायीं ॥८५०॥

नरसिंह -रूप । घेतलें ज्यासाठीं । काय वानूं भक्ति । प्रह्लादाची ॥८५१॥

दैत्य -कुळीं जन्म । परी भक्ति -बळें । तेणें लाजविलें । देवांतें हि ॥८५२॥

मनोभावें केली । तयाची हि भक्ति । तरी माझी प्राप्ति । होय तेणें ॥८५३॥

एर्‍हवीं साचार । दैत्य -कुळ तरी । इंद्रास हि सरी । नाहीं त्याची ॥८५४॥

म्हणोनियां येथें । भक्ति एक पुरे । जाति -वर्ण सारें । अप्रमाण ॥८५५॥

असो कातडयाचा । तुकडा च परी । अक्षरें त्यावरी । राजाज्ञेचीं ॥८५६॥

तरी तेणें जोडे । येथें सर्व कांहीं । सोनें रुपें तें हि । गौण ठरे ॥८५७॥

कैसें राजाज्ञेचें । सामर्थ्य तें पाहें । सर्व लाभताहे । तेणें चर्में ॥८५८॥

मनोबुद्धीमाजीं । तैसें सर्वकाळ । संचलें निर्मळ । प्रेम माझें ॥८५९॥

तरी उत्तमत्व । तया झालें प्राप्त । सर्वज्ञ तो होत । स्वभावें चि ॥८६०॥

म्हणोनि उत्तम । कुळ जाति वर्ण । सर्व हि तें जाण । निरर्थक ॥८६१॥

जरी माझ्या ठायीं । द्दढ भाव एक । तरी च सार्थक । जीवनाचें ॥८६२॥

पार्था , असो भाव । कोणता हि मनीं । परी घ्यावें घ्यानीं । माझें रूप ॥८६३॥

ऐशा परी मन । मद्रूप तें होतां । कोण पुसे आतां । जाति -कुळ ॥८६४॥

वहाळ वोहळ । तोंवरी वेगळे । जोंवरी मिळाले । नाहीं गंगे ॥८६५॥

मग गंगेमाजीं । मिळतां ते जाण । राहती होवोन । गंगा -रूप ॥८६६॥

खैर -काष्ठ किंवा । चंदनी लांकून । घडे हि निवड । तोंवरी च ॥८६७॥

जोंवरी तीं सारीं । पडोनि अग्नींत । पावती ना तेथ । अग्नि -रूप ॥८६८॥

स्त्रिया शूद्र वैश्य । क्षत्रिय ह्या जाति । तोंवरी च होती । भिन्न तैशा ॥८६९॥

जोंवरी तीं सर्व । करोनियां भक्ति । पावती ना अंतीं । माझें रूप ॥८७०॥

सागरामाझारी । लवणाचे कण । घालितां विरोन । जाती जैसे ॥८७१॥

तैसीं भावें होतां । मद्रूपी तीं लीन । मग जाति वर्ण । उरे कोठें ? ॥८७२॥

नदी नद पूर्व - । पश्चिम -प्रवाह । हें तों निःसंदेह । तोंवरी च ॥८७३॥

जोंवरी तीं सारीं । सागरीं मिळोन । सागर होवोन । राहिलीं ना ॥८७४॥

कोणें मिषें चित्त । रिघो माझे ठायीं । मद्रूप तें होई । आपोआप ॥८७५॥

लोह परिसासी । गेलें फोडावया । तरी लाभे तया । सुवर्णत्व ॥८७६॥

गोपिकांनीं मज । भावोनियां पति । नाहीं काय प्राप्ति । केली माझी ॥८७७॥

कंस तो हि माझें । धरोनियां भय । झाला नाहीं काय । मद्रूप चि ॥८७८॥

करोनियां वैर । शिशुपालादिकां । मिळाला नाहीं का । माझा लाभ ॥८७९॥

तेविं सोयरीक । जोडोनियां पार्था । माझी सासुज्यता । यादवांसी ॥८८०॥

धरोनि ममत्व । वसुदेवादिक । पावले गा देख । मद्रूपता ॥८८१॥

नारद अक्रूर । ध्रुव माझे भक्त । तयांसी मी प्राप्त । भक्ति -भावें ॥८८२॥

शुक -सनकादिक । घेवोनियां ध्यास । माझिया पदास । पावले गा ॥८८३॥

तैसा काम -भावें । लाभलों गोपींस । भय -भ्रमें कंस । मद्रूप तो ॥८८४॥

शिशुपालादिक । करोनियां वैर । पावले साचार । मद्रूपता ॥८८५॥

प्रपंचीं विरक्ति । किंवा माझी भक्ति । माझ्या ठायीं प्रीति । किंवा वैर ॥८८६॥

कोणत्या हि मार्गें । लागो माझा ध्यास । तरी लाभे त्यास । सासुज्यता ॥८८७॥

म्हणोनियां मातें । पावावया पाहीं । उपायांची नाहीं । वाण येथें ! ॥८८८॥

आणि कोणत्या हि । जातींत जन्मून । करावें भजन । किंवा वैर ॥८८९॥

परी भक्त एक । माझा चि गा व्हावें । वैर हि करावें । माझ्याशीं च ॥८९०॥

कोणें मिषें जडो । माझ्या ठायीं वृत्ति । मद्रूप ते होती । निःसंदेह ॥८९१॥

ह्या चि लागीं वैश्य । शूद्र स्त्रिया कोणी । किंवा पाप -योनि । होती जे का ॥८९२॥

पार्था तयांतें हि । होते माझी प्राप्ति । करोनियां भक्ति । मनोभावें ॥९८३॥

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षस्तथा ।

अनित्यमसुखें लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ‍ ॥३३॥

मग वर्णामाजीं । श्रेष्ठ जे ब्राह्मण । स्वर्ग हें वतन । जयांचें गा ॥८९४॥

मंत्रविद्येलागीं । माहेर जे होती । जे का तपोमूर्ति । भूमि -देव ॥८९५॥

सर्व हि तीर्थाचा । जे का भाग्योदय । अखंड आश्रय । यज्ञांसी जे ॥८९६॥

वेद सुरक्षित । जयांचें गा साच । अभेद्य कवच । लेवोनियां ॥८९७॥

जयांचियां द्दष्टी - । रूप मांडीवर । मांगल्य साचार । वाढतसे ॥८९८॥

जयांच्या आस्थेचें । लाभतां चि ओल । विस्तारला वेल । सत्कर्माचा ॥८९९॥

आणि जयांचिया । संकल्पेंकरोन । सत्यासी जीवन । लाभलें गा ॥९००॥

तेविं जयांचिया । आशीर्वादें भलें । आयुष्य वाढलें । अग्नीचें हि ॥९०१॥

म्हणोनि तयांच्या । प्रीतीसाठीं दिलें । सागरें आपुलें । तोय त्यासी ॥९०२॥

रमादेवीतें हि । सारोनियां दूर । कौस्तुभालंकर । काढोनियां ॥९०३॥

मग पुढें केलें । निज वक्षःस्थळ । लागो पायधूळ । म्हणोनियां ॥९०४॥

आपुलें ऐश्वर्य । करावें जतन । म्हणोनि भूषण । मिरवोनि ॥९०५॥

भृगु ऋषींची ती । पाउलाची खूण । वाहतों अजून । वक्षःस्थळीं ॥९०६॥

काळाग्निरुद्रातें । रहावया घर । ऐसा चि प्रखर । कोप ज्यांचा ॥९०७॥

तेविं अनायासें । सिद्धि येती हात । जयांचा लाभतां । आशीर्वाद ॥९०८॥

ऐसे पुण्यवंत । ब्राह्मण जे थोर । आणिक तत्पर । माझ्या ठायीं ॥९०९॥

पावती ते मातें । आतां धनंजया । सिद्ध करावया । हवें का हें ? ॥९१०॥

जे का चंदनाच्या । ठेले सान्निध्यांत । होती सुगंधित । निंबवृक्ष ॥९११॥

तयांचें हि गंध । उगाळूनि भलें । देवांचीं निढळें । भूषविती ॥९१२॥

मग तो चंदन । न पोंचे त्या स्थानीं । ऐसें कैसें मनीं । धरावें गा ? ॥९१३॥

पोंचे ऐसें म्हणूं । तरी च तें साच । ना तरी नाहीं च । म्हणूं ये का ? ॥९१४॥

शमवाया दाह । मस्तकीं शंकर । वाहे निरंतर । चंद्र -कोर ॥९१५॥

तेथ निवविता । आणिक संपूर्ण । थोर चंद्राहून । सुगंघें जो ॥९१६॥

ऐसा तो चंदन । लीलामात्रें जाण । सर्वांगीं भूषण । कां न व्हावा ? ॥९१७॥

रस्त्यांतील तोय । गंगेचा आश्रय । करोनियां जाय । सागरातें ॥९१८॥

सागरीं तद्रूप । ऐशापरी पाहीं । जरी होय तें हि । अनायासें ॥९१९॥

सागरावांचोन । मग गंगे -प्रति । सांगें अन्य गति । असे काय ? ॥९२०॥

म्हणोनि राजर्षि । आणिक साचार । ब्राह्मण जे थोर । माझे भक्त ॥९२१॥

काया -वाचा -मनें । मी च एक जाण । आश्रयाचें स्थान । जयांलागीं ॥९२२॥

तयां लाभतें च । माझें परं -धाम । मृर्त परब्रह्म । सर्वथा ते ॥९२३॥

अगा , शत छिद्रें । असती ज्या नावे । त्यांत चि बैसावें । लागे जरी ॥९२४॥

तरी कैसें तेथें । रहावें निश्चिंत । दुर्लक्षून पंथ । रक्षणाचा ? ॥९२५॥

शस्त्रांचा वर्षाण । रणीं होय जेथें । हिंडावें का तेथें । उघडें च ? ॥९२६॥

किंवा आदळतां । अंगावरी धोंडे । केवीं ढाल पुढें । करावी ना ? ॥९२७॥

रोगें परिपूर्ण । व्यापितां देहास । औषधीं उदास । रहावें का ? ॥९२८॥

चहूंकडे आग । पेटतां तेथोन । न जावें निघोन । कैसें सांग ? ॥९२९॥

तेविं दुःखरूप । संसारीं जन्मून । कां माझें भजन । करावें ना ? ॥९३०॥

अगा माझी भक्ति । करूं नये ऐसें । काय बळ असे । प्राणियासी ? ॥९३१॥

घराचिया किंवा । भोगांचिया बळें । सांगें काय झाले । निश्चिंत हे ? ॥९३२॥

ना तरी विद्येचें । ह्यांसी बळ थोर । वाटे का आधार । तारुण्याचा ? ॥९३३॥

न करितां भक्ति । व्हावया निश्चिंत । भरंवसा येथ । कोण ह्यांसी ? ॥९३४॥

तरी पार्था जें जें । भोग्यजात देख । तेणें लाभे सुख । देहाचें चि ॥९३५॥

आणि येथें देह । तंव पाहूं जातां । भक्ष्य तें सर्वथा । काळाचें गा ॥९३६॥

नर -देह -रूप । मांडला बाजार । अर्जुना साचार । शेवटील ॥९३७॥

दुःखरूप माल । भरला अमृप । जेथें चाले माप । मरणाचें ॥९३८॥

त्या ह्मा मृत्युलोकीं । जन्मोनि सर्वथा । सुख पाहूं जातां । कैसें लाभे ? ॥९३९॥

फुंकितां राखोंडी । काय दीप लागे । धनंयजा सांगें । मजलागीं ॥९४०॥

अगा विष -कंद । वाटोनियां चाग । सेवावा जो मग । रस त्याचा ॥९४१॥

तया रसा द्यावें । अमृत हें नांव । आणि चिरंजीव । व्हावें जैसें ! ॥९४२॥

ना तरी तोडोनि । मस्तक आपुलें । क्षतीं तें बांधिलें । पायांचिया ॥९४३॥

मृत्यु -लोकांतील । सर्व व्यवहार । तैसा चि साचार । भला देखें ! ॥९४४॥

म्हणोनि ह्या लोकीं । सुखाची कहाणी । पडेल श्रवणीं । ऐसें नाहीं ॥९४५॥

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख -निद्र ? ॥९४६॥

पाहें जिया लोकीं । चंद्र क्षयग्रस्त । उदय तो होत । अस्तासाठीं ॥९४७॥

सुख -प्रावरण । लेवोनियां देख । छळीतसे दुःख । प्राणियासी ॥९४८॥

जेथें मंगळाचा । अंकुर जों फुटे । तों चि सवें भेटे । अमंगळ ॥९४९॥

आणि पोटांतील । गर्भासी हि जेथ । येतसे शोधीत । महा -मृत्यु ॥९५०॥

नाहीं तयाची च । जंव चिंता चाले । तंव तें हि गेलें । हारपोनि ॥९५१॥

आणि केव्हां कोठें । कोणी कैसें नेलें । कांहीं च ना कळे । धनुर्धरा ॥९५२॥

मृत्यू -मुखीं गेलें । न ये परतून । शोधितां कोठून । सांपडावें ॥९५३॥

जेथें निरंतर । मरणाच्या गोष्टी । पुराणें हो होती । तयांचीं च ॥९५४॥

कर्ता ब्रह्मदेव । तयासी हि तंत । ऐसें अशाश्वत । सर्व जेथें ॥९५५॥

जिया मृत्युलोकीं । ऐसी नांदणूक । पावले जे लोक । जन्म तेथें ॥९५६॥

नवल हें कैसें । मज उपेक्षून । निश्चिंत बेभान । राहती ते ! ॥९५७॥

इह -परलोकीं । व्हावया कल्याण । कवडी हि जाण । वेंचिती ना ॥९५८॥

परी जेथें होय । सर्वस्वाची हानि । वेंचिती कोटींनीं । द्र्व्य तेयें ॥९५९॥

भोग -विलासीं जो । राहिला गुंतोन । तया सुखासीन । नांव देती ॥९६०॥

आणि तृष्णा -भार । जयाचा अपार । बोलती तो थोर । ज्ञाता ऐसें ॥९६१॥

जयाचें आयुष्य । राहिलें थोडें च । भळ बुद्धि साच । ओहोटलीं ॥९६२॥

तया वृद्धालागीं । वडील मानोन । वंदिती चरण । तयाचे गा ॥९६३॥

करोनि कौतुक । नाचती आनंदें । जों जों बाळ वाढे । वरिवरी ॥९६४॥

आंतुनी आयुष्य । कमी होत जाई । तिळमात्र नाहीं । खंती त्याची ! ॥९६५॥

जन्मल्यापासून । दिसंदीस जाण । काळाच्या स्वाधीन । होऊं लागे ॥९६६॥

साजरा करिती । परी वाढ -दिन । गुढया उभारून । आनंदानें ॥९६७॥

‘ अगा मर ’ ऐसा । साहती ना बोल । मरतां सकळ । आक्रंदानें ॥९६८॥

ओहटे आयुष्य । जरी क्षणोक्षणीं । घेती ना हें ध्यानीं । मूढपणें ॥९६९॥

मुखीं जैसा सर्पें । धरिला बेडूक । वेंटाळितो देख । माशीलागीं ॥९७०॥

तैसा प्राणियासी । नेणों काय लाभ । आशा तृष्णा लोभ । वाढवोनि ॥९७१॥

पाहोनि व्यवहार । ऐसा उफराटा । अंगावरी कांटा । उभा राहे ॥९७२॥

अरे ! हा ! हा ! ऐशा । मृत्युलोकीं येथ । पार्था , अवचित । जन्मलासी ॥९७३॥

तरी आतां वेगें । झाडोनियां अंग । नीघ नीघ नीघ । बाहेरी तूं ॥९७४॥

भक्ति -पंथा लाग । तेणें चि गा मग । पावसी अव्यंग । रूप माझें ॥९७५॥

मन्मना भव मद्रूक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेविष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥३४॥

इति श्रीमद्भगवद्नीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या - राजगुह्ययोगो नाम

नवमोऽध्यायः ॥९॥

सदा माझे ठायीं । ठेवोनियां मन । करीं तूं भजन । प्रेम -भावें ॥९७६॥

मज एकासी च । नित्या निरंतर । करीं नमस्कार । सर्वांठायीं ॥९७७॥

समूळ संकल्प । टाकावा जाळोन । मदनुसंधान । राखोनियां ॥९७८॥

पार्था , हें चि माझें । निर्मळ यजन । जेणें होय मन । निर्विकल्प ॥९७९॥

संकल्प -विकल्प । जातां आपोआप । सर्वथा मद्रूप । होसील तूं ॥९८०॥

अर्जुना , हें माझें । अंतरींचें गुज । सांगितलें तुज । आज येथें ॥९८१॥

सर्वां हि पासून । निज -गुह्य -ज्ञान । पार्था , लपवून । ठेविलें जें ॥९८२॥

ह्या चि भक्तिपंथें । लाभोनि तें तुज । होशील सहज । सुख -रूप ॥९८३॥

ऐसें बोले भक्त - । काम -कल्पदुम । देव मेघश्याम । परब्रह्म ॥९८४॥

धृतराष्ट्रालागीं । म्हणे तो संजय । घ्यानीं आला काय । संवाद हा ? ॥९८५॥

परी कांहीं केल्या । उठे चि ना म्हैसा । पूरांतून जैसा । नदीचिया ॥९८६॥

वृद्ध धृतराष्ट्र । तैसा स्तब्ध राही । तयासी । तों नाहीं । गोडी तेथें ॥९८७॥

डोलविली मान । संजयें आपुली । म्हणे वृष्टि झाली । अमृताची ॥९८८॥

परी धृतराष्ट्र । असोनि तेथें च । जणूं गेला साच । दूर गांवा ॥९८९॥

कैसा असो परी । आमुचा हा स्वामी । तयासी हें आम्ही । बोलूं जरी ॥९९०॥

तरी वाचेलागीं । लागेल ना दोष । म्हणोनि विशेष । नको आतां ॥९९१॥

काय म्हणूं ह्याचा । ऐसा चि स्वभाव । परी किती दैव । थोर माझें ॥९९२॥

धृतराष्ट्रालागीं । सांगावा वृत्तांत । करोनि निमित्त । हें चि आज ॥९९३॥

जन्म -मृत्युंतून । सोडविलें मज । कैसें मुनिराज । व्यासदेवें ॥९९४॥

ऐसें जंव दीर्घ - । सायासें तो बोले । करोनि आपुलें । द्दढ मन ॥९९५॥

तों चि ते सात्त्विक । भाव प्रकटले । जरी आवरले । नावरती ॥९९६॥

होवोनि चकित । आटूं लागे चित्त । पांगुळली तेथ । वाचा ती हि ॥९९७॥

पायांपासोनियां । मस्तकापर्यंत । झालें रोमांचित । सर्व अंग ॥९९८॥

अर्ध -उन्मीलित । लोचनांमधून । वाहती निघून । आनंदाश्रु ॥९९९॥

उचंबळे सुख । अंतरीं अमूप । म्हणोनियां कंप । शरीरातें ॥१०००॥

रोम -रंध्रांतून । स्वेद -बिदु आले । ल्याला जणुं जाळें । मोतियांचें ॥१००१॥

महा -सुखें ऐसा । भरे अंतःप्रांत । जीवदशा तेथ । आटूं लागे ॥१००२॥

आणि व्यासें आज्ञा । केली जी साचार । तयाचा विसर । पडूं पाहे ॥१००३॥

तों चि पार्थालागीं । बोले चक्रपाणी । तें चि आलें कानीं । घोघावत ॥१००४॥

तेणें घोषें तया । आलें देहभान । टाकिले पुसून । मग । अश्रु ॥१००५॥

सर्वांगाचा घाम । घेतला टिपून । मग उल्हासून । संजय तो ॥१००६॥

धृतराष्ट्रालागीं । म्हणे अवधारा । अहो जी दातारा । संवाद हा ॥१००७॥

संजयाची भुमि । सात्त्विक सुपीक । बीज निवडक । कृष्ण -वाक्य ॥१००८॥

म्हणोनि प्रमेय - । पिकाचा सुकाळ । होईल सकळ । श्रोतयांस ॥१००९॥

अहो श्रोते -जन । सकळ सज्जन । द्यावें अवधान । अळुमाळ ॥१०१०॥

तेणें तुम्ही व्हाल । स्वानंदाचे धनी । लोटलें श्रवणीं । भाग्य आज ॥१०११॥

म्हणोनि दावील । विभूतींचा ठाव । सिद्धांचा तो राव । अर्जुनासी ॥१०१२॥

ती च कथा ऐका । धरोनियां भाव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥१०१३॥

इति श्री स्वामी स्वरूपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग - ज्ञानेश्वरी

नवमोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।