Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 7

एके दिवशी प्रभातकाळी भगवान सूर्यनारायण आपल्या गाईंचे थवे घेऊन पूर्वेस उभा राहिला. सौम्य, सुंदर, सुंदर प्रभा सर्वत्र फाकली होती. लाल, पांढ-या, निळ्या, पिवळ्या, नाना रंगी गाईंचे दूध सूर्य काढू लागला. पृथ्वीवर प्रकाशधारांचा वर्षाव होऊ लागला. इतक्यात तो वृत्र लहानसे काळे रुप धरून तेथे अकस्मात येऊन उभा राहिला. काही गाईंचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्या अशान्त झाल्या. गाईंत हालचाल सुरू झाली.

त्यांनी कान टवकारले. शिंगे सावरली. त्यांचे डोळे अस्थिर झाले. काही गाई बुजल्या व त्या धावू लागल्या. काही गाई शिंगे उगारून वृत्राच्या अंगावर धावल्या. परंतु वृत्राने त्यांची शिंगे धरून त्यांना दूर फेकले. काहीतरी अशुभ आहे, असे गाईंच्या मनात आले. त्या थरथरू लागल्या. पुन्हा काही गाई धीर करून शिंगे उगारून धावत आल्या. वृत्राने एकदम ‘आ’ पसरला. प्रचंड जबडा. जणू अंधारमय अनन्त दरीच ! त्या गाईंना त्याने गिळले. पोटात गेल्या त्या धीट गाई. त्या शिंगांनी वृत्राचे पोट फा़डू लागल्या. परंतु ते पोट जणू पोलादी होते. गाईंची शिंगे मोडून गेली, परंतु वृत्राचे ते पोट फाटेना, शेवटी त्याच्या पोटात त्या चुळबुळ करीत राहील्या.

प्रत्यही असे होऊ लागले. वृत्र समोर दिसताच सूर्य अधिकतापू लागे, परंतु सूर्याची ती आटापीट पाहून वृत्र हसे. हसत हसत तो पुढे जाई व सूर्य पळू लागे. वृत्र काही गाईंना गिळी. गाईंची संख्या कमी होऊ लागली. एके दिवशी नंदनवनातील कुरणाचा अधिकार सूर्याला म्हणाला-

“धेनूनां संख्या क्षीणा दृश्यते। कुत्र गतास्ते धेनवः।न सम्यक् परिपालन करोषि इति दृश्यते।”

सूर्य म्हणाला,-
“भद्र, महान् करालो रिपुः संजातः। स प्रतिदिनं आगच्छति धेनुश्च भक्षयति। किमहं करोमि। अक्षमोऽस्मि तस्य निवारणार्थम्। भवान् एव देवराजाय महेन्द्राय निवेदयतु इमं वृत्तांतम्।”

शेवटी इंद्राच्या कानांवर गोष्टी गेल्या, परंतु त्याने लक्ष दिले नाही. अप्सरांच्या नाचात तो दंग होता. शुभांगी रंभा, तिला आलिंगीत होता. इंद्राने लक्ष दिले नाही, मग इतर देव तरी का देतील ? जसे वरिष्ठांचे वर्तन, तसे कनिष्ठांचे.

हळूहळू पृथ्वीला प्रकाशदुधाचा पुरवठा पुरा पडेना. वृक्ष-वनस्पती निर्जीव व निःसत्त्व दिसू लागल्या. त्यांचे तजेलदार रंग गेले. वाराही नीट वाहीना. लोकांनाही कसेसेच वाटू लागले. त्यांना गार गार वाटे. पोटातील अग्नीही मंदावला. काय झाले, काय झाले, असे लोक एकमेकांस विचारीत. ते सूर्याकडे बघत. सूर्यही त्यांना खिन्न दिसे, निस्तेज दिसे. प्रभातकाळी वा सायंकाळी पू्र्वीसारखा रंगसागर उचंबळत नसे. मध्यान्ही तेजस्वी ऊन पडत नसे. काय झाले सूर्याला ? काय होणार या विश्वाचे, या चराचराचे ?