Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 28

इंद्राने त्या पवित्र अस्थी त्वष्ट्याच्या स्वाधीन केल्या. त्वष्ट्याने त्या अस्थींच्या मध्ये हृदय बसवून एक वज्रदेह तयार केला. ते अभंग वज्र देवेन्द्राने हातात घेतले. सा-या त्रिभुवनाची शक्ती हातात आल्याप्रमाणे त्याला वाटले. देवांना आनंद झाला. मानव आशेने अंथरुणात आनंदले.

वृत्राला त्या महान यज्ञाची वार्ता कळली होती. दधीचींच्या जीवनार्पणाची वार्ता कळली होती. त्याला आनंदच होत होता. ईश्वराने ज्या कार्यासाठी पाठविले ते आता पुरे होणार व जगात यज्ञतत्त्व जिवंत आहे हे कळून ईश्वराला आनंद होणार, असे मनात येऊन वृत्र नाचू लागला. त्याला स्वतःचे मरण दिसत होते; परंतु त्या मरणाबरोबरच कर्तव्यपूर्ती होणार होती. जगाच्या रंगभूमीवरील त्याची भूमिका समाप्त होणार होती. मग मरणाचे काय दुःख?

दधीचींच्या पुण्यमय देहातील अस्थींचे ते वज्र आपणांवर फेकले जाणार, या कल्पनेने वृत्र सुखावला होता. येऊ दे ते पवित्र वज्र. प्रेममय वज्र. ते मी माझ्या हृदयावर घेईन. माझ्या प्राणपुष्पांनी त्याची पूजा करीन. ते वज्र घेताच त्याच्यासमोर मी विलीन होईन. ईश्वरात मिळून जाईन.

इंद्र व वृत्र यांचे पुन्हा युद्ध सुरू झाले. इंद्राने वृत्राला आव्हान केले व तो म्हणाला, “वृत्रा, असुरा, अधमा, आता तुझी धडपड नाही. तुला आता कोण वाचवणार, कोण सांभाळणार ? त्रिभुवनाला जो गांजतो, त्याला कोण आश्रय देणार ? सर्वांना छळणा-या पाप्याला शेवटी आधार नाही, आश्रय नाही, स्वतःच्या पापाने तू मर. तयार हो, इष्ट देवतेचे स्मरण कर. आपल्या आईबापांचे स्मरण कर. हे पहा वज्र आले, पवित्र अस्थींचे तेजस्वी वज्र, सावध रहा.” 

वृत्र म्हणाला, “देवेन्द्रा, मी याच क्षणाची वाट पाहत होतो. त्या थोर महात्म्याच्या अस्थींच्या स्पर्शाने मला मरण यावे, याहून भाग्य ते कोणते ? हा साक्षात परमेश्वराचा स्पर्श आहे. मला मरण नाही येणार, मी विलीन होईन. मी स्वीकारलेली कठोरता वितळून जाईल. येऊ दे ते वज्र, येऊ दे त्या महापुरुषाचे महान हृदय. त्या हृदयकमलाचा स्पर्श होताच माझे हृदयकमल उघडेल. मी माझ्या प्राणांनी त्या पवित्र हृदयाची पूजा करीन. त्या पवित्र हृदयाचा स्पर्श व्हावा, म्हणून मी किती दिवस अधीर झालेलो आहे. माझ्या हृदयकपाटात कोंडून ठेवलेल्या त्या तेजःप्रसवा धेनु त्याही बाहेर येण्यास अधीर आहेत. माझ्या हृदयाजवळ मी त्यांना ठेवले होते. आता माझे हृदय उघडेल व त्या धेनू बाहेर येतील. चराचराला पुन्हा तेजःस्नान घालतील, तेजःपान घडवतील. त्या गाई व तो गोपाळ सुखरूप आहेत माझ्या हृदयदुर्गात. फेक ते वज्र, सोड ते वज्र. या असुराच्या देहाला मोक्ष दे. मी उद्धरून जाईन.”