Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञ 2

खेळ रंगात येऊ लागला. निरनिराळे संघ होऊ लागले. हत्तींचे कळप झाले. लांडग्यांचे थवे जमले. हरणे संघ करून राहू लागली. चिमण्या, कावळे, मोर, पारवे यांनीही आपापल्या संघटना केल्या. मनुष्यप्राणीही संघ करून राहू लागला.

मानवांचा संघ सुव्यवस्थित होऊ लागला. नीतिनियम होऊ लागले. व्यवहाराची अनुभवाने घडी बसवू लागले. प्रयोग करीत चालले. कसे बोलावे, कसे वागावे, काय खावे, केव्हा खावे, काय प्यावे, किती प्यावे, केव्हा निजावे, केव्हा उठावे, कसे बसावे, कसे हसावे, कोणाला मान द्यावा, कोणाचा कान धरावा, वगैरे सारे ठरू लागले. बारीकसारीक गोष्टींचेही नीट निरीक्षण, परिक्षण होऊ लागले. कोणाला कोणते काम झेपेल, कोणाची काय आवड, ते पाहण्यात येऊ लागले. ती ती कामे त्यांनी त्यांनी करावीत, असे दंडक झाले. विवाहपद्धतीचा विकास झाला. स्त्री-पुरुषांचे संबंध कसे असावेत, त्याचा गंभीर विचार होऊ लागला. वैवाहिक नीती उद्भत होती. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन विचार स्फुरत होते. ते आपले पहिले पूर्वज मोठे प्रतिभावान होते. त्यांचा मेंदू सुपीक होता. हृदय भावनाप्रधाव होते. जीवनाला ते आकार देत होते. मनातील विचार व कल्पना श्रेष्ठ धारिष्ट दाखवून ते कृतीत आणीत होते. त्या प्रयत्नात कोणी कोणी स्वतःची जीवने गमावली, परंतु त्यांच्या अनुभवांनी पुढील पिढी श्रीमंत होई, अधिक सुखी होई.

असे विश्वयंत्र चालू लागले. जोरात फिरू लागले. मधूनमधून परमेश्वर मुलांची परीक्षा घेई. आपण सांगितलेल्या गोष्टी मानवांच्या ध्यानात आहेत की नाहीत, ते पाही. एके दिवशी पडल्यापडल्या प्रभूच्या मनात सर्वांची परीक्षा घ्यावी, असे आले. तो आपल्या अनंत मनात विचार करू लागला. शेवटी त्याच्या संकल्पातून एक बाळ जन्माला आले. मोठे विचित्र होते ते बाळ. काळे काळे स्वरूप होते त्याचे. त्याला आपला आकार इच्छेप्रमाणे कमी-अधिक करता येत होता. नाना रूपे त्याला धारण करता येत. ते बाळ क्षणात लहानशा ठिपक्याप्रमाणे होई, तर क्षणात सारे त्रिभुवन व्यापी.

ज्याने चंद्रसूर्य़ निर्मिले, सुंदर फुले निर्मिली, मोर-पोपट निर्मिले, त्यानेच तो असुर निर्मिला होता. काळा काळा अक्राळविक्राळ असा तो असुर दिसत होता. त्याचे रूप पाहून प्रभूही जरा दचकला.

“तात, तुम्ही मला निर्माण केलेत आणि तुम्हीच का घाबरता ?” त्या असुरबाळाने विचारले.