Get it on Google Play
Download on the App Store

मोरी गाय 17

शामरावांनी शेत, घर विकले. ते गोसेवाश्रमात आले. गोपाळने शामरावांचे स्वागत केले. सारे एकत्र राहू लागले. शामराव जणू मोठा भाऊ, सावित्री मोठी बहीण. त्या सा-यांचा जणू एक आश्रम. त्यांच्यात काही भेदभाव राहिला नाही. वनमालेला आधार झाला. दोहोंची चार झाली. शामराव सेवा करु लागले. ते पहाटे उठायचे, सावळ्या उठायचा. गोपाळही उठे. सावळ्या व शामराव शेण वगैरे काढत, खतासाठी खड्डात नेऊन टाकत. गोपाळ धार काढी, मग सावळ्या व शामराव शुद्ध दूध काढायला येत. भाजीला, मळ्याला मग पाणी लावीत. शामराव गायी घेऊन रानात जात. जरा पाय मोकळे करुन आणीत. अजून पावसाला अवकाश होता. शामराव वासरांना पाला चारत. मोरीची सेवा करत. गायीला पाणी पाजत. झाडांना पाणी देत. गोपाळ दूध घेऊन जाई व विकून येई. सावित्री वनमाला भाजी वेचून ठेवत. फुलांचे हार करुन ठेवत. अशा त-हेने काम सुरु होते.

पावसाळा सुरु झाला. पृथ्वीवर पर्जन्यधारा पडू लागली. तेव्हा भूमीवर शीतल पाऊस पडू लागला. हिरवे हिरवे चिमुकले गवत पृथ्वीमातेच्या पोटातून बाहेर डोकावू लागले. भीत भीत बाहेर येऊ लागले, पण धीट झाले. वर येऊन माना नाचवू लागले, गायीगुरांना आनंद झाला. मयूर-हरणांना रानात आनंद झाला. हवेत गारवा आला. रानात चारा आला. गाई चरु लागल्या. शामराव गायी चारायचे. कधी गोपाळही जायचा, पावा वाजवायचा, मोरीचे दिवस भरत आले, असे वाटू लागले. तिला आता बाहेर सोडत नसत. हिरवे हिरवे गवत तिला आणून देत.

मोरी गाय व्याली, ती खूप दूध देऊ लागली. सर्वांना आनंद झाला. ती १५-१६ शेर दूध देऊ लागली. आजूबाजूचे शेतकरी पाहायला येत. आणखी गायी व्याल्या, अमळनेरला छात्रालय होते. तेथे गायीचे दूध जाऊ लागले. गावातही घरोघर गाईंचे दूध जाई, आश्रमाची प्रसिद्धी होऊ लागली.

पुढे वनमाला बाळंत झाली. सुंदर बाळ जन्माला आले. सावित्रीबाईंनी तिचे सारे केले. शामराव व सावित्रीबाई यांच्यासाठी वेगळी झोपडी बांधण्यात आली. सावित्रीबाई म्हणजे वनमालेचे जणू माहेर होते, वनमाला बाळाला घेऊन गोठ्यात जायची.