Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कोळी आणि मासा

एका गावात एक कोळी राहत होता. रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात. तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. तो कंटाळला. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होवू लागली. मनाशी म्हणाला,''आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही." असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जाळे वर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतीला येवून तो मासा म्हणाला,'' मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे. मी आत्ता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेंव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जावू दे". कोळी म्हणाला," अरे मत्स्या ! काय माहित तू मला परत सापडशील कि नाही, आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मारतील. तेंव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही."

तात्पर्य: भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.