Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १ ते १०

संजय उवाच ---

तं तथा कृपयाऽऽविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ‍ ।

विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥

मग रायालागीं । म्हणे तो संजय । पुढें झालें काय । ऐकें आतां ॥१॥

रणांगणीं पार्थ । ऐशापरी खिन्न । होवोनि रुदन । करुं लागे ॥२॥

उपजला चित्तीं । मोह विलक्षण । सर्व आप्तजन । देखोनियां ॥३॥

तेणें त्याचें चित्त । द्रवोनियां गेलें । जलें पाझरलें । जैसें मीठ ॥४॥

हृदय सधीर । परी विरमलें । वातें झळंबलें । अभ्र जैसें ॥५॥

किंवा राजहंस । कर्दमीं रुतावा । मग तो दिसावा । म्लान -मुख ॥६॥

तैसा दिसे पार्थ । अति कोमेजला । कारुण्यें व्यापिला । म्हणोनियां ॥७॥

देखोनि तो ऐसा । महा -मोहें ग्रस्त । तयासी श्रीकांत । काय बोले ॥८॥

श्रीभगवानुवाच ---

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ‍ ।

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२॥

म्हणे पार्था आधीं । करी तूं विचार । येथें हा आचार । योग्य काय ॥९॥

कोण तूं गा काय । करिसी हें येथें । काय झालें तूतें । सांगें मज ॥१०॥

कशासाठीं खेद । तुज उणे काई । करुं जातां कांहीं । राहिलें का ? ॥११॥

न देसी तूं चित्त । अयोग्य गोष्टीसी । धीर ना सोडिसी । कदा काळीं ॥१२॥

नाम तुझें मात्र । ऐकोनि साचार । होतें दिशापार । अपयश ॥१३॥

शौर्याचा तूं ठाव । क्षत्रियांत राव । युद्धीं तुझें नांव । तिन्हीं लोकीं ॥१४॥

निवात -कवच । मारिलें असुर । जिंकिला शंकर । संग्रामीं तूं ॥१५॥

झाले तुजपुढें । गंधर्व बापुडे । पौरुष चोखडें । ऐसें तुझें ॥१६॥

काय सांगूं तुझ्या । प्रभावाचें मान । त्रैलोक्य हि सान । वाटतसे ॥१७॥

तो तूं आज येथें । सांडोनियां शौर्य । रडतोसी काय । अधोमुख ॥१८॥

पाहें तूं अर्जुन । तुज आकळून । करावें का दीन । कारुण्यानें ? ॥१९॥

सूर्यातें अंधार । ग्रार्सील का वीरा । भिईल का वारा । मेघालागीं ॥२०॥

किंवा अमृतासी । आहे का मरण । अग्नीतें सर्पण । गिळी काय ? ॥२१॥

संसर्गाची बाधा । होवोनि मरेल । काय हालाहल । सांगें मज ॥२२॥

किंवा मिठानें का । पाणी पाझरेल । बेडूक गिळील । भुजंगासी ॥२३॥

सिंहाशी जंबूक । कैसा झगडेल । ऐसें का घडेल । अघटित ॥२४॥

अघटितासी ह्या । परी साचपणा । आज तूं अर्जुना । आणिलासी ! ॥२५॥

पार्था , अजूनी हि । धरोनियां धीर । तोडीं हा सत्वर । मोह -पाश ॥२६॥

होई सावधान । सांडीं मूर्खपण । ऊठ चाप -बाण । सज्ज करीं ॥२७॥

नको नको ऐसें । रणीं हें कारुण्य । आहेस तूं सुज्ञ । धनुर्धरा ॥२८॥

करोनि विचार । सांगें धनंजया । संग्रामीं ही दया । योग्य काय ॥२९॥

येणें इहलोकीं । तुझा दुर्लौकिक । आणि परलोक । अंतरेल ॥३०॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परतप ॥३॥

तरी नको शोक । पुरा धरीं धीर । पार्थासी श्रीधर । ऐसें बोले ॥३१॥

आप्तांसाठीं खेद । करावा रणांत । नव्हे हें उचित । तुजलागीं ॥३२॥

लोपेल तें येणें । जोडलें बहुत । आतां तरी हित । विचारीं गा ॥३३॥

हें तों रणांगण । पार्था घेई चित्तीं । येथें दया -वृत्ति । कामा नये ॥३४॥

आतां चि हे काय । सोयरे दिसावे । नव्हतें का ठावें । आधीं तुज ॥३५॥

काय नव्हतासी । ओळखीत ह्यांसी । वायां कां करिसी । अतिरेक ॥३६॥

जन्मोनियां तुज । युद्धाचा प्रसंग । आतां चि का सांग । आला येथें ॥३७॥

तुम्हां एकमेकां । युद्धाचें निमित्त । असे सदोदित । धनंजया ॥३८॥

तरी नेणों तुज । आतां काय झालें । कैसें उपजलें । कारुण्य हें ॥३९॥

परी पार्था हें तों । कृत्य अनुचित । ऐसें चि निश्चित । वाटे मज ॥४०॥

गुंततां मोहांत । ऐशापरी देख । लाभला लौकिक । दुरावेल ॥४१॥

इह -परलोक । दोन्ही अंतरोनि । होईल निदानीं । अकल्याण ॥४२॥

युद्धीं हृदयाचें । ऐसें ढिलेपण । अधःपात जाण । क्षत्रियांसी ॥४३॥

नाना परी ऐसें । प्रभु कृपावंत । असे शिकवीत । पार्थालागीं ॥४४॥

ऐकोनि हे बोल । पार्थ काय म्हणे । इतुकें बोलणें । नको देवा ॥४५॥

अर्जुन उवाच ---

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।

इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥४॥

प्रभो , आधीं तूं चि । करीं हा विचार । असे का साचार । संग्राम हा ॥४६॥

नव्हे नव्हे युद्ध । हा तरी प्रमाद । आचरितां बाध । दिसे येथें ॥४७॥

हें तों थोरांचिया । उच्छेदाचें कृत्य । ओढवलें सत्य । आम्हांवरी ॥४८॥

माता -पितरांची । करावी कीं सेवा । तयां तोष द्यावा । सर्वापरी ॥४९॥

परी सांगें देवा । तयांसी मागुतें । आपुल्या चि हातें । वधावें का ? ॥५०॥

करावें वंदन । संतसज्जनांतें । पूजावें तयांतें । घडे तरी ॥५१॥

परी हें सांडोनि । स्व -मुखें गोविंदा । केविं त्यांची निंदा । करावी गा ॥५२॥

पाहें कुलगुरु । तैसे हे आमुचे । पूजनीय साचे । नित्य आम्हां ॥५३॥

भीष्मद्रोणांचा कीं । अत्यंत मी ऋणी । मज ही करणी । नये मना ॥५४॥

स्वप्नांत हि ज्यांचें । चिंतिले वा वैर । प्रत्यक्ष ते ठार । करुं कैसे ॥५५॥

आजवरी आम्हीं । केला जो अभ्यास । वधोनियां ह्यांस । मिरवावा ॥५६॥

ऐसें सर्वानीं च । योजिलें कां मनीं । बरवें त्याहूनि । मरण हि ॥५७॥

तूं चि पाहें देवा । द्रोणाचा मी चेला । तेणें शिकविला । धनुर्वेद ॥५८॥

त्या चि उपकारें । होवोनि आभारी । तयाच्या जिव्हारीं । घाव घालूं ? ॥५९॥

ज्याचिया कृपेनें । व्हावी वर -प्राप्ति । त्याचा घात चित्तीं । धरावया ॥६०॥

प्रभो सांगें मी का । असें भस्मासुर । मज हा विचार । साहवेना ! ॥६१॥

गुरुनहत्वा हि महानुभावान् ‍ श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।

हत्वाऽर्थकामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ‍ ॥५॥

पाहें सागरातें । बोलती गंभीर । तो हि वरवर । दिसे तैसा ॥६२॥

परी नव्हे तैसें । द्रोणाचें अंतर । प्रशांत गंभीर । असे नित्य ॥६३॥

पाहतां नभासी । अंत पार नाहीं । वरी तयातें हि । मोजवेल ॥६४॥

द्रोणाचें हृदय । परी गूढ चांग । सर्वथा अथांग । दिसे आम्हां ॥६५॥

काळाचिया ओघीं । वज्र हि फुटेल । अवीट । अमृत हि ॥६६॥

परी नित्य शांत । ह्याची मनोवृत्ति । चळे ना कल्पान्तीं । क्षोभवितां ॥६७॥

माउलीची माया । साच वाखाणिती । परी कृपा -मूर्ति । द्रोणाचार्य ॥६८॥

पार्थ म्हणे कीं हा । दयेचें माहेर । गुणांचें भांडार । सकल हि ॥६९॥

तेवीं चि अपार । विद्येवा सागर । ऐशा परी थोर । महात्मा हा ॥७०॥

वरी आम्हांलागीं । होय कृपावंत । सांगें ह्यासी घात । चिंतावा का ? ॥७१॥

ऐसियांतें रणीं । करोनियां ठार । भोगावें अपार । राज्य -सुख ॥७२॥

नको नको हें तों । नये माझ्या मन । त्याहुनी जीवना । लागो आग ! ॥७३॥

ऐसें हें दुर्घट । ह्याहुनी हि श्रेष्ठ । भोग झाले प्राप्त । जरी मज ॥७४॥

तरी ते जळोत । नको त्यां वा संग । स्वीकारावें चांग । भिक्षा -पात्र ॥७५॥

किंवा देश -त्याग । करोनियां जावें । आनंदें रहावें । वनांतरीं ॥७६॥

परी आतां केला । निर्धार अंतरीं । शस्त्र ह्यांच्यावरी । धरुं नये ॥७७॥

प्रभो नव्या तीक्ष्ण । धारेच्या बाणांनीं । ह्यांच्या मर्मस्थानीं । प्रहारोन ॥७८॥

ऐसे रक्तामाजीं । बुडाले जे भोग । ते चि घ्यावे मग । शोधोनियां ॥७९॥

तरी सांगें कृष्णा । माखले रक्तानें । काढोनि ते कोणें । सेवावे गा ॥८०॥

करिसी युद्धाचें । तूं जें समर्थन । पटे ना तें जाण । ह्या चि साठीं ॥८१॥

ऐसें तिये वेळीं । बोलिला अर्जुन । म्हणे अवधान । देई देवा ॥८२॥

ऐकोनि तें नाहीं । देवासी मानलें । तेणें मन भ्यालें । पार्थाचें हि ॥८३॥

म्हणोनि तो पुन्हां । म्हणे दयाघना । कां हो चित्त द्याना । माझ्या बोला ॥८४॥

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।

यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्टाः ॥६॥

माझ्या मनांतील । मी तरी साचार । कथिला विचार । तुम्हांलागीं ॥८५॥

ह्या हि वरी आतां । असेल उचित । तरी तें समस्त । जाणां तुम्हीं ॥८६॥

प्राणान्तीं हि ज्यांशीं । धरावें ना वैर । ते उभे समोर । झुंजावया ॥८७॥

ह्यांते वधावें कीं । अव्हेरोनि जावें । दोहोंत बरवें । नेणों आम्ही ॥८८॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।

यच्छ्रेयः स्यान्निश्वितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ‍ ॥७॥

मोहानें व्याकुळ । झालें माझें चित्त । सुचेना उचित । पाहतां हि ॥८९॥

दृष्टींतील तेज । लोपतें सर्वथा । नेत्रीं सारा येतां । नेत्र -रोगें ॥९०॥

मग समीप हि । असोनि पदार्थ । दृष्टी असमर्थ । देखावया ॥९१॥

तैसे माझें मन । झालें भ्रांति -ग्रस्त । आतां जें स्व -हित । तें हि नेणें ॥९२॥

तरी तुवां देवा । करोनि विचार । सांगावें साचार । भलें तें चि ॥९३॥

आमुचा तूं सखा । आमुचें सर्वस्व । गुरु बंधु देव । आमुचा तूं ॥९४॥

तूं चि माता पिता । तूं चि आम्हां त्राता । संकटीं रक्षिता । सर्व काळ ॥९५॥

करुं नेणे गुरु । शिष्याचा अव्हेर । नदोतें सागर । त्यजी केविं ॥९६॥

सोडोनियां जातां । अपत्यातें माय । कैसी गति होय । सांगें कृष्णा ॥९७॥

सर्वा परी तैसा । आम्हांसी आधार । प्रभो निरंतर । तूं चि एक ॥९८॥

आणि जरी माझें । मागील बोलणें । तुजलागीं माने । ऐसें नाहीं ॥९९॥

तरी जें उचित । धर्मशास्त्राधारें । झणीं तें मुरारे । सांगें मज ॥१००॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् ‍ यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ‍ ।

अत्राप्य भूमावस पत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ‍ ॥८॥

सकळ हें कुळ । देखोनि ह्या वेळां । खेद उपजला । मानसीं जो ॥१०१॥

न जाय आणिकें । प्रभो हृषीकेशा । तुझ्या उपदेशा -वांचोनि तो ॥१०२॥

पृथ्वीचें साम्राज्य । जरी हातीं आलें । किंवा प्राप्त झालें । इंद्र -पद ॥१०३॥

तरी न फिटेल । अंतरींचा मोह । अल्प हि संदेह । नसे येथें ॥१०४॥

भाजलेलें बीज । सुक्षेत्रीं पेरिलें । रुजे ना तें भलें । शिंपिलें हि ॥१०५॥

आयुष्यान्तीं व्यर्थ । दिव्यौषधें जेविं । एकचि वांचवी । परमामृत ॥१०६॥

तैसें राज्य -भोग संपत्ति वैभव । मज सर्वथैव । अर्थहीन ॥१०७॥

येथें दयानिधे । तुझ्या कृपेविण । बुद्धीसी जीवन । दुजें नाहीं ॥१०८॥

ऐका , तो अर्जुन । । ऐसें क्षणभरी । बोले भानावरी । येवोनिया ॥१०९॥

भ्रांति -लहरीनें । मग पुन्हां तेथें । व्यापिलें पार्थातें । पूर्ववत् ‍ ॥११०॥

नव्हे ती लहरी । वाटतें निराळें । डंखिला तो व्याळें । महा -मोहें ॥१११॥

हृदय -कमळ । हें चि मर्म -स्थळ । तेविं सांजवेळ । कारुण्याची ॥११२॥

तेथें दंश झाला । कारुण्याच्या भरीं । म्हणोनि लहरी । ओसरे ना ॥११३॥

मोहरुपी काळ - । सर्पाचें तें विष । दाहक विशेष । जाणोनियां ॥११४॥

जयाचिया कृपा - । कटाक्षेंकरुन । जाय हारपून । विष -बाधा ॥११५॥

घाली भक्ताचिया । हांकेसवें उडी । ऐसा तो गारुडी । ठाके तेथें ॥११६॥

कैसा शोकाकुल । अर्जुनाशेजारीं । सांवळा श्रीहरि । शोभतसे ॥११७॥

होवोनि कृपाळ । आतां तो गोपाळ । तयासी रक्षील । लीलामात्रें ॥११८॥

ह्या चि साठीं पार्थ । मोह -फणि -ग्रस्त । ऐसें मी यथार्थ । उल्लेखिलें ॥११९॥

असो , तो अर्जुन । महा -मोहें व्याप्त । मेघें आच्छादित । सूर्य जैसा ॥१२०॥

मग रानींवनीं । लागोनि वणवा । पर्वत पेटावा । ग्रीष्म -काळीं ॥१२१॥

देखोनियां पार्थ । तैसा शोकाकुळ । वोळला गोपाळ । महा -मेघ ॥१२२॥

शोभला सहज । भला नीलवर्ण । जो कीं जलपूर्ण । कृपामृतें ॥१२३॥

दिव्य दंतप्रभा । तीच सौदामिनी । गंभीर जी वाणी । गर्जना ती ॥१२४॥

होतां कृपावृष्टी । तेणें कैसा शांत । होईल पर्वत । पार्थरुपी ॥१२५॥

मग तेथें कैसा । नवा जोरदार । ज्ञानाचा अंकुर । विरुढेल ॥१२६॥

ती च कथा आतां । ऐका शांतिचित्तें । म्हणे श्रोतयांतें । ज्ञानदेव ॥१२७॥

संजय उवाच ---

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः ।

न योत्स्य इति गोवोन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥९॥

संजय तो म्हणे । ऐक राया तेथ । मग पुन्हां पार्थ । काय बोले ॥१२८॥

पावोनियां खेद । म्हणे श्रीकृष्णातें । नका घालूं मातें । भीड आतां ॥१२९॥

कांहीं होवो परी । नाहीं झुंजणार । अढळ निर्धार । हा चि माझा ॥१३०॥

ऐसे एक वेळ । उच्चारोनि शब्द । राहिला तो स्तब्ध । मग तेथें ॥१३१॥

देखोनियां स्तब्ध । ऐसा धनंजय । वाटला विस्मय । कृष्णालागीं ॥१३२॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥१०॥

आपुलिया मनीं । मग ऐसें म्हणे । काय हें अर्जुनें । आरंभिलें ॥१३३॥

सर्वथैव कांहीं । नेणे धनंजय । करावा उपाय । काय आतां ॥१३४॥

पडोनि उमज । आतां कैशा रीती । पार्थ धैर्यवृत्ति । स्वीकारील ॥१३५॥

पंचाक्षरी जैसें । बांधी अनुमान । पिशाच्च तें कोण । बाधे कैसें ॥१३६॥

नातरी असाध्य । देखोनियां व्याधि । योजी दिव्यौषधि। वैद्य जैसा ॥१३७॥

जी का परिणामीं । टाळोनि मरण । अमृतासमान । जीववील ॥१३८॥

तैसें श्रीअनंत । अंतरीं योजित । जेणें रणीं पार्थ । भ्रांति सांडी ॥१३९॥

मग तो चि मनीं । धरोनि उद्देश । रोषें हृशीकेश । बोलूं लागे ॥१४०॥

बालकातें माय । रागें बोले तरी । झांकलें अंतरीं । प्रेम जैसें ॥१४१॥

वरी ओषधाचें । दिसे कडूपण । परी देई गुण । अमृताचा ॥१४२॥

तैसें वरीवरी । पाहतां कठोर । परी हितकर । परिणामीं ॥१४३॥

आतां सावधान । ऐका श्रोतेजन । रसाळ भाषण । गोविंदाचें ॥१४४॥