Get it on Google Play
Download on the App Store

ज्ञान हा खरा दिवा ! 1

राधीची मुलगी आजारी होती. सासरहून कागद आला होता. राधीचे मुलीवर फार प्रेम. पोरीला पाहून यावे, असे तिच्या मनात आले.

“येऊ का जाऊन ? दोन दिवशी परत येईल. तोवर सांभाळा घर.” ती नवर्‍याला म्हणाली.

“तू एकटी जाशील ? स्टेशनवर उतरुन पुढं बरचं जावं लागतं. रस्ता चुकायचीस.”

“तोंड आहे ना ? कोणाला विचारीन. आणि देव का रस्ता दाखवणार नाही ? तो का पोरासाठी तडफडणार्‍या आईला चुकवील ? मी जाऊन येते.”

“जा. मला तर सवड नाही. घेतलेले पैसे खंडायचे आहेत; कामावर जायला हवं.”

राधीने गाठोडे बांधले. नातवंडांना थोडा खाऊ घेतला नि निघाली. पाय हेच गरीबाचे वाहन. ती माऊली डोयीवर गाठोडे घेऊन निघाली. आली स्टेशनवर.

“कोठलं तिकीट हवं ?” स्टेशनमास्तराने विचारले.

“पोरीच्या गावचं, आजारी आहे भाऊ ती. दे लक्कन !”

“अगं, गावाचं नाव काय ?”

“गाव त्या स्टेशनापासून दूर आहे.”

“स्टेशनाचं नाव काय ?”