Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 14

“करीन. करीन. जा आता तुम्ही.”

“आता तू खरी इंद्राणी, शुचिव्रता, शचीराणी.”

इंद्र निघून गेला. शचीराणी निरोप देऊन परत आली व प्रार्थना करीत बसली. इंद्राची व वृत्राची शेवटी लढाई सुरू झाली. तेहेतीस कोटी देव एका बाजूला व एकटा वृत्र एका बाजूला. परंतु वृत्र हरेना. ‘आ’ पसरून वृत्र धावत येई व वातध्वस्त मेघाप्रमाणे देवांची वाताहत होई. तो क्षणात सूक्ष्म होई, क्षणात आकाश व्यापून राही. अग्निदेव प्रचंड ज्वालांनी त्याला जाळायला जाई; परंतु वृत्राला काही होत नसे. झंझावत वायुदेव सोडी; परंतु वृत्र जागचा हालत नसे. वृत्र आगीने जळेना, पाण्याने भिजेना; वा-याने हालेना. सारे देव हतबल झाले, हतबुद्ध झाले. देवेन्द्राने आपले नाना रंगी धनुष्य हाती घेतले. प्रखर बाण त्याने सो़डले; परंतु वृत्राला ती पुष्पांची वृष्टी वाटे. इंद्राने सोडलेले प्राणघेते बाण वृतासुर काटक्यांप्रमाणे मोडी व फेकून देई. शेवटी इंद्राने ते वज्र हाती घेतले. सारे त्रिभुवन डळमळू लागले; परंतु वृत्र निर्भयपणे उभा होता. ते वज्र चेंडूप्रमाणे झेलण्यासाठी उभा होता.  इंद्राचे डोळे रागाने इंगळासारखे लाल झाले होते. सोसाट्याचा वारा सुटला. अग्नी ज्वाळांनी ब्रह्माण्ड जाळायला उभा राहिला. इतर देवांचेही प्रयत्न सुरू झाले. इंद्राने क्रोधाने पाहिले. वृत्रासुराचे वक्षस्थल लक्षून ते वज्र सोडले गेले. तो जळजळीत लोखंडी गोळा कडाडत चालला. चराचराच्या कानठळ्या बसल्या. मृतवत पडलेली मुले आयांच्या अंगाला अधिकच एकदम बिलगली.

प्रलयकाल ओढवला असे सर्वांस वाटले; परंतु तो वृत्र उभा होता. प्रचंड घोष करीत वज्र आले. ‘हतस्त्वं पाप जाल्म’ अशी तेहतीस कोटी देवांनी वीरघोषणा केली. वृत्रानेही गर्जना केली. त्याने दंड थोपटले. एक हात त्याने पुढे केला. तो जाळणारा गोळा आपल्या बचकेत तो धरणार होता. आले, वज्र आले. जवळजवळ आले. देवांची हृदये आशा-निराशेने खाली–वर होत होती. वृत्र मरणार की मारणार ?

पकडले, वृत्राने ते प्रचंड वज्र पकडले. त्याने त्याचे शेकडो तुकडे केले. ते तुकडे त्याने दशदिशांत भिरकावले. ते इकडे पर्वतांचा निःपात करते झाले. तारांचा चुरा करते झाले. वज्र मोडून तोडून वृत्राने प्रचंड हाक फोडली, “आलो, देवेन्द्रा! आलो. सावध रहा. पळू नको आता. पाठ नको दाखवूस. आलो!” असे गर्जत व प्रचंड जबडा पसरून वृत्र धावला. इंद्र पळू लागला. सारे देव पळू लागले. इंद्राच्या पाठोपाठ वृत्र येत होता. इंद्र शेवटी शचीराणीच्या अंतःपुरात शिरला. शचीराणी दारात उभी राहिली. वृत्र हसला. “बायकांवर हात टाकणारा मी नाही. बायकांपासून रक्षण मागणा-यावर मी प्रहार करीत नसतो.’ असे म्हणून वृत्र निघून गेला.

सर्व देवांना आता विचार पडला. काय करावे ते कोणासच कळेना. सर्वांची मती कुंठित झाली. संकटात ज्याची बुद्धी अधिकच स्फुरते, तोच खरा बुद्धीमान. असा बुद्धीमान देवात कोण होता ? सारे विश्व नष्ट होणार, असे त्यांना वाटले. आपण आपली शक्ती गमावली, असे त्यांना वाटले. ते मनात चुटपुटू लागले. मानवांची मदत घ्यावी, असा विचार निघाला, परंतु मानवांतही कोठे होता राम ? मानवही मरून पडले होते. थंड गोळे झाले होते.