Get it on Google Play
Download on the App Store

मोरी गाय 11

वनमाला घरात आवराआवर करत होती. “आज मांजरी कुठं गेली ? केव्हाची दिसली नाही. जरा हाक तरी मारावी.” वनमाला म्हणाली. “मनी-मनी-मनी-मनी-” गोपाळ मनीमाऊस हाक मारु लागला. मनीमाऊस दूध घातले. बाकीचे विरजण्यात आले. वनमालेने चूल सारवली. तवा-भांडी घासली. अंगणात चटई पसरुन गोपाळ एकतारीवर भजन करत होता. गोड, भक्तिपूर्ण पदे गोपाळ म्हणत होता. भांडी घासता घासता वनमाला म्हणाली, “ते परवा नवीन पाठ केलेलं गाणं म्हणा ना. ते मला फार आवडत.”

“तूच लौकर ये व म्हण. मी येऊ का विसळायला नाही तर ? निदान, म्हणजे तरी लौकर येशील !” गोपाळ म्हणाला.

“माणसाला खरं यायचं असतं तेव्हा तो विचारतो वाटंत ? मी नाही म्हणेन माहीतच आहे तुम्हाला. मी तुम्हांला भांडी घासायला लावली तर ती मोरी गाय हसेल.” असे म्हणत म्हणत वनमाला भांडी घेऊन घरात गेली.

“झाली होती वाटतं घासून ! तू विसळीतच होतीस म्हणून बोलावलं नाहीस. पण नीट घासलीस ना ? नाही तर भांडी रागवायची हो !” गोपाळ म्हणाला.

“पाहा कशी घासली आहेत ती. दुधाची व इतर सारीच कशी आरशासाऱखीच स्वच्छ असतात.”

“आपली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख !” असे रामदास स्वामींनी म्हटलं आहे. स्वतःच आरशासारखी स्वच्छ म्हणून घे !” गोपाळ म्हणाला.

“मी म्हणू गाणं ? तुम्ही अलगुजावर वाजवा.” वनमाला म्हणाली.

गोपाळ वाजवू लागला. वनमाला आपल्या कोमल गळ्याने गाणे म्हणू लागली. गोठ्यातील गायी एकू लागल्या. स्नेहाळ, संगीतप्रिय मोरी संगीत-सागरात पोहू लागली.

हसवी मम भारत देशा
अवतरुनि सख्या संहरि क्लेशा ।।

ठायी ठायी गायी हसू दे
भरलेली तत्कास दिसू दे
प्रकटव जनगण वैभवरेषा।।

ज्ञान विकसो विद्या विलसो
सकळा सुंदर सुकला हासो
रमव सरस्वती-लक्ष्मी सुवेषा।।

ये वनमालाधर गोपाळा
ये गोविंदा ये घननीळा
चरण तुझे शुभ दावी रमेशा।।