Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक २२ ते ३०

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥२२॥

मग कोसळो का । मेरुहुनि थोर । दुःखाचा डोंगर । देहावरी ॥७०७॥

तया योगियाचें । तरी पार्था चित्त । भारें नाहीं जात । दडपोनि ॥७०८॥

आणि शरीराचा । होवो शस्त्रेम घात । अथवा आगींत । सांपडो तें ॥७०९॥

योगियाचें चित्त । महा -सुखीं लीन । म्हणोनियां भान । नाहीं त्याचें ॥७१०॥

ऐसा आत्मरुपीं । होतां चि निमग्न । देहाचें स्मरण । तया कैचें ॥७११॥

पार्था , ब्रह्मसुख । आगळें तो पावे । म्हणोनि नाठवे । दुजें कांहीं ॥७१२॥

तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ‍ ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥२३॥

संसारीं जें मन । राहिलें गुंतून । वासना घरोन । नानाविध ॥७१३॥

ब्रह्मसुखाची ह्या । लागतां चि गोडी । सर्वथा तें सोडी । इच्छाजात ॥७१४॥

ब्रह्मसुख जें का । योगाचें सौंदर्य । राज्य जें का होय । संतोषाचें ॥७१५॥

जयासाठीं व्हावी । ज्ञानाची जाणीव । लागे सावयव । देखावें तें ॥७१६॥

योगाभ्यासें मग । देखतां तें मूर्त । द्रष्टयातें हि येत । तद्रूपता ॥७१७॥

संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य्त समन्ततः ॥२४॥

तरी तो चि योग । एके परी सोपा । दावितां संकल्पा । पुत्र -शोक ॥७१८॥

निमाले विषय । ऐसें आइकेल । इंद्रियें देखेल । नियंत्रित ॥७१९॥

तरे संकल्पाची । फुटोनियां छाती । मुकेल तो अंतीं । जीवित्वासी ॥७२०॥

प्राप्त होतां ऐसी । विरक्ति साचार । सरे येरझार । संकल्पाची ॥७२१॥

शनैःशनैरुपरमेद्‌बुध्द्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ‍ ॥२५॥

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ‍ ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ‍ ॥२६॥

ऐशापरी होतां । बुद्धि धैर्ययुक्त । अनुभव -पंथ । मना दावीं ॥७२३॥

आणि तयालागीं । आत्म -भुवनांत । करीं प्रस्थापित । हळुहळू ॥७२४॥

ह्या हि एके रीती । ब्रह्म -प्राप्ति आहे । विचारोनि पाहें । धनुर्धरा ॥७२५॥

न घडे हें तुज । तरी पार्था ऐक । सुलभ आणिक । दुजी रीत ॥७२६॥

केला जो निश्चय । न तो ढळूं द्यावा । हा चि नेम घ्यावा । जीवंभावें ॥७२७॥

येणें चित्तालागीं । जरी आलें स्थैर्य । तरी झालें कार्य । स्वभावें चि ॥७२८॥

नाहीं तरी द्यावें । मोकळें सोडून । नये आवरुन । धरुं त्यासी ॥७२९॥

हिंडेल तें स्वैर । मग जेथें जेथें । तेथोनि मागुतें । परतेल ॥७३०॥

निश्चयें चि ऐसें । लागोनि वळण । स्थिरावेल जाण । अंतर्यामीं ॥७३१॥

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ‍ ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ‍ ॥२७॥

स्थिरावतां ऐसें । मग आपोआप । स्वरुपासमीप । येईल तें ॥७३२॥

आत्म -स्वरुपाची । होतां तया भेट । बुडेल तें द्वैत । अद्वैतांत ॥७३३॥

स्वरुपीं तद्रूप । होतां चि सहजें । विश्व ऐक्य -तेजें । प्रकाशेल ॥७३४॥

आकाशीं जें अभ्र । दुजेपणें होतें । जातां विरोनि तें । आकाशीं च ॥७३५॥

मग जैसें पार्था । सर्वत्र एकलें । स्वभावें कोंदलें । आकाश चि ॥७३६॥

तैसें लया जातां । चित्त चैतन्यांत । होतसे समस्त । ब्रह्मरुप ॥७३७॥

ब्रह्मप्राप्तीचें हें । सुलभ साधन । सांगितलें जाण । धनंजया ॥७३८॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्श्मत्यन्तं सुखमश्नुते ॥२८॥

पार्था , संकल्पाची । सकळ संपत्ति । सर्वथा परती । ठेवोनियां ॥७३९॥

सहज सुगम । ऐसा योग -पंथ । चोखाळोनि मुक्त । झाले बहु ॥७४०॥

योगस्थितीचें ह्या । ओळखोनि मर्म । सुखें परब्रह्म । पावले ते ॥७४१।

जैसें जळालागीं । भेटतां लवण । जळातें सांडोन । राहूं नेणे ॥७४२॥

तैसा परब्रह्मीं । होतां योगी लीन । जाय विसरोन । भिन्नत्वासी ॥७४३॥

विश्वासंर्गे तया । ऐक्यमंदिरांत । दिसे लखलखाट । स्वसुखाचा ॥७४४॥

अर्जुना , आपुले । पाठीवरी साच । आपुले पायीं च । चालावें गा ॥७४५॥

ऐर्से अवघड । वाटलें हें देख । तरी दुजें ऐक । सांगेन तें ॥७४६॥

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥

यो मां पश्यति सर्वत्र सर्व च मयि पश्यति ।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥

माझ्या ठायीं सर्व । सर्वा देहीं मीच । संदेह नाहीं च । येथें कांहीं ॥७४७॥

पार्था , मी विश्वांत । विश्व तें माझ्यांत । ऐसें ओतप्रोत । संचलें गा ॥७४८॥

परी हा चि व्हावा । बुद्धीचा निश्चय । सुलभ ही सोय । सांगितली ॥७४९॥

एर्‍हवीं जो कोणी । सर्वाभोतीं मातें । भजे अभिन्नातें । ऐक्य -भावें ॥७५०॥

आणि भूतांचिया । भेदें अंतरांत । उपजे ना द्वैत । जयाचिया ॥७५१॥

धनंजया , ऐसें । माझें पूर्णपणे । एकत्व चि जाणे । सर्वत्र जो ॥७५२॥

मग माझ्याशीं तो । एकरुप आहे । वायां बोलोनि हें । काय सांगूं ॥७५३॥

एर्‍हवीं हें नाहीं । दाविलें बोलोन । तरी हि तो जाण । मीच आहे ॥७५४॥

दीपाचा प्रकाश । आणिक तो दीप । दोन्ही एकरुप । होती जैसीं ॥७५५॥

तैसा तो पुरुष । राहे माझ्या ठायीं । आणि असें मी हि । तयामाजीं ॥७५६॥

जोंवरी उदक । तोंवरी तो रस । किंवा अवकाश । आकाशीं तो ॥७५७॥

माझिया स्वरुपें । तैसा रुपवान् ‍ । पुरुष तो जाण । धनंजया ॥७५८॥